
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ…
पतीसह चौघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
माहेरच्या मंडळींकडून रुपये एक लाखांसह सोन्याची चेन घेऊन ये असा तगादा लावत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत आजरा पोलिसातून मिळालेली माहिती अशी…
सध्या सिरसंगी ता. आजरा येथे रहणाऱ्या एका व २३ वर्षीय विवाहितेचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला. विवाहानंतर गेली तीन वर्ष माहेरहून एक लाख रुपये व सोन्याची चेन घेऊन ये असा तगादा पतीसह सासू, सासरे व नणंदेने लावत पिडीत महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला अशी फिर्याद संजीवनी यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
या फिर्यादीवरून पतीसह अन्य तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पो.हे. कॉ.आंबूलकर पुढील तपास करीत आहेत.

वादळी पावसात उडालेले
पेरणोली शाळेचे छप्पर पावसापूर्वी घालण्याच्या हालचाली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली (ता. आजरा) येथील केंद्रीय शाळा खोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. दुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळणार आहे. वादळात छप्पर उडाल्याने तातडीने दुरुस्तीसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव व समग्र शिक्षण विभागाचे कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील यांनी सांगीतले.
श्री. गुरव म्हणाले, तालुक्यातील बहुतांश शाळा खोल्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. तालुक्यात धोकादायक इमारत असलेल्या शाळा जवळपास कमी आहेत. शेळप, कोरीवडे, पेरणोली, वाटंगी व एरंडोळ येथील शाळा खोल्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. यासाठी समग्र शिक्षा विभागाच्या सहकार्याने जिल्हा वार्षिक नियोजनातून निधी उपलब्ध झाला आहे. तालुक्यात पंधरा दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये पेरणोली व वाटंगी प्राथमिक शाळांच्य छप्पराचे नुकसान झाले. यामध्ये पेरणोली शाळेच्या एका खोलीचे उप्पर उडाले. त्यामुळे पेरणोली शाळा खोली दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून याला निधी मिळणार आहे. वाटंगी शाळेची स्थानिक पातळीवर दुरुस्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणात जाण्यासाठी पर्यायी रस्ता आहे का हो ?
वाहतुकीच्या खोळंब्यामुळे वाहनधारकांचा सवाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्यंकटराव हायस्कूल ते आजरा एसटी आगारादरम्यान वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने वाहनधारक व कोकणाकडे जाणारे पर्यटक या प्रकाराला वैतागले असून कोकणात जाण्याकरता दुसरा पर्यायी रस्ता आहे का ? अशी चौकशी करताना दिसत आहेत.
आजरा येथे संभाजी चौक ते बस स्थानक परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी ही आता नित्याचीच ठरू लागली आहे. दिवसभरात वारंवार या वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांबरोबर बाहेर गावाहून येणारे पर्यटक वैतागून गेले आहेत. वेळ व इंधन नाहक वाया जात असल्यामुळे वाहनधारकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
एकीकडे पर्यटकांमधून अशा प्रतिक्रिया उमटत असताना दुसरीकडे स्थानिक शहरवासीयांचेही वाहतुकीच्या कोंडीने प्रचंड हाल होत आहेत. रस्त्यावरून ये-जा करताना वयोवृद्ध नागरिक व लहान बालक, महिला यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
हा प्रकार असाच चालू राहिला तर कोकणच्या दिशेने आजरा मार्गे जाणारे पर्यटक भविष्यामध्ये हा मार्ग टाळण्याचा प्रयत्न करतील व त्याचा मोठा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एसटी आरक्षण आजरा येथून पूर्ववत करणार…
शिवसेनेला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आश्वासन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा बस स्थानकातून होणारे एसटी महामंडळाच्या बस फेऱ्यांचे तिकीट आरक्षण बंद करण्यात आल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उबाठा गट) उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व पदाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकारामुळे प्रवासी वर्गाला नाहक आर्थिक भूर्दुंड बसत असल्याचे सांगितले. आरक्षणाची व्यवस्था आजरा येथूनच करावी अशी मागणीही केली.
सध्या तांत्रिक अडचणीमुळे आरक्षण आजरा येथून होऊ शकत नसल्याचे स्पष्ट करून लवकरच आरक्षण व्यवस्था पूर्ववत करण्यात येईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.


