बुधवार दिनांक ७ मे २०२५



बस मध्ये महिलेचे गंठण लांबवले…
पावणे दोन लाखांचा फटका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवकांडगाव ता. आजरा येथील सौ. शामल विजय देसाई ही महिला आपले माहेर इदलहोंड ता. खानापूर जि. बेळगांव गावची यात्रा असलेने गावी जाणेसाठी म्हणून मुलगी गौरी असे एस.टी. स्टॅन्ड आजरा येथून आजरा-बेळगांव बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या पर्सची चेन उघडून एक लाख साठ हजार रुपये किंमतीचे पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण
लांबवले.
याबाबत देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हवालदार राहुल पन्हाळकर पुढील तपास करीत आहेत.


शिरसंगीत विविध कार्यक्रमांनी साई भंडारा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी ता.आजरा येथे मुंबई ग्रामस्थ मंडळातर्फे साई भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात साईबाबांच्या मूर्तीला अभिषेक करुन गावातून साईबाबांची वेशभूषा व इतर महान महापुरुषांच्या वेशभूषा करून गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये शामल गणेश बुरुड यांनी पैठणीचा मान मिळवला. रविवारी श्री माऊली हरिपाठ महिला मंडळाचा भजनांचा कार्यक्रम पार पडला .त्यानंतर महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दाभिल आरोग्य केंद्रामुळे जनतेची सोय : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दाभिल गाव हे दुर्गम व डोंगराळ भागामध्ये येते. या गावासह परिसरातील इतर गावांना आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक होते. दाभिल येथील आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून दाभिलसह परिसरातील नागरीकांना या उपकेंद्राचा चांगला लाभ होणार असून आरोग्य उपकेंद्र अंत्यत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी केले.
दाभिल येथील आरोग्य उपकेंद्र इमारत, समाजमंदिर, दाभिलवाडी येथील हनुमान मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दाभिलचे सरपंच युवराज पाटील होते. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायतीचे सदस्य श्रावण वाजे यांनी केले. यानंतर मंत्री आबिटकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक जितेंद्र टोपले, बबन कांबळे, सरपंच युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपसरपंच पुनम गायकवाड, नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई, भाजपाचे आजरा तालुकाध्यक्ष अनिरूद्ध केसरकर, विजय थोरवत, माजी उपसरपंच रविंद्र मुगुर्डेकर, सुषाताई कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विठोबा पाटील, सुगंधा राणे, माधुरी सुतार, आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक आनंदा गवळी, हनुमान मंदिर जिर्णोद्वार समितीचे अध्यक्ष सागर गवळी, साळगावचे सरपंच धनजंय पाटील, मसोलीचे सरपंच गुरव, संदीप व्हरंडेकर, पांडूरंग झित्रे, संतोष भाटले, इंद्रजित देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र गुरव यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचलन संदीप कांबळे यांनी केले तर बचाराम यादव यांनी आभार मानले.
पाण्याचा प्रत्येक थेंब दाभिलच्या शेतामध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील…
सर्फनाला प्रकल्प पूर्ण झाला असला तरीही दाभिल ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून रहावे लागणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या योजना कार्यन्वित कराव्यात यासाठी लागणारे सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आश्वासन दिले.

खरीप हंगाम यशस्वीतेसाठी कृषीचे नियोजन :पी. जी. पाटील
आजऱ्यात खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन केले असून बि-बियाणे, खते यासह विविध गोष्टीची आवश्यक तयारी केली आहे. अशी माहीती मंडल कृषी अधिकारी पी. जी. पाटील यांनी दिली.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय सभागृहात तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर यांच्या वतीने खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा झाली, तहसीलदार समीर माने अध्यक्षस्थानी होते.कृषी अधिकारी व्ही. आर. दळवी प्रमुख उपस्थित होते.
मंडल कृषी अधिकारी प्रदीप माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री. पाटील यांनी या वेळी कृषी यांत्रिकीकरण, शेततळी, ठिबक सिंचन, पीएम किसान, फळभाग लागवड यासह विविध कृषी विभागाच्या योजनांची माहीती दिली. प्रगतशील शेतकरी प्रकाश रावण यांनी सेद्रीय व नैसर्गिक शेतीची माहीती दिली. तर सूर्यकांत दोरुगडे यांनी भात लागवड तंत्रज्ञान व रोपवाटिका व्यवस्थापन व बीजप्रक्रिया या विषयी माहीती दिली. धन्वंतरी देसाई यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना तसेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे या विषयी मार्गदर्शन केले. भूमी उत्पादक शेतकरी गट चिमणेचे अध्यक्ष वसंतराव तारळेकर यांनी बांबू पिकाविषयी माहीती दिली.
तालुक्यातील शेतकरी, कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कृषी अधिकारी श्री. दळवी यांनी आभार मानले.

