मुंबई. प्रतिनिधी. १३
महासंचालकांचा शासनाकडे प्रस्ताव.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस शासकीय तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील कामावर हजर राहतात. त्यामुळे पोलीस अंमलदारांना त्या सुट्टय़ांचा उपभोग घेता येत नाही.याची दखल घेत अंमलदारांना त्या सुट्टय़ांचा मोबदला म्हणून एक महिन्याचा पगार देण्यात यावा, असा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी शासनाकडे दिला आहे.
पोलीस अधिकारी, अंमलदार बऱयाचदा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीदेखील कामावर हजर असतात. एका शासन निर्णयानुसार साप्ताहिक सुट्टीच्या मोबदल्यात एका दिवसाचे वेतन दैनिक भत्ता म्हणून शासनाने मंजुरी दिली आहे. हा दैनिक भत्ता देण्यास साप्ताहिक सुट्टीची कमाल मर्यादा एका वर्षात आठ दिवस इतकी आहे. ही मर्यादा आठ दिवसांवरून 30 दिवस करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालकांनी मे 2019 रोजी सादर केला होता. परंतु त्याबाबतचा शासन आदेश अद्याप प्रलंबित आहे. सुट्टय़ांच्या तुलनेत शासकीय कर्मचाऱयांपेक्षा पोलीस वर्षभरात 54 दिवस जास्त काम करतात. शिवाय इतर शासकीय कर्मचाऱयाच्या तुलनेत पोलिसांच्या कामाचे तासदेखील जास्त आहेत. या बाबींचा विचार करता पोलिसांना प्रोत्साहन भत्ता देणे आवश्यक आहे, असे महासंचालकांनी त्यांच्या प्रस्तावात म्हटले आहे.
पंजाब, ओरिसात प्रोत्साहन भत्ता
शासकीय तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून पंजाब राज्यात प्रोत्साहन भत्ता दिला जातो. ओरिसा राज्यात पोलिसांना दरवर्षी एक महिन्याचा पगार जास्तीत जास्त 20 हजार म्हणून प्रोस्ताहन भत्ता दिला जातो. त्याच धर्तीवर राज्यातील पोलिसांनादेखील प्रोस्ताहन भत्ता दिला जावा असा महासंचालकांचा प्रस्ताव आहे.

