
सासूच्या बाराव्या दिवशी सूनेचा मृत्यू...
पेरणोली येथील घटना

आजरा : प्रतिनिधी
पेरणोली ता. आजरा येथे ८० वर्षीय सासूच्या बाराव्या दिवशीच ५० वर्षीय सूनेचाही मृत्यू झाल्याची घटना घडली.सासूचे नाव पार्वती शंकर गुरव तर वत्सला मोहन गुरव वय असे सूनेचे नाव आहे.
पार्वती यांचे वृद्धापकाळाने तर वत्सला यांचे दिर्घ आजाराने निधन झाले.गेले वर्षभर त्या अंथरूणात पडून होत्या.दरम्यान सासू पार्वती यांचे बारा दिवसापूर्वी अचानक निधन झाले.त्यांच्या बाराव्या दिवशीच वत्सला यांचेही निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
देसाई परिवारातील घटनेची पुनरावृत्ती…
पेरणोली येथील श्रीपती उर्फ आबाजी देसाई यांचे चार दिवसापूर्वी निधन झाले. लहान भाऊ मारुती यांच्या निधनानंतर अवघ्या तेरा दिवसानंतर श्रीपती देसाई यांचे निधन झाले. या घटनेची पुनरावृत्ती गुरव कुटुंबियांच्या बाबतीत घडली. या घटनांची पेरणोली पंचक्रोशीत चर्चा होत आहे.

रस्त्याचे काम… आणि वाहन चालकांचा शिमगा
आजरा: प्रतिनिधी
संकेश्वर-बांदा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या आजरा नगरपंचायत हद्दीत आले असून आजरा पंचायत समिती ते संभाजी चौक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर खुदाई करण्यात आली आहे. दिवसरात्र काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूकीसाठी पर्यायी शिवाजीनगरच्या शासकीय गोदामापासून जाणाऱ्या मार्गाचाही वापर केला जात आहे.परंतु या मार्गावरील उभी वाहने, पाणीपुरवठा योजनेचे चर, दुरुस्ती करता काढलेले खड्डे अद्यापही तसेच असल्याने हा मार्ग म्हणजे वाहन चालकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे.
वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देत असताना किमान त्या मार्गावरील अडथळे दूर करणे आवश्यक होते. पण नगरपंचायतीसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला याचे फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. आहे त्या परिस्थितीतच वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मुळातच हा रस्ता खड्ड्यांचा व अडचणीचा आहे असे असताना या मार्गावरून वाहतूक सुरू केली जाते. धूळ उडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पाणीही रस्त्यावर मारले जात असल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होत आहे .स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहेच परंतु अवजड वाहनांची वाहतूक करणारे वाहनचालक या सर्व प्रकारामुळे वैतागून गेले आहेत.
या सर्वाचा परिणाम म्हणून तब्बल अर्धा पाऊण तास एकाच वेळी वाहतूक ठप्प प्रकारही घडू लागले आहेत.


शाश्वत विकासासाठी साथ द्या : राजे समरजितसिंह घाटगे

उत्तूर: प्रतिनिधी
केवळ रस्ते आणि गटर्सची कामे ही गावच्या सर्वांगीण विकासाची व्याख्या म्हणता येणार नाही. त्यासाठी आरोग्य,प्राथमिक शिक्षण, वैद्यकीय सुविधा, शासकीय योजनांच्या लाभांसाठी आवश्यक विविध दाखल्यांचे वाटप या महत्वपूर्ण सुविधा तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.त्यामुळे येत्या काळात छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित असणारा शाश्वत विकास करण्यासाठी आपला लोकसेवक म्हणून काम करण्याची संधी द्या, असे आवाहन भाजपाचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
बहिरेवाडी (ता.आजरा) येथे राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३२ लाख रूपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक शाळेची नूतन खोली, सोलर हायमास्ट आणि प्राथमिक शाळेसाठी राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन मार्फत ई लर्निंग संच राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
श्री.घाटगे पुढे म्हणाले,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेतील आलेख पाहता वाखाणण्याजोगा आहे.या गुणवत्तेला शाळांमधूनच सुविधांची जोड दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी देशपातळीवर नक्की चमकतील.विद्यार्थ्यांना या अध्ययावत सुविधा देण्यासाठी येत्या काळात आपण काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना अण्णाभाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोकअण्णा चराटी म्हणाले, लहानांपासून वृद्धांपर्यंत या कार्यक्रमासाठी मोठी उपस्थिती आहे. ही नक्कीच बदलत्या राजकीय काळाची नांदी म्हणावी लागेल. त्यामुळे येत्या काळात राजकारणात बदल तर होईलच, शिवाय या परिसराचा विकासही येथील जनतेच्या अपेक्षेप्रमाणे राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली नक्की होईल असा विश्वास व्यक्त केला.
भाजपाचे आजरा तालुका सरचिटणीस अतिषकुमार देसाई, राजकीय सल्लागार प्रकाश बेलवाडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संजय धुरे, संतोष बेलवाडे,स्मिता पाटील( सरपंच होण्याळी ),धोंडीराम सावंत, महादेव रामाने, सेवानिवृत्त कर्नल अशोक बाबर,ग्रा.पं.सदस्य सौ. उषा सुतार, युवराज कांबळे ,सुनील गोरूले, निवृत्ती कापसे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यासह कार्यकर्ते,महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक ग्रा.पं. सदस्य सुहास चौगुले यांनी केले. आभार अरविंद मिसाळ यांनी मानले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक प्रयोग सादरीकरण

आजरा : प्रतिनिधी
मराठी विज्ञान परिषद आजरा आणि आजरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य दिलीप संकपाळ होते.
मराठी विज्ञान परिषद आजराचे सचिव प्रा. किरण प्रधान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कु. आरती पोतनीस व कु. भूमि देशमुख यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवून प्रयोगांमधील विज्ञान समजावून सांगितले. ध्वनी ,चुंबकीय ऊर्जा तसेच विद्युत ऊर्जा या संकल्पनांवरील प्रयोगांची प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थितांचे स्वागत प्रा. बळवंत कडवाळे यांनी केले तर आभार प्रा.एम.आर. ठोंबरे यांनी मानले.

आरदाळ येथे आज स्लो मोटरसायकल रेस स्पर्धा

उत्तूर : प्रतिनिधी
डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फाउंडेशनच्या व विद्यार्थी विकास परिषदेच्यावतीने आरदाळ-पेंढारवाडी येथील भैरीदेवी यात्रेनिमित्त आज सोमवार दिनांक ४ मार्च रोजी सकाळी १० वाचता स्लो मोटरसायकल रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस देण्यात येणार आहे. प्राथमिक शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत.


