mrityunjaymahanews
अन्य

बाहुबली कोण ?आज फैसला…

शनिवार दि.२३ नोव्हेंबर २०२४              

  बाहुबली कोण ?

आज फैसला

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     राधानगरी विधानसभा मतदारसंघासह कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे आजरा तालुकावासियांचे लक्ष लागले असून विशेषत: राधानगरी मतदारसंघांमध्ये आमदार पदाचा दावेदार कोण ? याविषयी गेले महिनाभर सुरू असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम मिळणार आहे.

     शिवसेना (उ.बा.ठा.) विरुद्ध शिवसेना (शिंदे) अशी झालेली ही लढत जिल्ह्यामध्ये चर्चेची ठरली आहे. विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे या मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक करणार की माजी आमदार के. पी. पाटील त्यांना रोखण्यात यशस्वी होणार हे देखील स्पष्ट होणार आहे.

     आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांसमोर पुन्हा एक वेळ संधी मागितली आहे. तर माजी आमदार के. पी. पाटील यांनी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करत वातावरण चांगलेच तापवले आहे. मतदारसंघातील विकास कामे, लाडकी बहिण योजना, तरुणांसह कार्यकर्त्यांशी असणारा थेट संपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर सत्ता नाट्यात त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय ही सर्वात अडचणीची बाजू आहे.

     आमदार के.पी. पाटील यांनी या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून उबाठा शिवसेना गटाद्वारे उमेदवारी घेऊन लोकसभेच्या मताधिक्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला आहे. बिद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना दिलेला विक्रमी दर, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची नेटकी फळी व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दणक्यात केलेला प्रचार शुभारंभ या के.पी. पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत तर गेली दहा वर्षे या मतदारसंघात मतदारांशी असणारा संपर्काचा अभाव ही त्यांच्या दृष्टीने अडचणीची बाब आहे.

     गतवेळच्या विधानसभा निवडणूकीत आमदार प्रकाश आबिटकर यांनी सुमारे अठरा हजार मतांनी के. पी. पाटील यांना पराभूत केले होते. दोघांनीही या मतदारसंघाचे दोन – दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढल्यामुळे कोणाच्या पथ्यावर पडतो हे निकालानंतर समजेल.सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल.

कार्यकर्त्यांची जय्यत तयारी…

     निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोषाची जोरदार तयार केली आहे. तर दोन्ही बाजूंचे समर्थक कार्यकर्ते शुक्रवारी रात्रीपासूनच गारगोटीच्या दिशेने रवाना झाले आहेत. गुलालासह आतषबाजीचे साहित्य कार्यकर्त्यांनी तयार ठेवले आहे. मतमोजणीच्या एकूण ३१ फे-या होणार आहेत.

दोन्ही बाजूंकडून विजयाचा दावा…

निवडणुका अत्यंत चुरशीने झाली असल्याने दोन्ही गटांकडून विजयाचा दावा केला जात आहे. याच आत्मविश्वासातून मोठमोठ्या पैजाही कार्यकर्त्यांनी लावलेल्या आहेत.

चंदगडमध्ये अटी-तटीचा सामना…

       नेटक्या उमेदवारांची भाऊ गर्दी असणाऱ्या चंदगड विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. सुरुवातीला बॅकफूटवर दिसणाऱ्या नंदाताई बाभुळकर ह्या शेवटच्या टप्प्यात मात्र स्पर्धेत आल्या. विद्यमान आमदार राजेश पाटील यांना एकाकी लढत द्यावी लागली. तर अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील व मानसिंगराव खोराटे यांनी निवडणुकीत चांगलीच रंगत आणत चुरस निर्माण केली आहे. यामुळे या मतदारसंघात छातीठोकपणे कोणीही आपण विजयी होणार असा दावा मतमोजणी पूर्ण होईपर्यंत करू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. मतमोजणीच्या एकूण २८ फेऱ्या होणार आहेत.

कागल मधील लढतीकडे राज्याचे लक्ष…

      सलग पाच वेळा विजयी झालेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांना यावेळीही विजयासाठी बरीच धडपड करावी लागली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजित घाटगे यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. गतवेळी निसटत्या पराभवाला सामोरे गेलेल्या समरजित घाटगे यांना यावेळी तुतारी तारणार की मंत्री मुश्रीफ विजयी षटकार मारणार… याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या होणार आहेत.

जनता बँकेच्या उपाध्यक्षपदी  अमित सामंत यांची निवड


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     जनता बँकेच्या उपाध्यक्षपदी अमित रमेश सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या विशेष सभेत सदर निवड पार पडली.

     यावेळी अध्यक्ष मुकुंददादा देसाई,संतोष पाटील, पांडुरंग तोरगले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांच्यासह सर्व संचालक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पारा घसरला… तालुक्यात हुडहुडी 

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      गेल्या चार दिवसापासून आजरा शहरासह तालुक्यात तापमान कमालीचे घसरले असून पारा १६ अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेला आहे. यामुळे सर्वत्र थंडीचे साम्राज्य पसरले आहे. वाढलेल्या गारठ्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

म्हैस दूध उत्पादनात आजरा तालुका अव्वल

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!