

आजरा तालुक्यात सरासरी ८०.३५ टक्के मतदान…किरकोळ वादाचे प्रसंग

⬛आजरा : प्रतिनिधी⬛
आजरा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकी करता सरासरी ८०.३५ % इतके मतदान झाले. ठीक- ठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंग वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आजरा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व एक ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुक झाली. मतदानावेळी ईर्षा व चुरस व शक्तिप्रदर्शन दिसून आले. निवडणूक लागलेल्या सर्वच ग्रामपंचायतीसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी साठ टक्के मतदान झाले.
हरपवडे ग्रामपंचायतीमध्ये मतदार आणण्यावरून दोन गटात शाब्दिक वादावादी झाली. किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गेले पंधरा दिवस गावा-गावातील वातावरण ढवळून निघाले होते. तालुक्यातील पेरणोली, हरपवडे, सुलगाव, मसोली, वेळवट्टी, इटे, देऊळवाडी, बुरुडे, मेंढोली या ग्रामपंचायतींच्या तर जाधेवाडी येथील एका जागेच्या पोटनिवडणूकीसाठी रविवारी मतदान झाले. तालुक्यातील एकूण २४ मतदान केंद्रावर मतदान झाले. पेरणोली, बुरुडे, मेंढोली, इटे येथे मतदानावेळी मोठी चुरस पहावयास मिळाली. सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे सकाळच्या सत्रातच मतदान करण्यास मतदारांनी पसंती दिली.

पहिल्यांदा लोकशाहीचा हक्क बजावून लोक दिवसभर शेतात राबताना दिसून आले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, गोवा या बाहेगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी सोय केली होती. हे सर्व मतदार सकाळच्या सत्रातच गावात दाखल झाल्यानंतर कार्यकत्यांनी त्यांच्याकडून मतदान करून घेतले. सर्वच ठिकाणी मतदानामध्ये मोठी इर्षा दिसून आली. मतदान करून घेण्यासाठी युवा वर्ग विशेष राबताना दिसत होता. सकाळच्या सत्रात सर्वच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्यानंतर शिल्लक मतदान करून घेण्यासाठी शेवटच्या सत्रात कार्यकर्त्यांची धावपळ उडाली.

ग्रामपंचायतनिहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे :-
मेंढोली ७७.३५ टक्के, मसोली ८२. ४७ टक्के, बुरुडे ७३.३८ टक्के, सुलगाव ८५.६७ टक्के,पेरणोली ८०.२९ टक्के, वेळवट्टी ९०.७५ टक्के, देऊळवाडी ६३.६४ टक्के, हरपवडे ८४.४६ टक्के, इटे ८५.२२ टक्के, जाधेवाडी पोट निवडणुकी करता ८२.३५ टक्के इतके मतदान झाले आहे.
पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. ढेरे यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
आज मतमोजणी

⬛आजरा : प्रतिनिधी⬛
रविवारी झालेल्या दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता आज मतमोजणी होणार असून ७ सरपंचांसह ५५ सदस्यपदी कोण बसणार हे आज स्पष्ट होणार आहे. यापूर्वी वेळवट्टी,देऊळवाडी व चांदेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे दावेदार बिनविरोध निवडून आले आहेत.
आज आजरा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी ८ पासून मतमोजणी होणार आहे. एकूण तीन फेऱ्यांमध्ये आठ टेबलावर सदर मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक एक वर इटे, टेबल क्रमांक दोनवर पेरणोली, टेबल क्रमांक तीनवर बुरुडे, टेबल क्रमांक चारवर वेळवटटी, टेबल क्रमांक पाचवर हरपवडे, टेबल क्रमांक सहावर सुलगाव, टेबल क्रमांक सातवर मसोली तर टेबल क्रमांक आठवर मेंढोली या ग्रामपंचायतींची ही मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.
साधारण पावणेदहा वाजण्याच्या सुमारास सर्व ग्रामपंचायतचे निकाल अपेक्षित आहेत. तहसीलदार सुरज माने यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते व महसूल विभागाचे कर्मचारी नेटाने निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहेत.

