शुक्रवार दि.२२ नोव्हेंबर २०२४

बेपत्ता वृद्धेचा मृतदेह सापडला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ता.आजरा येथील तुळसाबाई मारूती भणगे/कोकीतकर या ८० वर्षीय बेपत्ता महीलेचा मृतदेह सदानंद पांडुरंग सावंत यांच्या शेतातील ओढ्याच्या पाण्यात आढळून आला .
तुळसाबाई या १२ नोव्हेंबर पासून बेपत्ता होत्या. मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत त्या घरातून निघून गेल्यानंतर त्यांचा नातेवाईकांनी शोध सुरू केला होता. दरम्यान गुरुवारी त्यांचा मृतदेह आढळला. याबाबतची वर्दी प्रकाश मारुती कोकितकर यांनी पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.
राधानगरी तालुका ठरवणार ‘ पुढचा आमदार ‘

ज्योतिप्रसाद सावंत
राधानगरी -भुदरगड विधानसभा मतदारसंघाची विजयाची गणिते राधानगरी तालुक्यावरच अवलंबून असल्याचे स्पष्ट होत असून या मतदारसंघात मतदारांनी नेमका ‘ हात ‘ कोणाला दिला आहे हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार के.पी. पाटील यांनी या मतदारसंघातून आपणालाच मताधिक्य मिळणार असा दावा केला आहे. तर अपक्ष उमेदवार ए.वाय. पाटील हे याच तालुक्यातील असल्याने ते किती मतदान घेणार यावरही निकालाची स्थिती अवलंबून राहणार आहे.
या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे मतदारासमोर दोन्ही बाजूनी आले. विकास कामांच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जात असून सर्वसामान्य मतदार आपल्या पाठीशी आहे असे आमदार प्रकाश आबिटकर यांनी वेळोवेळी स्पष्ट केले. विकास कामांबाबत निश्चितच ते या भागात उजवे ठरले आहेत. कार्यकर्त्यांची असणारा थेट संपर्कही त्यांच्या जमेची दुसरी बाजू म्हणावी लागेल. परंतु हीच जमेची बाब त्यांच्या दृष्टीने निवडणुकीच्या तोंडावर अडचणीची ठरली. अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या.या अंतर्गत कुरबुरी थांबवण्यात थोडेफार यश आले. पण काही मंडळी थेट महाविकास आघाडीच्या प्रवाहात सामील झाली.
अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, डॉ.अनिल देशपांडे,विजयकुमार पाटील, विलास नाईक, गोविंद गुरव, इंद्रजीत देसाई, शरीफ खेडेकर, विजय थोरवत, राजेंद्रभाऊ सावंत, दशरथ अमृते, सुधीर कुंभार, बाळ केसरकर, काका देसाई, अमानुल्ला आगलावे, अमित खेडेकर,संजय पाटील, रणजीत सरदेसाई, संतोष भाटले, संजय चव्हाण, अश्विन डोंगरे, असिफ पटेल, नाथा देसाई, धनंजय पाटील, सुनील दिवेकर, मंदार बिरजे, तेजस मोहिते,भाजपा व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आदी मंडळींनी आमदार आबिटकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली.
माजी आमदार के. पी. पाटील यांनी मात्र यावेळी थोडी सावध भूमिका घेतलेली दिसत होती. आजरा तालुक्यामध्ये दुखावलेल्या मंडळींची मनधरणी करण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचेही दिसत होते. सुरुवातीला के. पी. पाटील यांना ‘ हलक्यात ‘ घेणाऱ्या मंडळींना अंतिम टप्प्यात मात्र विचार करावयास लावण्याजोगी परिस्थिती निर्माण करण्यात के.पी. पाटील व त्यांचे कार्यकर्ते यशस्वी झाले. आजरा येथील जाहीर सभेने कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यात त्यांना यश आले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, युवराज पोवार, मुकुंदराव देसाई, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,उदयराज पवार, रवी भाटले, कॉ.संपत देसाई,संजयभाऊ सावंत, रणजीत देसाई, रशीद पठाण, अभिषेक शिंपी, किरण कांबळे,ओंकार माद्याळकर, विक्रम देसाई, आरिफ खेडेकर, संकेत सावंत,देवदास बोलके, निशांत जोशी,अमित सामंत, परेश पोतदार, दत्ता पाटील, समीर चांद, जी.एम. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केपींच्या प्रचाराची धुरा सांभाळली.
