गुरुवार दि.२९ जानेवारी २०२६


पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारांबरोबर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद मतदार संघामध्ये महायुती अंतर्गत शिवसेना, भाजपासह राष्ट्रवादीने प्रबळ उमेदवार उभे करून रंगत तर आणली आहेच परंतु त्याचबरोबर केवळ उमेदवारच नाही तर तीनही घटक पक्षांच्या प्रमुख नेते मंडळींची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, शिवसेना शिंदे गटातून आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सभापती विष्णुपंत केसरकर आणि भाजपातून युवा कार्यकर्ते जयवंतराव मसणू सुतार परस्पर विरोधात उभे ठाकले आहेत. सुधीर देसाई हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक आहेत तर आमदार शिवाजीराव पाटील यांचे विश्वासू म्हणून जयवंतराव सुतार यांची ओळख आहे. अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी हे सुतार यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत.या भागातून पंचायत समितीसह आजरा साखर कारखान्यामध्ये वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवणारे विष्णुपंत केसरकर यांच्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी प्रचाराचे रान उठवले आहे.
निवडणूक तीनही उमेदवारांना फारशी सोपी राहिलेली नाही. सुरुवातीला राष्ट्रवादीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक सद्यस्थितीत तीनही उमेदवारांपासून समान अंतरावर आली आहे. मतदारसंघाचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने प्रचार यंत्रणा राबवताना मात्र उमेदवारांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. आजच्या स्थितीत कोणीही आपणच विजय होणार असे छातीठोकपणे सांगू शकत नाही.
उपमुख्यमंत्री अजित दादांना आजऱ्यात श्रद्धांजली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आजरा नगरपंचायत,आजरा तालुका खरेदी विक्री संघ, सोहाळे ग्रामपंचायतीसह ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
काल बुधवारी नगरपंचायतीची निवडणुकीनंतर पहिलीच मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजतात त्यांना श्रद्धांजली वाहून सदर सभा तहकूब करण्यात आली. आजरा तालुका संघामध्येही मासिक सभा होती या सभेमध्ये अजितदादांचे फोटो पूजन करून त्यांना मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. सोहाळे येथेही श्रद्धांजली फलकाचे पूजन करून ग्रामस्थांनी अजित दादांना श्रद्धांजली वाहिली.
अजित दादांच्या निधनाच्या वृत्तानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती राष्ट्रवादी उमेदवारांनी आपली यंत्रणा काल दिवसभर थांबवली. राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते सदर घटनेबाबत हळहळ व्यक्त करताना दिसत होते.

उत्तूर परिसरात निवडणुकीची रणधुमाळी; जि.प.साठी ३ तर पं.स.साठी ५ उमेदवार रिंगणात

उत्तूर: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २७ रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उत्तूर मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. उत्तूर संदर्भात पंचायत समितीसाठी पाच तर जिल्हा परिषदेसाठी तीन उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची आणि रंगतदार लढत होत आहे.
पंचायत समिती उत्तूर मतदारसंघात एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये अभिजीत अमृत आरेकर (उत्तूर) – काँग्रेस, संभाजी राजाराम कुराडे (उत्तूर) – शिवसेना शिंदे गट, विकास वसंत चोथे (बहिरेवाडी) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, सागर शशिकांत वाघरे (होन्याळी) – शिवसेना ठाकरे गट आणि महेश काशिनाथ करंबळी (उत्तूर) – ताराराणी आघाडी पक्ष यांचा समावेश आहे.
तर जिल्हा परिषद उत्तूर मतदारसंघात विठ्ठल महादेव उत्तूरकर (उत्तूर) – शिवसेना शिंदे गट, शिरीष हिंदुराव देसाई (उत्तूर) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि उमेश मुकुंदराव आपटे (उत्तूर) – ताराराणी आघाडी पक्ष असे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
अर्जमाघारीनंतर उत्तूर परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रमुख पक्षांसह अपक्ष व आघाडींचीही ताकद पणाला लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्रचाराचा जोर वाढून उत्तूरमध्ये निवडणुकीची खरी रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
उलट सुलट उमेदवाऱ्या…
राष्ट्रीय काँग्रेसचा ‘हात’ घराघरात पोहोचवणाऱ्या उमेश आपटे यांनी ताराराणी आघाडीचा आधार घेतला आहे. तर भाजपाचे विठ्ठल उत्तूरकर यांनी येथे शिंदे सेनेतून उमेदवारी ठेवली आहे.
शाश्वत विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या : प्रा. अर्जुन आबिटकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास करण्यास आपण बांधिल आहोत. टप्प्याटप्प्याने या मतदारसंघातील भागाचा विकास निश्चित होईल याचा आपणाला आत्मविश्वास आहे व त्यामध्ये आपण कदापिही कमी पडणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या व एकदा पालकमंत्री यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव घ्या असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी केले. वाटंगी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आजऱ्याचे नगरसेवक व युवा नेते अभिषेक शिंपी म्हणाले, पालकमंत्री आबिटकर व प्रा. अर्जुन सर यांच्या कार्यपद्धतीमुळे तरुणाईसह मतदारसंघातील अनेकांनी शिवसेनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शिवसेनेच्या विष्णुपंत केसरकर यांच्यासह दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून आणूया. यावेळी विष्णुपंत केसरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सदानंद देसाई यांनी आभार मानले.
बैठकीस विजय देसाई, आप्पा कुराडे, गणपतराव कानडे, मसनू कांबळे,माजी सैनिक शिवाजी नांदवडेकर, शिवाजी गिलबिले, राजेंद्रसिंह सावंत, संजय पाटील, इंद्रजीत देसाई, विजय थोरवत, संतोष भाटले, विजय केसरकर, सुनील दिवेकर, सतीश फडके, रणजीत सरदेसाई यांच्यासह वाटंगी ग्रामस्थ उपस्थित होते.

निधन वार्ता
आनंदा कांबळे

मडीलगे ता. आजरा येथील सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी आनंदा भैरु कांबळे( वय ६२ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, सून मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
सुरेश कांबळे

शिरसंगी ता. आजरा येथील सुरेश नागोजी कांबळे ( वय ६२ वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलग, मुलगी असा परिवार आहे.




