
तालुक्यातील गुन्हेगारी थांबवा शिवसेनेचे मागणी

आजरा प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत चालली असून नशीले पदार्थ पुरवठा करणाऱ्या टोळीला शोधून काढण्याची गरज आहे, याचबरोबर अलीकडे वाटसरूंची लुटमारी करण्याचे प्रकार वाढले असून. लुटमारी करणाऱ्यांचा बंदोबस्त व्हावा, घरफोडी व मोटरसायकल चोरांचा तातडीने तपास व्हावा यासह विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने तालुक्यातील गुन्हेगारी थांबवण्याची मागणी आजरा पोलिसांकडे करण्यात आली असून याची कार्यवाही न झाल्यास पोलीस स्टेशन समोर निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे लेखी निवेदन सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांना देण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात गुन्हेगारीमध्ये वाढ होऊ लागली आहे याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे शालेय विद्यार्थी आजरा शहर परिसरात नशिले पदार्थ सेवन करताना दिसतात त्यांना हे पदार्थ पुरवणाऱ्या टोळीचा छडा लावण्याची गरज आहे. रात्री अपरात्री महिला व पुरुष यांच्या टोळ्या मोटरसायकल स्वारांना अडवून व मारहाण करून वाटमारी करताना दिसतात. दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरी, पाकीटमारी असे प्रकार वाढले आहेत याचबरोबर आजरा- आंबोली मार्गावर गवसेनजीक काही पोलीस वाहनधारकांना अडवणूक करून दंड आकारताना दिसतात. सदर पोलीस कोणत्या अनुषंगाने सदर कारवाई करतात व ते कोणत्या विभागाचे आहेत याचा खुलासा होण्याची गरज आहे.या सर्व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तालुक्यातील गुन्हेगारी ताबडतोब थांबवावी अन्यथा पोलीस स्टेशन समोर शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर महेश पाटील, दयानंद भोपळे, ओंकार माद्याळकर, भिकाजी विभुते, समीर चांद ,रोहन गिरी,रोहित यादव आदींच्या सह्या आहेत.

रामतीर्थ यात्रेच्या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीने घेतला आढावा

आजरा: प्रतिनिधी
महाशिवरात्री निमित्त रामतीर्थ,आजरा येथे होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीच्या वतीने रामतीर्थ परिसराला भेट देऊन सुविधांचा आढावा घेण्यात आला. नगरपंचायत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
रामतीर्थ यात्रा चार दिवसांवर येऊन ठेपली आहे अशावेळी या परिसरातील स्वच्छता रंगरंगोटी करण्यात यावी, राम मंदिर ते प्रवेशद्वारापर्यंत मांडव घालावा, स्वच्छता गृहे पाणी व्यवस्थेसह स्वच्छ करून घ्यावीत, वन विभागाकडून नव्याने बसवलेली स्वछता गृहे त्यांना सांगून वापरात आणून वाटेत पडलेली भरीसाठी माती लवकर बाजूला करुन वाट मोकळी करणे, देऊळ परिसरात विद्युत रोषणाई करावी, पिण्याच्या पाण्याची योग्य ती व्यवस्था करावी अशा सूचना करण्यात आल्या.
यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे उपाध्यक्ष विजय थोरवत, ज्योतिप्रसाद सावंत, पांडुरंग सावरकर, महेश दळवी,अभिषेक रोडगी, वाय. बी. चव्हाण, गौरव देशपांडे उपस्थित होते.