ए. वाय. पाटील यांनीही आजरा तालुक्यात मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांच्या प्रचार यंत्रणेच्या मर्यादा स्पष्टपणे जाणवत होत्या.
मतदानानंतर मात्र या मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हा राधानगरी तालुक्यावर अवलंबून असल्याचे अधोरेखित झाले आहे.
आकडेमोडीत गेला दिवस…
प्रमुख उमेदवारांचे कार्यकर्ते काल दिवसभर झालेल्या मतदानाच्या आकडेमोडीत व्यस्त असल्याचे दिसत होते. भागा- भागातील कार्यकर्त्यांना संपर्क साधून मतदानाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचेही चित्र होते. राधानगरी तालुक्यातील आपणालाच मताधिक्य मिळणार असा दावा आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार के.पी. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात होता.
आजरा जि.प.मधून नाममात्र मतांची आघाडी
महायुती व महाविकास आघाडीने या जिल्हा परिषद मतदार संघात मताधिक्य मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मतदानानंतर मात्र येथून किरकोळ मतांची आघाडी मिळण्याची शक्यता पुढे येत आहे. आजरा शहरातून के. पी. पाटील यांना तर ग्रामीण भागातून आमदार प्रकाश आबिटकर यांना मताधिक्य मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
निकृष्ट दर्जाचे काम अन्याय निवारण समितीने रोखले...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाळू ऐवजी पावडर /डस्ट चा वापर करून सुरू असणाऱ्या शिव कॉलनी येथील गटर्सचे काम काल अन्याय निवारण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने रोखले. वाळूचा वापर सुरू केल्यानंतरच या कामाला परवानगी देण्यात आली.
शिव कॉलनी आजरा येथे गटर बांधकाम चालू होते . अन्याय निवारण समितीने सदर कामकाजाची पाहणी केली . वाळू ऐवजी पावडर डस्टचा वापर होत असल्याचे लक्षात आले.त्यानंतर काम तातडीने थांबवले. समितीचे सदस्यांनी कामाची पाहणी केली. सदर कामांमध्ये डस्ट पावडर ऐवजी वाळू व सिमेंटचा वापर योग्य प्रमाणात करून दर्जेदार काम करण्याच्या सूचना अन्याय निवारण समितीने सब कॉन्टॅक्टर यांना देऊन काम चालू करण्यास सांगितले.
यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, बंडोपंत चव्हाण, वाय.बी.चव्हाण व समिती सदस्य उपस्थित होते.
राधानगरी मतदार संघ झालेले तालुका निहाय मतदान…

राधानगरी तालुका
एकूण मतदान १ लाख ७३ हजार २५३
झालेले मतदान १ लाख ३८ हजार २४९ (७९.८०%)
९०३८४ पुरुष मतदारांपैकी ७२ हजार ६६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर ८२ हजार ८६२ महिला मतदारांपैकी ६५ हजार ५७६ मतदारांनी मतदान केले.
भुदरगड तालुका
एकूण मतदान १ लाख ३३ हजार ६२
झालेले मतदान १ लाख ६ हजार ५९ (७९.७१%)
६७ हजार ८८५ पुरुष मतदारांपैकी ५४,७३६ तर ६५,१७२ महिला मतदारांपैकी ५१ हजार ३२० महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
आजरा तालुका
एकूण मतदान ३८ हजार १०७
झालेले मतदान २५३८१ (६६.६०%)
१९ हजार ३३ पुरुष मतदारांपैकी १२९१२ तर १९ हजार ७४ महिला मतदारांपैकी १२४६९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.












