सोमवार दि. ९ डिसेंबर २०२४

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला लागा : नाथाजी पाटील
आजरा येथे बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीत महायुतीला आजरा तालुक्यातून भरभरून मिळालेला प्रतिसाद हा स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पोहोच पावती असून तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा या यशामध्ये मोठा वाटा आहे. पाठोपाठ होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांमध्येही एकसंघपणे कार्यकर्त्यांनी सामोरे जाण्याच्या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले. आजरा येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी होते.
यावेळी अशोकअण्णा चराटी म्हणाले, निवडून आलेले तीनही उमेदवार हे आपल्या विचाराचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकांना पुन्हा एक वेळ ताकतीने सामोरे जाऊन पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवू. जास्तीत जास्त सभासद नोंदणीसाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सी.आर. देसाई अनिरुद्ध केसरकर अशोक अण्णा चराटी जयवंत सुतार यांनीही मार्गदर्शन केले.
बैठकीस विकास बागडी, सचिन पाटील उमेश पारपोलकर, गौतम भोसले, संभाजी सरदेसाई यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोग्य कर्मचारी व अधिकारी लाटगावात
अतिसार बाबत दक्षतेच्या सूचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लाटगाव ता.आजरा येथे मोठ्या प्रमाणावर आढळलेल्या अतिसार रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी लाटगाव येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
अतिसाराचे रुग्ण आढळण्यामागे कारण शोधण्यात येत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
मुख्यमंत्र्यांना आमदार हसन मुश्रीफ यांनी दिल्या शुभेच्छा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ना. देवेंद्रजी फडणवीस यांची तिसऱ्यांदा निवड झाली. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी श्री. फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
मुंबईमध्ये विधानभवनात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आमदार श्री. मुश्रीफ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
शुभेच्छा देताना आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून आपल्या नेतृत्वाखाली येत्या पाच वर्षात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होवून महाराष्ट्र राज्य अतिशय मोठी प्रगती करेल.
महाविकास आघाडीची उद्या आज-यात बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उ.बा.ठा.), श्रमिक मुक्ती दल, गिरणी कामगार संघटना व अन्य मित्र पक्ष संघटना यांची व्यापक बैठक मंगळवार दि १० डिसेंबर रोजी दुपारी ठीक ३ वाजता जनता सहकारी बँक आजरा यांचे सभागृह आयोजित केली आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणे. पराभवाची कारणमीमांसा करणे,एव्हीएम किंवा तत्सम गोष्टींचा वापर करून लोकशाही व्यवस्था मोडून काढून सत्तेवर आलेल्या सरकार विरोधात आंदोलनात्मक कृती कार्यक्रम आखणे, आजरा तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांची चर्चा करून त्यावर पुढच्या काळात एकसंघपणे लढणे या विषयावर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
दत्त जयंती उत्सवानिमित्त होनेवाडीत स्वच्छता मोहीम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दत्त जयंती निमित्त राजर्षि शाहू व्यायाम शाळा होनेवाडी यांच्यामार्फत दरवर्षीप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली .
गेली २५ वर्ष गावातील सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे दरवर्षी दत्तजयंतीच्या सुरुवातीला ही स्वच्छता मोहीम राबवली जाते.यावेळी व्यायाम शाळेतलीही स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छता मोहीमेसाठी व्यायाम शाळेच्या कार्यकारी टीम व सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली .
उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कराड येथील परवाज फौंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत येथील डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्हयातील उर्दू शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत चित्र कला स्पर्धेत आसिया अबुतल्ला नाईकवाडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. इंग्रजी व्याकरण मध्ये इकरा माणगावकर हिने दुसरा क्रमांक पटकाविला. बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेत युसरा बुड्ढेखान हिने तृतीय क्रमांक मिळविला. उर्दू निबंध लेखन स्पर्धेत आस्का वाडीकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. याबरोबरच १५ विद्यार्थीनींनी सहभाग प्रमाणपत्र व पदक मिळविले. या विद्यार्थीनींना प्रभारी मुख्याध्यापक सलीम शेख, आर. एम. मुजावर, यासीन सय्यद, एम. क्यू बुखारी, वाय. वाय. बुड्डेखान सर्वांचे मार्गदर्शन लाभले.





