बुधवार दि. ३ सप्टेंबर २०२५


यात्रेसाठी अवधी द्या…
२०२७ लाच यात्रा घ्यावी : पत्रकार बैठकीत मागणीकोळींद्रे येथील महालक्ष्मी यात्रेबाबत प्रश्नचिन्ह…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोळींद्रे गावातील कांही मूलभूत प्रश्न कायम आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सदर प्रश्न मार्गी लावण्याची संधी ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहे. यंदा असणारा ओला दुष्काळ, गावामध्ये गटर्स,घरे, रस्ते, पथदिवे यांची प्रलंबित असणारी कामे या पार्श्वभूमीवर कांही मंडळींनी जाहीर केलेल्या महालक्ष्मी यात्रेला आपला विरोध नसून सर्वसामान्यांना तयारीसाठी वेळ उपलब्ध करून द्यावा अशी रास्त मागणी असल्याने घाईगडबडीने यात्रा करण्यापेक्षा ती २०२७ मध्ये करून ग्रामस्थांना अवधी देण्यात यावा अशी भूमिका आज कोळींद्रे येथे पार पडलेल्या ग्रामस्थांच्या पत्रकार बैठकीत मांडण्यात आली. आजच्या या पत्रकार बैठकीमुळे कोळींद्रे येथील यावर्षीच्या महालक्ष्मी यात्रेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबईकर ग्रामस्थांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही मंडळींनी गडबडीने महालक्ष्मी यात्रेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.तो जाहीर करत असताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेण्याची गरज होती. गावातील अनेकांनी आपली घरांची कामे काढलेली आहेत, विवाह समारंभांसारखे समारंभ प्रलंबित आहेत असे असताना यात्रा जाहीर करणे निश्चितच चुकीचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन यात्रा पार पडल्यास निश्चितच ते कौतुकास्पद होईल. परंतु तसे न होता घाई गडबडीने यात्रा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीला केवळ १८ लोक हजर होते. १८ लोक म्हणजे गाव काय ? असा सवालही बैठकीत उपस्थित करण्यात आला. मुळातच यात्रेला यावर्षी विरोध असल्याने वर्गणी गोळा करण्यावरही मोठ्या मर्यादा येणार आहेत. जुलैमध्ये यात्रा जाहीर करून ती मे महिन्यात घेणे केवळ अशक्य आहे असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांना तयारीसाठी किमान दीड ते दोन वर्षाचा कालावधी मिळणे आवश्यक आहे असे असताना शड्डू मारून यात्रा करण्याचा अट्टाहास कशासाठी ? असा सवालही करण्यात आला आहे. सात सप्टेंबर रोजी मुंबई येथे प्रमुख मंडळींची बैठक मुंबईस्थित ग्रामस्थांनी आयोजित केली आहे या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा असून त्यातूनही मे २०२६ मध्ये यात्रा घेण्याचा निर्णय झालाच तर या यात्रेला कोणत्याही प्रकारची वर्गणी न देता आम्ही २०२७ च्या यात्रेकरिता बळ सोडू असा इशाराही उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने सुरेश बुगडे व संभाजी सावंत यांनी भूमिका मांडली.
बैठकीस शंकरराव उगाडे, महादेव पाटील, लक्ष्मण परीट, सुरेश करडे,गोविंद नारळकर, जयराम संकपाळ, तानाजी बुगडे, बाबू जाधव, विजय कांबळे, भिकाजी गोंधळी, रामचंद्र पाटील,प्रशांत जाधव, तानाजी जाधव, रुपेश भोगले, शिवाजी उंडगे, मारुती उगाडे, प्रा. तानाजी राजाराम, संदीप उगाडे, शिवाजी न्हावी, मारुती भोगले, लिंगाप्पा करडे, संतराम कुराडे, मारुती चव्हाण, सागर पाटील, शिवाजी सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

भावपूर्ण वातावरणात घरगुती बाप्पांना निरोप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यामध्ये भावपूर्ण वातावरणात ‘बाप्पा मोरया’च्या गजरात घरगुती बापांना निरोप देण्यात आला.
पावसाची रिमझिम, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट आणि फटाक्याची प्रचंड आतषबाजी अशा वातावरणात आजरा शहरवासीयांनी दणक्यात व भावपूर्ण वातावरणात बाप्पा मोरयाच्या गजरात गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले.
सकाळी अकरा वाजल्यापासूनच भाविकांनी गणेश मुर्त्या विसर्जनासाठी नेण्यास प्राधान्य दिले. दुपारनंतर मात्र पावसाचा अंदाज घेत अनेकांनी गणेश मुर्त्या विसर्जनासाठी नेल्या. शिवाजीनगर घाट परिसर, वडाचा गोंड घाट परिसर, हिरण्यकेशी नदीकाठ, संताजी पुल परिसर येथे गणेश मुर्त्या विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
अनेक भाविकांनी आजरा नगरपंचायतीने नदी घाटावर घरगुती गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या कुंडामध्ये गणेश मुर्त्या व निर्माल्य विसर्जन केले. तहसीलदार समीर माने, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणेश विसर्जन शांततेत होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