रामलिंग मंदिराची वास्तुशांती व मुर्तीप्राणप्रतिष्ठा कार्यक्रम उद्यापासून

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मौजे किटवडे-लिंगवाडी गावचे ग्रामदैवत श्री रामलिंग मंदिराची वास्तुशांती व मुर्तीप्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा श्री किसन महाराज स्वामीजी यांचे शुभहस्ते गुरुवार दि. ८ मे २०२५ ते शनिवार दि. १० मे २०२५ रोजी ना. प्रकाशआबिटकर,सार्वजनिक आरोग्य मंत्री/पालक मंत्री कोल्हापूर ,ना. हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, आम. शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
आज बुधवार दि. ७ मे २०२५ रोजी दु. १२ वा. मुर्ती व कळस मिरवणूक, गुरुवार दि. ८ मे २०२५ रोजी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. शरीर शुद्धी, प्रायश्चित, पंचगंव्य प्राशन, मुख्य संकल्प, गणेश पुजन, पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, स्थलशुद्धी, जलाधिवास, बाराकलश स्नान, वास्तुमंडल स्थापना, ब्रम्हादिपुजन, मुख्यदेवता पुजन, अग्नीस्थापन, नवग्रह पुजन व हवन देवता नैवेद्य, आरती इ. कार्यक्रम,हरीपाठ सांय. ६ ते ८ ,किर्तन ८ ते ११ ह.भ.प. श्रीधर महाराज, दुपारी १ ते ३ व सायंकाळी ७ ते ९ महाप्रसाद
शुक्रवार दि. ९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वा. देवता पुजन मुख्यदेवता हवन, बलिदान पुर्नाहुती इतर संकल्प कलशारोहण दु. १२.४६ वा. परमपुज्य किसन महाराज स्वामीजी यांचे शुभहस्ते नैवेद्य, आरती व गा-हाणे रात्री ८ ते ११ ह.भ.प. शिवाजी सुतार महाराज, भादवण यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १ ते ३ व सायं. ७ ते ९ महाप्रसाद
शनिवार दि. १० मे २०२५ रोजी सकाळी ८ वा. सत्यनारायण पुजा दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत महाप्रसाद रात्री ११ वा.छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर आधारीत नाटक “गर्जले सहयाद्रीचे कडे ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास श्री. सुधीर देसाई,संचालक, के.डी.सी.सी. बँक,. मुकूंद उर्फ उदयसिहं देसाई,अध्यक्ष, आजरा साखर कारखाना,श्री. अशोकअण्णा चराटी,जयवंतराव शिंपी, अध्यक्ष, आजरा महाल संस्था, श्री. सुधीर कुंभार, श्री. संभाजी पाटील, श्री. उदय पवार, श्री. जनार्दन टोपले श्री. अनिरूद्ध बाळ केसरकर,भाजप, तालुका प्रमुख, श्री. राजेंद्र सावंत,शिवसेना, जिल्हा उपाध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत.

निधन वार्ता
निर्मलादेवी सरदेसाई

चितळे (ता. आजरा) येथील निर्मलादेवी शामराव सरदेसाई (वय ६८) यांचे निधन झाले.माजी पोलिस पाटील शामराव सरदेसाई यांच्या त्या पत्नी, तर चितळे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच उदय सरदेसाई यांच्या त्या आई होत.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.


कानोली लक्ष्मी यात्रेस सुरुवात

कानोली येथील श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त लक्ष्मी खेळण्याचा कार्यक्रम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत उत्साहात सुरू होता. आज बुधवार हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.




