बुधवार दिनांक १४ मे २०२५

उसने उमेदवार नकोच…
त्याच प्रवर्गातील स्थानिक उमेदवारांचा शोध सुरू….

ज्योतिप्रसाद सावंत
येत्या चार महिन्यात आजरा नगरपंचायतीचा गेली दोन वर्षे प्रलंबित असणारा निवडणूक कार्यक्रम पावसाळा संपताच होणार असून या निवडणुकीमध्ये प्रभाग बदलून उमेदवारी घेणाऱ्या उसन्या उमेदवारांना उमेदवारी देणे प्रभागातील स्थानिक इच्छुकांच्या दृष्टीने अन्यायकारक होणार असून त्याच प्रभागात मतदार यादीत नाव असणाऱ्या व संभाव्य जाहीर होणार असणाऱ्या प्रवर्गातीलच उमेदवार असावा अशी मागणी होऊ लागली असल्याने होणाऱ्या या अटीतटीच्या निवडणुकीत संभाव्य धोका टाळण्याच्या उद्देशाने नेते मंडळींनी आता प्रभागवार अशा स्थानिक व संबंधित प्रवर्गातीलच उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.
यावेळी नगरपंचायतीकरीता इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रत्येक प्रभागामध्ये स्थानिक इच्छुक गेली पाच-सात वर्षे मशागत करत आहेत. असे असताना काही इतर प्रभागातील मंडळी प्रभाग बदलून खुल्या प्रवर्गाकरिता जाहीर होणाऱ्या प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु अशा प्रभाग बदलून उमेदवारी घेणाऱ्या मंडळींना प्रभागांमध्ये स्वीकारण्याची स्थानिक तरुणाईची व मतदारांची मानसिकता दिसत नाही. केवळ प्रभागच नव्हे तर प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर बाहेरच्या प्रभागातील मंडळींना उमेदवारी दिल्यास स्थानिक संबंधित प्रवर्गातील आरक्षित व उपलब्ध असणाऱ्या इच्छुक मंडळींना सुमारे पंधरा वर्षे कट्ट्यावर बसावे लागणार आहे.
या सर्व बाबी विचारात घेऊन नेतेमंडळींनीही स्थानिक उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.
जेवणावळींसह रंगीत -संगीत पार्ट्यांना सुरुवात…
पावसाळ्याच्या मर्यादा लक्षात घेऊन अनेक इच्छुकांनी आतापासूनच आपल्या समर्थक मंडळींकरीता देवपण, वाढदिवस आदींचे कारण पुढे करून जेवणावळी सुरू केल्या आहेत. निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानावेळी खाल्ल्या मिठाला कार्यकर्ते कितपत जागणार हा विषय तुर्तास बाजूला आहे.

कीटकनाशक प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ता. आजरा येथील महादेव आप्पा आपटे या ५५ वर्षीय व्यक्तीने चार दिवसापूर्वी कीटकनाशक प्राशन केले होते. उपचारासाठी त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्दीवरून सदर मृत्यूची नोंद पोलिसात झाली आहे.