किटवडे धनगर वाड्यावर हत्तीचा धुमाकूळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेतातून चांगले उत्पन्न मिळेल म्हणून सोसायटी, बँकाचे लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. गेले वीस दिवस किटवडे धनगरवाड्यावर ठाण मांडून बसलेल्या टस्करामुळे ऊसासह पिकांचे नुकसान होत आहे. हे कर्ज कशातून फेडणार असा उद्धवीग्न सवाल शेतकरी आर. डी. सावंत यांनी उपस्थित केला आहे.
टस्कराने त्यांचा सहा एकरातील ऊस पिकाचे त्याचबरोबर अन्य शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले आहे.
किटवडे धनगरवाड्यावर गेले महीनाभर टस्कराने तळ ठोकला आहे. हा टस्कर किटवडे परिसरातील पिकांची नुकसान करीत आहे. त्यांने ऊस, भात, भुईमुगाचे नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. येथील शेतकरी आर. डी. सावंत यांच्या सहा एकरातील ऊस पिकाचे टस्कराने नुकसान केले आहे. ऊस फस्त करण्याबरोबर तो तुडवून टाकला आहे. त्याचबरोबर अन्य शेतकऱ्यांचेही नुकसान केले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यानी नुकसानीचा पंचनामा केला आहे. गेले महीनाभर टस्कर नुकसान करीत असून देखील वनविभागकडून टस्कराला हुसकावण्याची कार्यवाही होत नसल्याचा आरोप श्री. सावंत यांनी केला आहे.

ब्लॅक पॅंथरच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्षपदी उदय सावरतकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चांदेवाडी येथील मुंबई स्थित उदय गोविंद सावरतकर यांची ब्लॅक पॅंथर पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे लेखी पत्र संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी त्यांना दिले आहे.
कोकरे ता. चंदगड येथे नुकतीच ब्लॅक पँथर पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी सदर निवड करण्यात आली. तर चांदेवाडी, ता. आजरा येथील सौ. विद्या दशरथ हसबे यांची कोल्हापूर जिल्हा महिला सचिव पदी निवड करण्यात आली. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, तालुका अध्यक प्रा. दीपक कांबळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवून त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी मुगळी गावचे सटुप्पा कांबळे सर, कलिवडेचे रमेश कांबळे सर, विकी कांबळे यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक व आभार दीपक कांबळे यांनी मानले.

