mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनीवार  दि.१५ फेब्रुवारी २०२५

तालुक्यात तीन ठिकाणी आग…
पाच लाखांचे नुकसान

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       काल शुक्रवारी आजरा तालुक्यामध्ये तब्बल तीन ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडून यामध्ये सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

       भादवण येथे दुपारी लागलेल्या आगीत रणजीत पाटील यांच्या शेतातील पाणीपुरवठा योजनेचे पाईप व गवताचे सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत ही आग सुरूच होती. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पेटवलेल्या उसाच्या फडामुळे सदर आग पसरल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

       कानोली येथील रामचंद्र बाबुराव मुरकुटे यांच्या काजू बागेस दुपारी लागलेल्या आगीमध्ये सुमारे तीनशे काजूच्या झाडांसह गवत आगीचा भक्षस्थानी पडले. शॉर्टसर्किटने सदर आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. आजरा – आंबोली मार्गावरील लागलेल्या आगीत झाडांचे व गवताचे मोठे नुकसान झाले आहे.

        तालुक्यात सर्वत्र आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. दुपारच्या वेळी आग लागत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवताना संबंधितांची चांगलीच दमछाक होताना दिसते ‌.

भावेवाडी येथे साकव बांधकाम शुभारंभ

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       मौजे भावेवाडी ता.आजरा येथील साकव बांधकामाचा शुभारंभ चंदगड विधानसभेचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला.

       यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, येथून पुढे सुद्धा वाड्या वस्तीवर विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही.कुणी पराभवाने खचून न जाता जोमाने आणि ताकदीने कामाला लागा.

       यावेळी माजी सभापती अल्बर्ट डिसोजा,माजी बाजार समिती अध्यक्ष अभय देसाई,कारखाना संचालक शिवाजी नांदवडेकर, संचालक सुभाष देसाई,गावच्या सरपंच रत्नप्रभा भुतूरले,सदस्य अजित राणे,माया गुडलकर,संगीता यडगे,मारुती गुरव,मधुकर यलगार,मारुती चव्हाण,आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

मलिग्रे येथे अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

      मलिग्रे येथे अंतर्गत रस्त्याच्या विकास कामांचा शुभारंभ माजी आमदार राजेश  पाटील  यांच्या हस्ते झाला यावेळी अल्बर्ट डिसोजा, अभय देसाई, आजरा साखर कारखान्याचे नूतन व्हा. चेअरमन सुभाष देसाई, संचालक एम. के देसाई, राजू मुरकुटे, मधुकर यलगार, अशोक शिंदे, आनंदराव बुगडे, नाना नेसरीकर, शिवाजी नेसरीकर, दिलीप बुगडे, उत्तम लोहार, आनंदा घोरपडे, सुधाकर घोरपडे, भिकाजी सुतार, किशोर जाधव, विनायक चोगुले, बबन बुगडे, बाळू कांबळे आणि  ग्रामस्थ  उपस्थित होते.

आज-यात भाजपा सदस्य नोंदणी वेगावली

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालुक्यामध्ये भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम वेगाने सुरू आहे. भारतीय जनता पार्टी संघटन पर्व २०२५ अभियान अंतर्गत आजरा येथे छत्रपती संभाजी महाराज चौकात भाजप सदस्यता नोंदणी करण्यात आली. यावेळी ४ हजार सदस्य नोंदणीचे उद्धिष्ठ असल्याचे सुधीर (बापू) कुंभार यांनी स्पष्ट केले.

        महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात साधारण दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असून आज अखेर राज्यात एक कोटी सदस्य संख्या नोंदणी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील व चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले.

       यावेळी अनेक युवक, युवती, प्रौढ, वृद्ध नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष सदस्यांच्या दारोदारी घरापर्यंत पोहचावा, त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोबाईल नंबरसह यावेळी माहिती घेण्यात आली असल्याचे सुधीर कुंभार यांनी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीपणे राबविले जात आहे.

      यावेळी अरुण देसाई, आनंदा कुंभार, मलिककुमार बुरुड, श्रीपती यादव, जयसिंग शेंदरकर, विनोद जाधव, राजेंद्र चंदनवाले, दीपक बल्लाळ, आनंदा पाटील, अभिनंदन परुळेकर, रामजी पाटील, सचिन इंदलकर, विनोद जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गिरणी कामगारांचा सोमवारी आजऱ्यात मेळावा… पूर्व तयारीसाठी बैठक

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मुंबई घडविणाऱ्या गिरणी कामगारांना वांगणी व सेलूची घरे नको आम्हाला मुंबईमध्येच मोफत घरे द्या या मागण्यासाठी तिव्र आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. सर्व गिरणी कामगारांनी जवळपास असणाऱ्या आपल्या विभागातील सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आजरा तालुका गिरणी कामगार अध्यक्ष कॉम्रेड शांताराम पाटील यांनी केले. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते.

