मंगळवार दि.२८ आक्टोंबर २०२५



रोख रकमेसह दुचाकीवर मॅनेजरचा डल्ला…
मालकाची पोलीसात धाव…

स्प्रिंग रिसॉर्ट, आवंडी, ता. आजरा येथील स्प्रिंग रिसॉर्टचे व्यवस्थापक प्रशांत दशरथ पाटील रा. कडलगे खुर्द ता. चंदगड जि. कोल्हापूर यांनी पन्नास हजार रुपये रोख रखमेसह दुचाकी व मोबाईल लंपास केल्याची फिर्याद रिसॉर्टचे चालक आश्लेष जयदीप शेरे रा. स्प्रिंग रिसॉर्ट आवंडी/ वडाळा, मुंबई यांनी पोलिसात दिल्याने पोलिसांनी प्रशांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
व्यवस्थापक प्रशांत याने कोणतीही कल्पना न देता ५० हजारांची रक्कम, चाळीस हजार रुपयांची दुचाकी व एक मोबाईल असा ९२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.


अतिवृष्टी बाधित पिकांचे पंचनामे त्वरित करा… श्र.मु.द.ची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका अतिवृष्टी बाधित जाहीर केला असला तरी पिकांचे पंचनामे न झाल्याने नुकसानभरपाई व अतिवृष्टीमुळे मिळणाऱ्या सवलतीसाठी स्थानिक शेतकरी मुकू नये यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागासह संबंधित सर्व यंत्रणेला द्याव्यात असे निवेदन काल श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तहसीलदार आजरा यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आजऱ्यासह जिल्ह्यातील आठ तालुके अतिवृष्टी बाधित म्हणून जाहीर केले आहेत. पण पिकांचे पंचनामे न झाल्याने तालुक्यतील शेतकरी मिळणाऱ्या सवळतीपासून मुकू शकतो. त्यामुळे आज श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तहसीलदार आजरा यांना निवेदन देण्यात आले.अतिवृष्टी बाधित क्षेत्रात मिळणाऱ्या विविध सवलती मिळाव्यात अशीही मागणी निवेदनातून केली आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे ३३ टक्के अधिक नुकसान झाल्यानें तालुक्यातील सर्वच शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतीकर्ज शंभर टक्के माफ करण्यात यावे, पिकांचे पंचनामे करून पिक नुकसान भरपाई तातडीने मिळावी,महसूल व इतर विभागाकडून वसूल केली जाणारे कर यावर्षी रद्द करावी (घरगुती वीज बील, शेती पंपाचे वीज बिल, पाणीपट्टी इत्यादी), महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत नवीन कामे गावोगावी सुरू करण्यात यावीत अशीही मागणी केली आहे.
श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कॉ. संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, बाळू जाधव, मारुती पाटील, व्ही-डी. जाधव दशरथ घुरे, युवराज जाधव, भीमराव माधव, अशोक मालव यांनी हे निवेदन तहसीलदार आजरा याना आज दिले आहे. पंचनामे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला आहे.

फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वाटंगी येथे निषेध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची सखोल तपासणी होऊन दोषींवर कारवाई व्हावी यासाठी सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून या घटनेचा निषेध केला व दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

भटक्या कुत्र्यांसह विविध प्रश्नांच्या संदर्भात पुन्हा एकदा बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती, आजरा यांचे प्रतिनिधी मुख्याधिकारी, नगरपंचायत आजरा यांच्यात भटक्या कुत्र्यांसह विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कार्यालयात बैठक पार पडली.या बैठकीत समितीकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनांमधील विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आजरा शहर व उपनगरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत समितीमार्फत सर्वपक्षीय नागरिकांच्या उपस्थितीत दिनांक १० आक्टोंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, नगरपंचायतीच्या दिनांक ०९ च्या पत्राचा आदर ठेवून मोर्चा स्थगित करण्यात आला होता. या संदर्भातील कार्यवाहीची सद्यस्थिती बैठकीत विचारण्यात आली. यावर मुख्याधिकारी यांनी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आजरा शहरासाठी सुरू असलेल्या नवीन जल अमृत योजनेबाबत समितीने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीसंदर्भात दोन ते तीन दिवसांत संबंधित माहिती प्रदान करण्यात येईल, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. शहर व उपनगरातील विविध भागांत सध्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. समितीकडून सूचित करण्यात आले की, नवीन पाणी पुरवठा योजनेतील पाणी प्रत्येक घरात योग्य दाबाने पोहोचत असल्याची खातरजमा केल्याशिवाय रस्त्यांचे बांधकाम सुरू करू नये. या संदर्भात मुख्याधिकारी यांनी संबंधित विभागास प्रथम पाणीपुरवठा योजना पूर्ण करूनच रस्त्यांची बांधणी करावी, अशा सूचना देण्यात येतील असे नमूद केले,शहरात जुन्या पाईप लाईनमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असून त्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे, अशी तक्रार समितीकडून करण्यात आली. यावर मुख्याधिकारी यांनी गळती दूर करून पाण्याची नासाडी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
बैठकीदरम्यान नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून शहरातील प्रत्येक घरात शुद्ध व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले.

ना बस… ना बस स्थानक … उत्तूरमध्ये प्रवाशांची रोजचे हाल

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा (मंदार हळवणकर)
आजरा तालुक्यातील महत्त्वाचे व व्यापारीदृष्ट्या मोठे गाव असलेले उत्तूर हे आजही बसस्थानकाविना अडचणीत आहे. आजरा–गारगोटी–गडहिंग्लज–कोल्हापूर या महत्त्वाच्या मार्गावर असलेल्या या ठिकाणी प्रवाशांना छ. शिवाजी महाराज चौकातच तासन्तास उभं राहावं लागतं. हा चौक अतिशय गजबजलेला व रहदारीचा असल्याने येथे अनेकदा अपघात होऊन लोकांना जीव गमवावा लागला आहे.
काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले बस स्थानक कायदेशीर आहे की बेकायदेशीर, याबाबत ग्रामसभेमध्ये प्रश्न उपस्थित झाले होते. त्या ठिकाणची धोकादायक रचना याबाबत पुरावे सुद्धा सादर करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.उत्तूर हे पंचक्रोशीतील प्रमुख बाजारपेठ असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी येथे येतात. बस थांबवण्याची निश्चित व्यवस्था नसल्याने वाहनचालक आणि प्रवासी दोघेही संभ्रमात पडतात. अनेकदा वादाच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.
नवीन बस स्थानकासाठी तब्बल चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काम सुरू करण्यात आले असले तरी ते अर्धवट अवस्थेत थांबले आहे. या कामाबाबत नेमके काय अडथळे आहेत,ते का थांबले हे प्रतिनिधींनी अजूनही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे गावात संभ्रमावस्था निर्माण झाली असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, उत्तूरचे ज्येष्ठ नागरिक मंजूर बागवान यांनी आजरा आगाराला वेळोवेळी पत्रव्यवहार करून अनेक मागण्या केल्या आहेत तसेच त्याचा पाठपुरावा देखील सातत्याने करत आहेत. प्रवासी, विद्यार्थी, महिला यांना दररोज धोका पत्करावा लागत आहे, तरीही प्रशासन व शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे उत्तूरचे बस स्थानक हरवलं की काय? अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.

निधन वार्ता
आनंदी शेंडे

होन्याळी तालुका आजरा येथील आनंदी संतराम शेंडे ( वय ६२ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज मंगळवारी सकाळी ९ वाजता आहे.



