सोमवार दि.२६ जानेवारी २०२६


आजऱ्यात चोरी…
सोन्या चांदीचे दागिने लंपास…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोठण गल्ली, आजरा येथील सत्यजित बाळासाहेब चव्हाण यांच्या रहात्या घरामध्ये दरवाजाचा कडी कोंडा उचकटून प्रवेश करून ६५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
चव्हाण कुटुंबीय बाहेरगावी गेले असता २२ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान सदर प्रकार घडला. याबाबतची फिर्याद सत्यजित बाळासाहेब चव्हाण यांनी आजरा पोलिसांत दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

गोवा बनावटीच्या दारूसह सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल ताब्यात
एका विरोधात गुन्हा नोंद
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खाजगी चार चाकी गाडीतून गोवा बनावटीच्या मद्याची विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे वाहतूक करीत असताना घाटकरवाडी या.आजरा चेक पोस्ट येथील रस्त्यावर पोलिसांनी गुरुदत्त भगवंत पडते रा. फोंडा,साऊथ गोवा यास मद्यासह ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
रविवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घाटकरवाडी चेक पोस्टवर पडते याची चार चाकी थांबवून गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. एकूण पाच लाख २४ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून याबाबतची फिर्याद संजय सदाशिव पाटील यांनी दिली आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार अनिल सरंबळे करीत आहेत.

डॉ.कलाम ज्यूनिअर सायंटीस्ट परीक्षेत
राहत नाईकवाडे हीचा झेंडा…
६ देशात ७ वा क्रमांक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
इकरा ॲकॅडमी ऑफ एकस्लन्स, अकोला यांच्या वतीने डॉ.कलाम ज्युनिअर सायंटिस्ट परिक्षा घेण्यात आली.या परिक्षेत कतार, दुबई, सौदी अरेबिया, बहरीन, संयुक्त अरब अमिराती आणि भारत या देशातील ३ लाख ३० हजार विद्यार्थी बसले होते. यामध्ये आजरा येथील डॉ.झाकिर हुसेन ॲंग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या राहत अनिस नाईकवाडे हीने ७ वा क्रमांक मिळविला.तीला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे.तीच्या यशाने शाळेच्या नावलौकित भर पडली आहे.
सहा देशातील ३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांची तीन वेळा ऑनलाईन लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात आली.
तीन वेळा घेण्यात आलेल्या परिक्षेत सहा देशातील केवळ २५ विद्यार्थी निवडले गेले आहेत.पुणे येथे लेखी व ओरल इंटरव्ह्यू झाली.या २५ विद्यार्थ्यांत राहत ही सातव्या क्रमांकावर आहे.

शंकर नावलकर यांचे निधन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथील शंकर धोंडीबा नवलकर ( वय ७० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे,पाच भाऊ असा परिवार आहे.
वारकरी संप्रदायातील उत्कृष्ट गायक अशी त्यांची ओळख होती .
रक्षाविसर्जन उद्या मंगळवारी सकाळी आहे.

सर्व मनरेगा कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासन व रोहयो विभागाने वारंवार निवेदने, आंदोलन नोटीस व स्मरणपत्र देऊनही कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही.
या पार्श्वभूमीवर, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या एकमताने घेतलेल्या ठाम निर्णयानुसार, दिनांक २३ जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर काळ्या फिती लावून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सर्व तालुकास्तरावर निवेदन सादर करून आंदोलनाची प्रतिज्ञा (शपथपत्र) वाचन करण्यात आले व निषेध म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात काळ्या फिती लावल्या.
शंभर टक्के MIS कामबंद. मनरेगा अंतर्गत सर्व MIS संबंधित कामकाज पूर्णतः बंद ठेवण्यात आले असून कोणतीही डेटा एंट्री, अहवाल तयार करणे, अपलोडिंग, ई-मेल, रिपोर्टिंग किंवा प्रशासनाला सेवा पुरविण्याचे बंद केले आहे. यावेळी विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत.
संघटनेचे अध्यक्ष श्री. रोहन पवार,श्री. सतिश वाढई,श्री. आशीष पानतावणे,श्री. दिपक तंगे,श्री. विशाल अवाड या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.
उत्तूर येथिल योग व निसर्गोपचार महाविद्यालयात ‘तरंग २०२५–२६’ उत्साहात संपन्न

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय, उत्तूरचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘तरंग’ उत्साहात पार पडले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री. दीपक पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. नरसू रामचंद्र पाटील तसेच वैद्य. शिवानी गावंडे (अधिष्ठाता, केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालय, गडहिंग्लज) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्टुडंट गॅलरीचे उद्घाटन व क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ झाला.
दि. १६ व १७ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनचे झोनल मॅनेजर आदरणीय श्री. पुनित अवध द्विवेदी यांच्या हस्ते झाले. यानंतर पारितोषिक वितरण समारंभात विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या स्नेहसंमेलनात कबड्डी, खो-खो, क्रिकेट, धावणे, बुद्धिबळ तसेच नृत्य, गायन, नाट्य व योग प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थी परिषद सल्लागार देसाई , क्रीडा समन्वयक डॉ. जीवन हनवते, सांस्कृतिक समन्वयक डॉ. शीतल बनसोडे व कोष समन्वयक डॉ. किशोर उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