देश अबाधित ठेवण्याची ताकद काँग्रेसमध्ये :
विद्याधर गुरबे
आजरा येथे पर्यावरण काँग्रेस समितीची निवड

आजरा: प्रतिनिधी
आपला देश विविधतेने नटलेला आहे.काँग्रेसने विविधतेतून एकता जोपासलेली संस्कृती आता मोडीत काढली जात आहे.त्यामूळे देश अबाधित ठेवण्याची ताकद काँग्रेसमध्येच असल्याचे प्रतिपादन जिल्हा काॅग्रेस सरचिटणीस विध्याधर गुरबे यांनी केले.
आजरा येथे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कृष्णा सावंत यांची पर्यावरण संवर्धन काॅग्रेस तालूका अध्यक्ष पदी नियुक्तीचे पत्र पर्यावरण जिल्हा अध्यक्ष प्रदीप डकरे याच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर होत्या.
गुरबे म्हणाले, शाहु,फुले ,आंबेडकरांचे विचार जोपासणारा महाराष्ट्र आहे.काँग्रेसमधून घाण गेल्याने काँग्रेस आता स्वच्छ झाली आहे.काॅग्रेस हा पक्ष सर्वाना सोबत घेऊन वाटचाल करताना पर्यावरणाचा विचार करणारा कार्यकर्ता म्हणून सावंत यांची निवड झाल्याने समाधान आहे.
यावेळी प्रदीप डकरे म्हणाले,यांनी देशातील आजची परिस्थिती ही भांडवलदाराच्या बाजूने असून सार्वजनिक जमीन जंगल, पाणी विकण्याचा घाट घालत आहे. त्या विरोधात आवाज बुलंद करण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धन करून जन जागृती करणेसाठी पर्यावरण काॅग्रेस समिती संघटीत केलेचे सांगितले. यावेळी अंजना रेडेकर,काॅ. शांताराम पाटील,इनास फर्नांडीस, कृष्णा सावंत यानी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जनता बँकेचे माजी संचालक अंकुश पाटील, रविंद्र भाटले,जयवंत पाटील, तानाजी गडकरी, जोतीबा सासुलकर, नारायण राणे, आबा पाटील ,जानबा धडाम ,दौलती राणे, हिंदूराव कांबळे,मनपा बोलके,रघुनाथ कातकर याच्या सह कार्यकर्ते व गिरणी कामगार उपस्थित होते. सुत्रसंचालन संजय घाटगे यांनी केले.
आभार ज्ञानदेव गुरव यानी मानले.

भिडेगुरुजींवर हल्ला करणार्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

आजरा: प्रतिनिधी
संभाजीराव भिडेगुरुजींवर वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा आणि त्यांना त्रास देण्याचा, तसेच त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रकार होत आहे. मनमाड (जिल्हा नाशिक) येथे २९ फेब्रुवारीला काही माथेफिरूंनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला. गाडीच्या काचा फोडण्याचा गंभीर प्रकार केला. तरी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड हल्ला करणार्यांचा मास्टरमाईंड शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन आजरा येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आजरा व सर्व हिंदुत्ववादी यांच्या कार्यकर्त्यांनी आजरा वतीने तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले. आहे.
या प्रसंगी प्रथमेश काणेकर, संदीप पारळे, चेतन बुरुड, उमेश पारपोलकर,सतीश शिंदे, विशाल नाईक, सतीश पवार, ऋषी सावंत, सुयोग बेळगुंदकर आदी उपस्थित होते.
भोवताल…
वनपरीमंडळ चंदगड कडील मौजे जांबरे येथे वनवणवा जनजागृती पर कार्यक्रम विद्या मंदिर, जांबरे येथे पार पडला.
सदर कार्यक्रमाला ग्रामसेवक व सरपंच ग्रा.प जांबरे, सह्याद्री वाइल्ड लाईफ फौंडेशन टीम, वनरक्षक जांबरे, वनसेवक जांबरे, चंदगड उपस्थित होते.कृष्णा डेळेकर, वनपाल चंदगड यांनी वणवा लागण्याची कारणे व वनावर होणारे दुष्परिणाम याबावत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यात्रा-जत्रा…मसोली
आज मंगळवार दि.५ रोजी मसोली ता. आजरा येथील मसवाईदेवीची यात्रा आयोजित करण्यात आली आहे.