मलिग्रे ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्यांचा कालावधी संपत आल्याने गेल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडत, पंढरपूर जागेचा करावयाचा व्यवहार, मुंबई मंडळाची विस्कटलेली घडी, भावेश्वरी मंदिर बांधकाम आढावा या अनूशंगाने गावकरी व मुंबई ग्रामस्थ याच्या समवेत विचारविनीमय करणेकरिता ग्रामसभा आयोजीत केली असलेचे तसेच महिला सरपंच म्हणून गावातील सर्व जनतेने आतापर्यंत सहकार्य केल्याचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना सरपंच शारदा गुरव यांनी सांगितले.
मलिग्रे ग्रामपंचायत तहकूब जनरल सभा गणपतीच्या सणानिमित्ताने आलेल्या मुंबईकर व ग्रामस्थाच्या उपस्थित गावच्या विकासासाठी अनेक प्रश्न मांडण्यात आले. वारकरी मंडळीना दरवर्षी पंढरपूर येथे भाडयाने खोल्या घेण्यापेक्षा गावची हक्काची जागा घेण्याचा मनोदय अर्जुन पारदे यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायत इमारत नव्याने बांधून घ्यावी किंवा ग्राम सचिवालयासाठी प्रस्ताव पाठवा. स्मशान शेड सुशोभीकरण करावे, माजी सैनिकांना कार्यालय मिळावे अशी मागणी जगन्नाथ बुगडे यानी व्यक्त केली.
मुंबई मंडळाचे अध्यक्ष दत्ता मराठे यानी मंडळाचा धावता आढावा घेत आलेल्या अडचणीची माहिती दिली. मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष राऊ बुगडे यानी मंडळासाठी सहकार्य करणार असलेचे सांगितले तर आजरा साखर कारखाना संचालक अशोक तर्डेकर यानी मंडळाच्या एकात्मिक नियोजनाबरोबर गावच्या विकासासाठी सर्वाना सोबत घेऊन वाटचाल करणार असलेचे सांगितलं.
प्रकाश सावंत यानी गावच्या सभोवती रिंग रोड करून शेत शिवारातील पाणंंद रस्ते मुक्त करा तसेच धनाजी बुगडे यानी कोल्हापूर पूणे येथे गावच्या बैठकीच्या खोल्या घेऊन गरीब मुलामुलींचे शिक्षण व नोकरी करीता राहणेची सोय करा. पाझर तलाव वरील शेतीचा व सिरसंगी रस्ता, विकास सेवासंस्था व मुंबई पतपेढी इमारत, भावेश्वरी मंदिर आढावा व जमिनीचा न्यायालयीन प्रश्न, अशा अनेक प्रलंबित कामाचा आढावा घेतला.
यावेळी माजी सरपंच समीर पारदे, अशोक शिंदे उपसरपंच चाळू केंगारे, पोलीस पाटील मोहन सावंत, शिवानंद हासबे, शोभा जाधव, सुरेखा तर्डेकर, संजय बुगडे, पांडुरंग सावंत, शंकर बुगडे, आनंदा बुगडे, मुबंई मंडळाचे कार्यकर्ते विलास बुगडे, ऊतम भगुत्रे, महादेव तर्डेकर, संदीप बुगडे, अँड चंद्रकांत निकम, अँड. मनोहर बुगडे,अँड. विठ्ठल नेसरीकर, चेतन नावलगी, नरेश माणगावकर,उत्तम कागिनकर यांच्यासह मुबंई मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
उत्तूरमध्ये मराठा आरक्षणासाठी उत्स्फूर्त रॅली

उत्तूर : मृत्युंजय महान्युज वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उत्तूर (ता. आजरा) येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गावातील तरुण, व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. “एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेला. रॅलीचा समारोप ग्रामपंचायतीजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आला.
या रॅलीत व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विठ्ठल उत्तुरकर, सदानंद व्हनबट्टे, धोंडीबा सावंत, रमेश ढोणुक्षे,शिरीष ठाकूर, महेश करंबळे, गणपतराव यमगेकर, मंदार हळवणकर, अभिनंदन परुळेकर, विद्याधर मिसाळ,प्रदीप लोकरे, प्रवीण लोकरे, पराग देशमाने, विश्वासराव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

निधन वार्ता
विद्या सूर्यवंशी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दत्त कॉलनी, आजरा येथील विद्या हनुमंतराव सूर्यवंशी ( वय वर्षे ७३ ) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
आजरा हायस्कूलचे सेवानिवृत्त कला शिक्षक हणमंतराव सूर्यवंशी यांच्या त्या पत्नी होत्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यविधी आज बुधवारी सकाळी दहा वाजता होईल.

छायावृत्त…

गेले पंधरा दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे कोरीवडे ता. आजरा येथील मनोहर विष्णू पाटील यांचे घर कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

छायावृत्त…

अति पावसामुळे दाभिल बंधाऱ्यावर वारंवार पाणी आल्याने बंधाऱ्याचे पिलर कमकुवत झाले आहेत.

गणेश दर्शन
क्रांतिसिंह भगतसिंग तरुण मंडळ, सिरसंगी

अध्यक्ष – सुदर्शन बुडके
उपाध्यक्ष – सौरभ देसाई
सचिव – योगेश बुडके
भावेश्वरी सार्वजनिक गणेश मंडळ, मडीलगे

अध्यक्ष : जोतिबा निऊंगरे /गणेश देसाई
सचिव : पांडुरंग सुतार / सुनील येसणे
मार्गदर्शक : मारूती मोहिते, बापु निऊंगरे, जयसिंग निऊंगरे, जनार्दन निऊंगरे, नारायण मुळीक, सचिन गुरव, प्रकाश कडगावकर,तानाजी येसणे
श्रमिक सेवा गणेशोत्सव मंडळ, किणे

अध्यक्ष : महादेव सुतार
उपाध्याक्ष : विष्णू केसरकर
सचिव : परशराम यादव
आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभा…
♦अण्णाभाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणी सकाळी ११.०० वाजता
♦आजरा अर्बन बँक दुपारी २.०० वाजता


