mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि.१४ फेब्रुवारी २०२५

होन्याळी येथे शेतीच्या वादातून भावावर खुरप्याने हल्ला

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      होन्याळी (ता. आजरा) येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारामारीत खुरप्याने वार केल्याने सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला. गणपती दत्तू मोरबाळे (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. याबाबत भाऊ विष्णू दत्तू मोरबाळे यांच्या विरोधात आजरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घरी येत असताना विष्णू यांनी गणपतीला शिवीगाळ केली. मघापासून कोठे होतास ? असे विचारत खुरप्याने गणपतीवर हल्ला केला. खुरप्याचे टोक गणपतीच्या डोळ्याला लागले. गणपतीच्या पत्नीलाही संशयिताने कानाखाली मारले.

      गणपती मोरबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विष्णू मोरबळे यांच्या विरोधात गुन्हा  नोंद करण्यात आला आहे.

उत्तूर येथे दुकान फोडून लाखाचा मुद्देमाल लंपास

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       उत्तूर ता. आजरा येथील बस स्थानकानजीक असणारे तौसिफ रशीद नाईकवाडे यांचे साई एंटरप्राईजेस नावाचे दुकान बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील लाखभर रुपयांचा माल लंपास केला आहे.

       बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे गडहिंग्लज- गारगोटी मार्गावर उत्तूर बसस्थानकानजीक असणारे  आपले दुकान बंद करून नाईकवाडे गेले असता अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील बाजूस घेऊन पत्रा उचकटून दुकानातील ९६ हजार रुपये किंमतीची उंची सिगारेट पाकिटे, रेड बुल सारखी महागडी शीतपेये व अन्य साहित्य लंपास केले.

       तौसिफ यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाजीराव कांबळे करीत आहेत.

आजरा येथे रक्त चाचणी शिबिर उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सत्संग परिवारातर्फे आजरा भवन येथे ग्रामीण रुग्णालय आजराच्या सहकार्याने रक्त चाचणी शिबीर संपन्न झाले.

       आजरा ग्रामीण रुग्णालयाचे श्री.गंधाडे ,श्री.मुजावर ,श्री.देवराज सुतार.स्वप्नाली मॅडम,व ईतर स्टाफ तसे आजरा ब्रॅंच मुखी भिकाजी पाटील व सेवादल युनिट संचालक संजय शेणवी हे उपस्थित होते.

      महात्मा ज्योतीराव फुले योजने मधून ५० किटची उपलब्धता असतानाही १०४ लाभार्थींनी याचा लाभ घेतला.येत्या शनिवारी आजरा भवन येथे डाॅ.पुरुषोत्तम व इतर डाॅक्टर्स यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य शिबीर सर्वांच्या प्रसादीसह आयोजित करण्यात आले आहे.तरी साथसंगत व सेवादल यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

‘व्हॅलेंटाईन डे ‘वर निर्बंध घाला
बजरंग दलाची मागणी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पाश्चात्य देशांशी संबंधित असलेला ‘व्हॅलेंटाईन डे ‘ साजरा करून आजची तरुण पिढी भरकटत आहे. अशा प्रकारचे ‘डे’ हे युवा पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र असून यामागे मोठ्या आस्थापनांचे छुपे अर्थकारणही लपलेले आहे. यामुळे आर्थिक हानीसह या देशातील भारतीय संस्कृतीची अपरिमित हानी अशा चुकीच्या ‘डे’मुळे होत आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे साजरे करण्यावर निर्बंध आणावेत अशा आशयाचे पत्र बजरंग दलाच्या वतीने आज पोलिस दलाला देण्यात आले आहे.

       १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून मोठ्या प्रमाणात तरुणाई कडून साजरा केला जातो हा दिवस साजरा करत असताना चुकीच्या प्रथा वा चुकीच्या घटना घडत असतात. हा दिवस साजरा करण्यासाठी तरुणाई प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल, कॅफे, बागा, चित्रपटगृहे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जमा होतात यातून अनेकदा वाईट प्रसंग घडले आहेत यामुळे समाजामध्ये ताणतणाव निर्माण होतात. असे विविध प्रसंग घडून समाजातील शांतता भंग होऊ नये म्हणून आपल्या पोलिस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जावी. स्वैराचाराचे समर्थन करून समाजव्यवस्था मोडकळीस आणणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला भारतीय समाजातून हद्दपार केले गेले पाहिजे.

        १४ फेब्रुवारी दिवशी पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक निर्बंध आणून चुकीच्या प्रथेस आळा घातला जावा अशी मागणी बजरंग दलाने केली आहे.

      या निवेदनावर राहुल नेवरेकर.श्रेयस सकट,प्रणव येजरे,अनुज डोणकर, अशोक बोलके,दिग्विजय सुतार व मंथन हरमळकर यांच्या सह्या आहेत.

आजरा येथे सुगम गायन स्पर्धा उत्साहात

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरातर्फे कै उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित सुगम गायन स्पर्धेत आजरा, गडहिंग्लज, भुदरगड व चंदगड तालुक्यातील ७० स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

      इयत्ता पहिली ते पाचवी गटात आदित्य सुनिल नाईक (आजरा) याने प्रथम क्रमांक मिळविला, कु. आर्या पिलाजी गावडे (लाटगाव) हिने व्दितीय तर कु. कृतिका महेश खोत (गडहिंग्लज) हिने तृतीय क्रमांक मिळवीला.

