mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या…


लाखोंचा घोटाळा

 

रिकामे भूखंड गेले कुठे…?

                    ज्योतिप्रसाद सावंत

         आजरा नगरपंचायत हद्दीतील नव्या वस्त्यांमधील लाखो रुपयांचे रिकामे भूखंड (ओपन स्पेस) केवळ कागदावरच असून मूळ जागा मालकांनी हे भूखंड लाटले असल्याने यामध्ये लाखोंचा घोटाळा असल्याची चर्चा सध्या आजरा शहरात चालू आहे. वर्षानुवर्षे या जागा यापूर्वी ग्रामपंचायतीच्या व सध्या नगरपंचायतीच्या ताब्यात देण्यास टाळाटाळ होत असताना नगरपंचायत पदाधिकारी व प्रशासन नेमके काय करते ? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.

       आजरा शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या जागा बिगर शेती करून भूखंड विकले जात आहेत. हे सर्व करत असताना मूळ नकाशात दिसणाऱ्या व संबंधित वस्त्यांना शिक्षण, आरोग्य, सामाजिक उपक्रम, प्राथमिक सुविधा यासाठी सक्तीने सोडावे लागणारे रिकामे भूखंड (ओपन स्पेस) मूळ जागा मालकांनीच गायब केल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

       जागा मालकांनीही अशा रिकाम्या जागा सोडताना बिन कामाच्या व अडचणीच्या जागा ओपन स्पेस म्हणून दाखवल्या आहेत. सध्या शहरांमध्ये वाढलेले जागांचे भाव पाहून पुन्हा एक वेळ या मूळ जागा मालकांच्या तोंडाला पाणी सुटले असून अशा भूखंडावर मूळ जागा मालकांनी अतीक्रमण करणे, ते भूखंड नगरपंचायतीच्या ताब्यात न देता स्वतःच ताब्यात घेणे,त्यांची बेकायदेशीररित्या विक्री करणे असे प्रकार चालवले असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे नगरपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचेही बोलले जाते.

      गेली दहा ते पंधरा वर्षे या विषयावर तत्कालीन ग्रामपंचायतीपासून ते आजच्या नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये केवळ चर्चाच होत आली आहे. परंतु यावर ठोस उपाययोजना न झाल्याने अद्यापही भूखंड नगरपंचायतीच्या ताब्यात मिळालेले नाहीत. हे भूखंड ताब्यात देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

            रिकामे भूखंड ताब्यात घ्यावेत

जोपर्यंत संबंधित जागा मालक रिकामे भूखंड ताब्यात देत नाहीत तोपर्यंत त्या वस्त्यांना कोणत्याही प्राथमिक सुविधा नगरपंचायतीने पुरवण्याची काहीही गरज नाही. परंतु ही मंडळी नगरपंचायत कारभाऱ्यांशी संबंधित असल्याने सर्व सुविधा पदरात पाडून घेत आहेत. त्यामुळे या रिकाम्या भूखंडांचे गांभीर्य हळूहळू कमी होत चालले आहे. परंतु याचा फटका संबंधित वस्त्यांमधील नागरिकांना सध्या विविध सेवा सुविधा देताना निश्चितच बसू लागला आहे. आता या भूखंडांच्या चर्चेचा फार्स थांबवून भूखंड ताब्यात घेण्याच्या दिशेने ठोस कार्यवाही करण्याची गरज आहे.

                भूखंडांवर अनेकांचा डोळा…

अशा रिकाम्या भूखंडावर अनेक मंडळींचा डोळा असून काही मंडळी विविध संस्थांच्या माध्यमातून तर काही मंडळी थेट मूळ मालकांशी संगनमत करून हे लाखो रुपयांचे भूखंड लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या पाच वर्षात नगरपंचायत कारभा-यांनी यातील कांही भूखंडांची नगरपंचायत सभागृहात ठराव करून विल्हेवाट लावल्याची चर्चाही आता होऊ लागली आहे.

गवसे ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाख रुपये निधी मंजुर

                     आजरा: प्रतिनिधी

       शासनाच्या मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत गौसे ग्रामपंचायत इमारतीकरीता २० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

      निधी मिळवून देण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी विशेष प्रयत्न केले. आमदार आबिटकर यांच्या हस्ते नुकतेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना निधी मंजुरीचे पत्र देण्यात आले. या इमारती करता कित्येक दिवस स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा सुरू होता.

मडिलगे येथे बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप

                     आजरा: प्रतिनिधी

        उत्तुर जि. प. मतदारसंघामधील मडिलगे येथे शाहू ग्रुप, कागलचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व लोकमान्य समूह, मडिलगे यांच्या प्रयत्नातुन शनिवार बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप कार्यक्रम पार पडला. समरजितसिंह घाटगे व आण्णा- भाऊ संस्था समुहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते सदर वाटप करण्यात आले.

      यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. घाटगे म्हणाले, या योजनेबाबत जेष्ठ नेत्यांचे कौतुक असून या योजनेचा लाभ मोफत दिला आहे. उर्वरित लाभार्थी यांना लवकरच लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असून या मतदार संघातील शेवटच्या लाभार्थी पर्यंत पोहचणार आहोत असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.

      मडिलगेतुन आज शंभर कुटुंबातील लाभार्थ्यांना भांडी संच मिळत आहे याचा निश्चितच आनंद होत आहे . सर्वसामान्यांपर्यंत शासनाचा लाभ पोहोचवणाऱ्या समरजीत राजेंच्या पाठीशी रहा, असे श्री चराटी यांनी आवाहन केले .

      यावेळी अतिशकुमार देसाई, कागल विधानसभा व उत्तुर जि. प. मधील लाभार्थी तसेच लोकमान्य संस्था समुहाचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जनार्दन निऊंगरे यांनी केले तर सुत्रसंचलन विजय परुळेकर यांनी केले. रणजीत मोहिते यांनी आभार मानले.

दाभिल येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात…

                    आजरा: प्रतिनिधी

        दाभिल ता. आजरा येथे ह.भ.प. सद्गुरु पर्वता परब यांच्या स्मृती प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास काल शनिवारपासून सुरुवात झाली असून या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

       ज्ञानेश्वरी पारायण अधिकारी म्हणून ह.भ.प. मारुती परब व व्यासपीठ अधिकारी म्हणून ह.भ.प. विश्वनाथ भोगन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यामध्ये दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ यासारखे कार्यक्रम होणार आहेत.

       श्री भक्त पुंडलिक मंदिरात पूजन व प्राण प्रतिष्ठापना सोहळा गुरुवार दिनांक ७ मार्च रोजी होणार आहे . याचबरोबर दिनांक ९ मार्च रोजी महाप्रसाद व पालखी सोहळ्यानंतर सप्ताह सांगता होणार आहे.

निधन वार्ता

कुसुम घोरपडे

          आरदाळ ता. आजरा येथील श्रीमती कुसुम बाबासाहेब घोरपडे ( वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून जावई नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक ४ रोजी सकाळी ९ वाजता आरदाळ येथे आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तोडणी ठेकेदारांकडून 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक : आजरा पोलिसात दोन ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आल्याचीवाडी येथे मारहाणीत एक जखमी… देवर्डे येथे हत्तीकडून नुकसान… रामतीर्थयात्रा आजपासून सुरू.. एस.टी.सुविधा नाहीच..

mrityunjay mahanews
error: Content is protected !!