        या सभांना मार्गदर्शन करण्याकरिता व सद्य परिस्थितीची माहिती देण्याकरिता मुंबईहून सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड उदय भट, कॉम्रेड अतुल दिघे, कॉम्रेड बी के आंब्रे, कॉम्रेड विजय कुलकर्णी, कॉम्रेड दत्तात्रय अत्याळकर, येणार आहेत आपण सर्व गिरणी कामगार वारसदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
कॉ. शिवाजी सावंत यांनी सभेला मार्गदर्शन केले . या बैठकीस संघटनेच्या कार्यालयात प्रत्येक गावातील अध्यक्ष, नारायण राणे हिंदूराव कांबळे विठ्ठल बामणे बाबु केसरकर गोपाळ रेडेकर मनाप्पा बोलके गणपत ढोणुक्षे शांताराम हरेर आनंदा ढोकरे अर्जुन घेवडे उपस्थित होते.

       सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रचंड मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नाट्यछटा स्पर्धेत आजरा हायस्कूल प्रथम

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गंगामाई वचन मंदिर आजरा मार्फत कै. सौ.शुभांगी गजानन वायंगणकर यांचे स्मृती प्रीत्यर्थ आयोजित नाट्यछटा स्पर्धेत ६ ली ते १० वी मोठ्या गटात कुमारी रिया संतोष पारपोलकर हिचा प्रथम क्रमांक तर १ ली ते ५ वी लहान गटात कुमारी त्रिशा अतुल पाटील हिचा द्वितीय क्रमांक आला. रोख रक्कम ट्रॉफी व प्रमाणपत्र अशा स्वरूपाचे पारितोषिक सदर विद्यार्थिनींना प्राप्त झाले.

      या विद्यार्थिनींना श्री. व्ही. ए.पोतदार, सौ बी पी पाटील व स्पर्धा विभाग प्रमुख सौ.एस. एस. कुराडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. पी. होलम, उपमुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर, पर्यवेक्षक सौ. एच. एस. कामत यांचे प्रोत्साहन लाभले.

निधन वार्ता
जयश्री तेली

       आरदाळ ता. आजरा येथील अंगणवाडी सेविका सौ.जयश्री दत्तात्रय तेली (वय ५५ वर्षे) यांचे आकस्मिक निधन झाले.

       त्यांच्या पश्चात पती,एक अविवाहित मुलगा,एक विवाहित मुलगी , जावई असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते दत्तात्रय तेली यांच्या त्या पत्नी होत.

शालन साटपे

       सिरसंगी ता.आजरा येथील शालन प्रकाश साटपे (वय ५६ वर्षे) यांचे मुंबई येथे अल्पश: आजाराने निधन झाले.

       त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

      रक्षा विसर्जन शनिवारी सकाळी ९ वाजता सिरसंगी येथे होईल.गोठणदेव दूध संस्थेचे चेअरमन नारायण साटपे यांच्या त्या भावजय होत.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

थोडे हटके
पळवा पळवी…

                  ज्योतिप्रसाद सावंत

       आजरा शहर व परिसरात सुरू असणारे कांही प्रकार पाहता दादा कोंडके यांच्या ‘पळवा पळवी’ या चित्रपटाची आठवण निश्चितच येते. या चित्रपटामध्ये एखादा कार्यक्रमात असो किंवा एखादे आजूबाजूचे साहित्य असो जे हाताला लागेल ते पळवून नेणे गैर मानले जात नाही.

       या चित्रपटाप्रमाणे आजरा शहरामध्ये तर सध्या एक-दोन दिवस उघड्यावर पडलेले साहित्य तिसऱ्या दिवशी गायब होण्याचे प्रकार निश्चितच वाढले आहेत.

        एखाद्याचा गॅस सिलेंडर,टी.व्ही., पाण्याचा बंब गायब होतो, तोपर्यंत दुसरा एखादा गाडीची बॅटरी, उभ्या गाडीतील पेट्रोल चोरीला गेले असे सांगू लागतो. शहरामध्ये बंद घरे तर यापूर्वीच चोरट्यांनी टार्गेट केली आहेत.

       यावर कहर म्हणजे चक्क बांधकामाचे दगड, नदीकाठच्या पाण्याच्या मोटर्सच्या वायरी, शेतात काढून ठेवलेले वाटाण्यासारखे पीकही आता रातोरात गायब होऊ लागले आहे. बांधलेली जनावरेही याला अपवाद ठरेनाशी झाली आहेत.

      एकंदर या पळवापळवीने केवळ पोलीस खातेच नाही तर तालुकावासीयही चांगलेच जेरीस आले आहे हे मात्र नक्की…

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!