आजरा साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम आजपासून सुरू…

⬛आजरा : प्रतिनिधी⬛
आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गेली दोन वर्षे प्रलंबित असणारा निवडणूक कार्यक्रम आजपासून सुरू होत असून आज दिनांक ६ पासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत.
कारखान्याकरता पाच उत्पादक गट आहेत. यामध्ये उत्तूर – मडीलगे गट, आजरा – शृंगारवाडी गट,पेरणोली- गवसे गट, भादवण – गजरगाव गट, हात्तीवडे – मलीग्रे गट असे पाच गट असून या गटातून प्रत्येकी तीन संचालक रहाणार आहेत. याव्यतिरिक्त सहा विविध प्रवर्गाकरिता राखीव जागा असून यामध्ये सहकारी संस्था गट, अनुसूचित जाती- जमाती गट, इतर मागास गट, भटक्या विमुक्त जाती-जमाती गट, या गटांकरिता प्रत्येकी एक तर महिला राखीव गटाकरिता दोन जागा राहणार आहेत. संचालक मंडळ एकूण २१ संचालकांचे असे निवडणुकी करता २५१८२ ‘अ ‘ वर्ग तर ७६०३ ‘ ब ‘ वर्ग सभासदांना मतदानाचा अधिकार राहणार आहे.१०नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. तर १६ नोव्हेंबरला छाननी व १७ नोव्हेंबरला पात्र अर्जांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर अखेर अर्ज माघारीचा कालावधी आहे अंतिम उमेदवारांची यादी ४ डिसेंबरला जाहीर होणार असून १७ डिसेंबरला मतदान तर १९ डिसेंबरला मतमोजणी असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी गेली सात वर्षे चांगलीच मशागत केली आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजरा साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

⬛आजरा: प्रतिनिधी⬛
आजरा साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या २५ व्या गळीत हंगामाचा काटा पुजनाचा कार्यक्रम कार्यक्षेत्रातील प्रगतशिल शेतकरी किरण देशपांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कविता देशपांडे रा. हाजगोळी बु|| यांचे हस्ते हस्ते संपन्न झाला. तसेच गळीत शुभारंभ चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाचे हस्ते पार पडला.
सन २०२३-२४ या गळीत हंगामाकरीता ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्यानुसार कारखान्यास आवश्यक तोडणी वाहतुकीसाठी केलेली ६० टक्के यंत्रणा हजर झाली आहे. कारखान्यांने ठेवलेल्या उद्दिष्टांप्रमाणे ऊस उपलब्ध व्हावा या करीता आजरा, गडहिंग्लज, चंदगड या ठिकाणातील ऊस नोंदीचे काम पुर्ण झाले असून सदर ऊस गाळपाकरीता आणणेसाठी प्राधान्याने स्थानिक यंत्रणा देखील लवकरच कार्यरत होणार आहे. त्यानुसार शेती खात्यामार्फत उसाची पहाणी केली जात आहे. कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने आणणेचे नियोजन शेती खात्यामार्फत केलेले आहे. कारखाना पुर्ण क्षमतेने चालविणेस सज्ज झाला आहे.
कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक जाहिर झाली असली तरी कारखान्याचा गळीत हंगाम वेळेत सुरू करून गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण करण्याचे नियोजन संचालक मंडळाने कर्मचा-यांच्या सहकार्यातुन केले आहे. कारखान्याकडे गाळपास येणा-या उसाची बिल वेळेत पोहोच करणेचे नियोजन कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या माध्यमातुन केले आहे. तरी ऊस उत्पादकांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस कारखान्याकडे पाठवुन सहकार्य करावे अशी यावेळी संचालक मंडळाकडून विनंती करणेत आली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे, व्हाईस चेअरमन आनंदराव कुलकर्णी, कारखान्याचे संचालक अशोक चराटी, विष्णु केसरकर, वसंतराव धुरे, संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, संचालक मधुकर कृष्णा देसाई, दिगंबर देसाई, मारूती घोरपडे, संचालिका सुनिता रेडेकर, मुकुंदराव देसाई, दशरथ आनंदा अमृते, जनार्दन टोपले,मलिककुमार बुरूड,अनिल फडके, संचालिका सौ.विजयालक्ष्मी देसाई, विलास नाईक, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती, व्ही. एच. गुजर, जनरल मॅनेजर (टेक्नि), श्री. एस. के. सावंत, जनरल मॅनेजर (प्रोडक्शन) शंकर आजगेकर सिव्हील इंजिनिअर, रमेश वांगणेकर, अकौंटंट, सुभाष भादवणकर, इन. लेबर ऑफीसर, कामगार युनियन अध्यक्ष प्रकाश देसाई व युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निधन वार्ता…
प्रकाश शिवणे

आरदाळ येथील प्रकाश भिवा शिवणे (वय ४६) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात वडील ,पत्नी ,मुलगा , मुलगी,असा परिवार आहे.

🟥🟧⬜🟫⬛🟪🟩🟦🟨🟥🟧⬜🟫

⬛⬜🟧🟥🟨🟦🟩🟪🟫⬛⬜🟧🟥