रवळनाथने जवानाला दिले २४ तासात गृहकर्ज… संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल चौगुले यांची माहिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येळ्ळूर, जि. बेळगाव येथील श्री. निलेश पुंडलिक धामणेकर या सीमा सुरक्षा दलातील जवानाला घर बांधण्यासाठी कर्ज हवे होते. त्यासंदर्भात त्याने श्री रवळनाथ को ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी या संस्थेच्या बेळगाव शाखेकडे कर्जाची मागणी केली होती. या जवानाला रवळनाथ संस्थेने २४ तासामध्ये सर्व प्रक्रिया पुर्ण करुन गृहकर्ज मंजूर केले. अशी माहिती रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल चौगुले यांनी दिली.
श्री. निलेश धामणेकर हे सीमा सुरक्षा दलात जवान असून सध्या ते बेंगलोर येथे कार्यरत आहेत. कांही दिवसापुर्वी ते आपल्या गावी सुट्टीवर आले होते. दरम्यान सुट्टी कालावधीत गावी घर बांधण्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी रवळनाथच्या बेळगाव शाखेकडे कर्जाची मागणी केली सुट्टीमध्ये सर्व कर्ज प्रक्रिया पुर्ण करुन ते कामावर हजर होणार होते. परंतू भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुट्टी संपण्यापुर्वीच त्यांना तातडीने कामावर हजर होण्याचा आदेश मिळाला. गावी घर बांधण्याचे आपले स्वप्न पुर्ण होईल की नाही याची साशंकता त्यांच्या मनात निर्माण झाली. निलेश यांच्या समोरील परिस्थिती लक्षात घेऊन रवळनाथ संस्थेने एका दिवसात त्यांच्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन घेवून त्यांचे गृहकर्ज तातडीने मंजूर केले.
श्री. एम एल. चौगुले म्हणाले, स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकीसह महिला आणि सैन्यदलातील जवानांना प्राधान्याने कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्याचे धोरण राबविले आहे. आजपर्यंत संस्थेने ४००० हजाराहून अधिक घरे बाधण्यासाठी कर्जे दिली आहेत. यामध्ये ४०० हून अधिक घरे ही सैन्यदलातील जवानांची आहेत. सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळेच देशातील नागरीक सुरक्षित आहेत त्यामुळे त्यांचे कुटुंबीय सुरक्षित कसे राहतील याची जबाबदारी आपली सर्वांची आहे त्यामुळेच रवळनाथने ही सहकार्याची भुमिका घेतली आहे.
याकामी रवळनाथच्या उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे, सर्व संचालक, बेळगाव शाखेचे चेअरमन प्राचार्य आनंद मेणसे सर्व शाखा सल्लागार व शाखाधिकारी श्री. मल्लिकार्जुन पाटील यांचे सहकार्य लाभले.

दहावी परीक्षेत आजरा तालुका निकाल ९७.८३ टक्केवर
२४ शाळांचा निकाल शंभर टक्के

दहावी परीक्षेचा आजरा तालुक्याचा निकाल ९७.८३ टक्के इतका लागला असून परीक्षेसाठी तालुक्यातून सामोरे गेलेल्या १ हजार २४७ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २२० विद्यार्थी पास झाले आहेत. तालुक्यातील २४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
आजरा तालुक्यातील शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे :
उत्तुर विद्यालय – ९२.२० टक्के
आजरा हायस्कूल ९६.६२ टक्के
डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल आजरा ९३.४४ टक्के
भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी ८८.८८ टक्के
एरंडोल हायस्कूल. ९२.८५ टक्के
चोरगे माध्यमिक विद्यालय बेलेवाडी ८७.५० टक्के
दाभिल हायस्कूल ९२.८५ टक्के
१००% निकाल लागलेल्या शाळा
व्यंकटराव हायस्कूल आजरा, भादवण हायस्कूल, भादवण, कर्मवीर विद्यालय चिमणे, मलिग्रे हायस्कूल मलिग्रे, रोझरी इंग्लिश स्कूल आजरा, वसंतरावदादा पाटील विद्यालय उत्तुर,
श्री सरस्वती हायस्कूल हत्तीवडे, बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे, आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड, आदर्श हायस्कूल शिरसंगी, राजाभाऊ केसरकर हायस्कूल निंगुडगे, पेरणोली हायस्कूल, पेरणोली, चाफवडे हायस्कूल, चाफवडे, माध्यमिक विद्यालय आरदाळ, मडीलगे हायस्कूल, मडिलगे,पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा,वाटंगी हायस्कूल, वाटंगी,केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी, आदर्श माध्यमिक विद्यालय सरंबळवाडी, छत्रपती शिवाजी विद्यालय होन्याळी, श्री रवळनाथ हायस्कूल देवर्डे, माध्यमिक विद्यालय कोळिंद्रे, पार्वती शंकर विद्यालय उत्तुर ,डायनॅमिक पब्लिक स्कूल सुळेरान.