      इयत्ता सातवी ते बारावी गटात कु. दिप्ती संतोष सुतार (बेगवडे ता. भुदरगड) हिने प्रथम क्रमांक मिळविला, कु. शलाका ओमकार गिरी (आजरा) हिने व्दितीय तर विनया संतोष देसाई (कोळींद्रे) हिने तृतीय क्रमांक मिळवीला .

      विजेत्यांना  अनंत मायदेव व सौ. भाग्यश्री मायदेव, वामन सामंत व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

      यावेळी वाचनालयाचे सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, महंमदअली मुजावर, डॉ. अंजनी देशपांडे, सुचेता गडडी, गिता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, संजय शेणवी, बाळासाहेब आपटे, सुरेश सुतार, गिता तेजम, शोभा कुंभार, रेवती जांभळे, सानिका मिसाळे, प्रा. संदीप देसाई, निखिल कळेकर, लहू केरकर, महादेव पाटील, महादेव पोवार यांसह संगीतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. वृषाली वाळके यांनी सुत्रसंचालन केले तर कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी आभार मानले .

आजरा सूतगिरणी येथे आरोग्य तपासणी शिबीर 

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आण्णा भाऊ आजरा सूत गिरणीचे संस्थापक कै. काशिनाथ चराटी आण्णा व कै. माधवराव देशपांडे भाऊ यांच्या जन्मदिन सप्ताहानिमित्त आजरा सूत गिरणी परीवारातील सदस्यांकरीता आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करणेत आले होते.

      ई.एस.आय.सी सेवा दवाखाना, शिनोळी व कागल यांचेमार्फत महाराष्ट्र शामलाने घोषीत केलेल्या १०० दिवसांचे कार्यक्रम अंतर्गत आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणेकरीता सूत गिरणीतील ई.एस.आय.सी चे सदस्य कामगार कर्मचारी यांचेकरीता आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करणेत आले होते शिबीराचे उदघाटन सूत गिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी यांचे हस्ते करणेत आले प्रास्ताविक संस्थेचे जनरल मॅनेजर अमोघ वाघ यांनी केले.

      शिबिरामध्ये ई.एस.आय.सी सेवा दवाखाना शिनोळी व कागल यांचेकडून ई पहचान कार्ड रजिस्ट्रेशन अपडेट करणे तसेच बी.पी.शुगर, सी.बी.सी तसेच इतर आजारांबावत मार्गदर्शन करून आवश्यक ती औषधे कामगारांना देणेत आली. याप्रसंगी अनिकेत चराटी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणेत आल्या. सूत गिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी व व्हा.चेअरमन डॉ. अनिल देशपांडे, राजु पोतनीस, जयसिंगराव देसाई, हसन शेख, मनिषा कुरूणकर यांचेसह अधिकारी वर्ग उपस्थित होता.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

खानापूर ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

       संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०२३-२४ अंतर्गत खानापूर ग्रामपंचायतने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये सौ.माधुरी परिट, प्रकल्प संचालक ,जल जीवन मिशन, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या टीमने कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांची तपासणी करण्यात आली.

        यामध्ये आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत खानापूर या ग्रामपंचायतीने २०० गुणांपैकी १९० गुण मिळवून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदर बक्षीस मिळवणेकामी ग्रामपंचायतचे सरपंच संकल्पना डोंगरे, उपसरपंच श्री. आनंदा राणे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. विशाल दुंडगेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. विश्वास जाधव, श्री युवराज जाधव, श्रीमती माधुरी गुरव, सौ. अलका चव्हाण, सौ. सुशीला जाधव ,सौ. सीताबाई दोरूगडे यांनी विशेष प्रयत्न केले.

        सदर जिल्हास्तरीय समितीमार्फत ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ,वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय शालेय शौचालय गावातील परिसर याची पाहणी करण्यात आली. खानापूर ग्रामपंचायतीला सदर अभियानांतर्गत रक्कम रुपये सहा लक्ष इतके बक्षीस मिळवले आहे. याव्यतिरिक्त स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन यासाठी रक्कम रुपये पन्नास हजार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अंतर्गत पाणी गुणवत्ता व व्यवस्थापनासाठी रक्कम रुपये पन्नास हजार असे दोन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत खानापूर यांना देण्यात आलेले आहेत. यासाठी श्री. संजय ढमाळ, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, आजरा श्री बी.टी.कुंभार विस्तार अधिकारी पंचायत व श्री. आबासाहेब मासाळ, विस्तार अधिकारी पंचायत यांचे मार्गदर्शन लाभले.

निधन वार्ता
उदय पारपोलकर

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      रवळनाथ कॉलनी, आजरा येथील उदय घनश्याम पारपोलकर (वय २७ वर्षे ) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात आई, विवाहित भाऊ, बहिण असा परिवार आहे.



      आज तालुक्यात



      मौजे भावेवाडी  येथील साकव कामाचा शुभारंभ माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते  आयोजित करण्यात आला आहे.

 

संबंधित पोस्ट

पेरणोली येथे गव्याचा हल्ला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सभासदांच्या व हितचिंतकांच्या भक्कम पाठबळावर ‘जनता बँकेची’ वाटचाल : अध्यक्ष मुकुंदराव देसाई … बँकेची 60 वी वार्षिक सभा उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!