mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


मोडक्या बस स्क्रॅपला घाला…

वेळापत्रक कोलमडलेच त्यात मोडक्या बसमुळे पश्चाताप

                     आजरा : प्रतिनिधी

      आजरा एसटी आगार म्हणजे ‘असून हरकत आणि नसून खोळांबा’ अशी विचित्र परिस्थिती अलीकडे बनली आहे.बस फे-यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले असतानाच नादुरुस्त बसेस ठीक-ठिकाणी बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने आगार नेमके प्रवाशांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी ? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. आता या जादा वापरलेल्या बसेस भंगारात घालण्याची गरज आहे.

      गेले काही दिवस ग्रामीण भागातील व आजरा – गडहिंग्लज मार्गावरील बस फेऱ्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. ऐनवेळी बस फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

       प्रवास करत असणारी बस वेळेत पोहोचेलच याची खात्री प्रवाशांना देता येत नाही. बसेस मध्येच बंद पडणे, पंक्चर होणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. जत्रा- यात्रा सह प्रासंगीक करारासाठी स्थानिक वेळापत्रकाकडे लक्ष न देता बसेस दिल्या जात असल्याने ऐनवेळी बस फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

    ग्रामीण भागात तर मनमानी पद्धतीने बस फेऱ्या सुरू असल्याने शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिला व इतर प्रवाशांचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत.

       आजरा आगाराचा कारभार सुधारणार तरी कधी असा प्रश्न ? आता उपस्थित होऊ लागला आहे.

आता तरी सुधारा…

     खाजगी गाड्यांचे प्रमाण वाढत असताना आजरा- कोल्हापूर मार्गावर एकमेव नॉनस्टॉप गाडी सुरू आहे. तीही नावालाच विना थांबा आहे, हा विषय वेगळा. कोकणासह आदमापूर, शिर्डी, पंढरपूर,सांगली भागात गाड्यांचा पत्ता नाही. केवळ गडहिंग्लज आणि बेळगाव मार्गावरील फेऱ्यांवर किती दिवस काढणार ? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.

गडहिंग्लज मार्गावर वेळेत बसेस सोडा

     आजरा-गडहिंग्लज मार्गावर नोकरदार, विद्यार्थी वर्ग, रुग्ण हे प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करत असतात परंतु या मार्गावरही सायंकाळी सहानंतर आज-याच्या दिशेने केवळ कागदावरच बस फे-या आहेत. सकाळच्या सत्रात तर बस फेऱ्या वेळेवर लागत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

प्रतिभा शिंदे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार…….

                    आजरा : प्रतिनिधी

       यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार लोकसंघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना देण्याची घोषणा द. ना. गव्हाणकर पुरस्कार समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

     जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधनावर प्रथम अधिकार हा स्थानिक समूहांचा असला पाहिजे अशी भूमिका घेऊन तापी, नर्मदा खोऱ्यातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील सीमावर्ती भागातील आदिवासी समूहांना संघटीत करून त्यांनी लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विकासाचा मुख्य प्रवाह हा येथील वंचित समूहांच्या सहभागाशिवाय व पर्यावरण पूरक धोरणांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही हा मुद्दा सातत्याने लावून धरला. शासन आणि प्रशासनाला त्यावर भूमिका घ्यायला भाग पाडले.

      शालेय जीवनापासून कार्यकर्ती म्हणून छात्रभारती व सेवादल या पुरोगामी चळवळीत त्या वाढल्या आहेत. बी.एस्सी. फिजिक्स मधून शिक्षण घेत त्यांनी एम.एस.डब्लू. पदवी संपादन केली. पदवी घेतल्यानंतर प्रस्थापित वाट न चोखाळता त्यांनी सातपुडा पर्वतातील आदिवासींच्या लढ्याचे त्यांनी संघटना बांधून आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी लढा उभारला. शेतकऱ्यांच्या पिकला हमीभाव मिळावा, त्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी ५० हजार शेतक-यांचा मोर्चा दिल्लीला नेला. २५ हजार आदिवासी स्त्री पुरुषांना संघटीत करून नंदुरबार ते मुंबई असा ४८० किमी पायी धडक मोर्चा त्यांनी मंत्रालयावर काढला. दिल्लीला एक वर्ष चाललेल्या शेतकरी आंदोलनात त्या १२०० महिला घेऊन त्या सहभगी झाल्या.

       गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ शोषित जनतेच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या म्हणून जनसंघर्षात त्या नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. एक प्रकारे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांचा वैचारिक वारसा आपल्या कृतीशील जगण्यातून त्या पुढे घेऊन जात आहेत. म्हणूनच त्यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार त्यांना आम्ही देत आहोत.

       पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष मोहनराव देसाई, मुकुंददादा देसाई, अल्बर्ट डिसोझा, कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, सचिव सुनील पाटील, डॉ. नवनाथ शिंदे, मनोहर गव्हाणकर, दिगंबर लोहार, संजय घाटगे, प्रा. भीमराव पुंडपळ, रणजीत कालेकर, कृष्णा सावंत यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

आजऱ्यात दहावीच्या परीक्षेला १९२३ विद्यार्थी प्रविष्ठ

                    आजरा : प्रतिनिधी

       आजरा तालुक्यात दहावीच्या परीक्षेला ११२३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. परीक्षेसाठी चार केंद्र आहेत. आज पहिला मराठीचा पेपर असल्याने विद्‌यार्थी व पालकांची गर्दी परीक्षा केंद्राजवळ दिसून आली. आजरा हायस्कूल येथील केंद्रावर बी. एम. दरी, व्यंकटराव हायस्कूल येथील केंद्रावर अनिल देसाई, उत्तूर वि‌द्यालय येथे शैलेंद्र आमणगी, पार्वती शंकर वि‌द्यालयाला मुनाफ शिकलगार असे केंद्र संचालक नेमले आहेत. कॉपीचे प्रकार घडू नयेत म्हणून बैठे पथक व भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

       भरारी पथकामध्ये नायब तहसीलदार, सहाय्यक गटविकास अधिकारी व बांधकामचे उपअभियंताचा समावेश आहे. गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा केंद्रावर विविध पथक कार्यरत आहे. परीक्षा कामकाज स्रळीत करण्यासाठीच्या आवश्यक सूचना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिल्या आहेत.काल पासून सुरु झालेली परीक्षा २६ मार्च पर्यंत सुरु राहणार आहे.

रस्सीखेच स्पर्धा

                      आजरा: प्रतिनिधी 

          शिवप्रेमी तरुण मंडळ, गजरगाव यांच्या वतीने ५०० किलो वजनी गटामध्ये महाशिवरात्रीनिमित्त रस्सीखेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.१० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ७००१/-रुपये, ५००१/-रूपये,३००१/- रूपये व २००१/- रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

बामनादेवी पतसंस्थेने घेतलेली भरारी कौतुकास्पद : आ. राजेश पाटील

                    आजरा: प्रतिनिधी

        जेऊर सारख्या छोट्या गावातील पतसंस्थेने लोकांचा विश्वास संपादन करून इथल्या गोरगरीब जनतेची अडचण दूर केली. संस्थेने सहकारात केलेली प्रगती ही कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आ. राजेश पाटील यांनी केले. ते पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होते.

    यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, मुकुंद देसाई, सुधीर देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

     आ. राजेश पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले, एका छोट्या धरणग्रस्त गावातील ही संस्था असली तरी या संस्थेने इतर गावांना एक आदर्श घालून दिला आहे. सहकार मोडीत निघत असताना अशा संस्था सहकाराबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करीत आहेत. हे  महत्वाचे वाटते.

      कॉ.संपत देसाई म्हणाले, की सहकारी क्षेत्राने आता पाण्यासारख्या विषयाकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. सहकारी तत्वावर पाणी वापर सोसायट्या निर्माण करून पाण्याचा उत्पादक वापर कसा करता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल त्यातून सहकार एक वेगळी दिशा घेऊ शकेल.

     राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष (शरद पवार गट) मुकुंद देसाई यांनी सहकारी संस्थेत आलेल्या वाईट प्रवृत्ती संपवून सहकारी संस्था पारदर्शक चालविण्याचा हा काळ असल्याचे सांगितले.
यावेळी सुधीर देसाई, सुभाष देसाई यांनीही मनोगते व्यक्त केली. सुरुवातीला संजय तर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. दशरथ घुरे यांनी आभार मानले.

दखल…

अनंत-राधिका घडवणार का इतिहास?

लग्नात खर्च होणार आहेत इतके कोटी रुपये…?

        प्री-वेडिंग फंक्शनमध्ये बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि बॉलीवूड सेलिब्रिटींसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा मेळावा असणार आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत-राधिकाच्या आलिशान लग्नाला सर्वाधिक किंमत मोजावी लागणार आहे.त्याचबरोबर या लग्नानंतर अनंत-राधिका इतिहास रचणार आहेत.

       वास्तविक, मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी आपला लहान मुलगा अनंतच्या लग्नावर पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. यामध्ये सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. म्हणजेच, अहवालांवर विश्वास ठेवला तर अनंत अंबानींचे लग्न हे कुटुंबासह देशातील सर्वात महागडे लग्न ठरणार आहे.

      देशातील सर्वात महागड्या लग्नांबद्दल बोलायचे झाले, तर ईशा अंबानीचे लग्न अव्वल स्थानावर आहे. मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात ७०० कोटी रुपये खर्च केले होते. यानंतर सुब्रत रॉय यांचे लग्न हे दुसरे सर्वात महागडे लग्न ठरले. ईशा अंबानीने लग्नात ९० कोटी रुपयांचा लेहेंगा परिधान करून विश्वविक्रम केला होता. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे एकूण बजेट ९०-९५ कोटी रुपये होते. Siasat.com च्या रिपोर्टनुसार, अनंत-राधिकाच्या आलिशान लग्नावर १००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

      मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अंदाजे १००० कोटी रुपये खर्च येणार आहे. हे लग्न कुटुंबातील सर्वात महागडे लग्न असेल. त्याचबरोबर हे देशातील सर्वात महागडे लग्न ठरणार आहे. बहुतांश खर्च डेकोरेशन आणि लाईव्ह शोवर केला जाणार आहे. मिका सिंगने ईशाच्या लग्नात १० मिनिटांच्या शोसाठी दीड कोटी रुपये घेतले होते. रिहाना अनंतच्या लग्नात लाइव्ह शो करणार आहे, अरिजित सिंग देखील लाईव्ह परफॉर्म करणार आहे.

News source :-
https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हत्तीने दिली ट्रॅक्सला धडक…. रामतीर्थ यात्रा नाही तर राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये… ‘सर्वोदय’ मध्ये सत्ताधारीच

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पिसाळलेल्या मांजराचा आज-यात धुमाकूळ…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!