mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हामहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

सोमवार  दि.२० आक्टोंबर २०२५

किरकोळ वादातून मारामारी : दोघे जखमी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आर्दाळ ता. आजरा येथील दिपक  पाटील व आनंदा जानबा सोळांकूर यांच्यात किरकोळ कारणावरून पेंढारवाडी येथे असणाऱ्या शेतामध्ये वादावादी झाली आणि त्याचे पर्यावसान मारामारीत झाले . मारामारीत चाकू व काठीचा वापर झाला . दोघेही जखमी झाले आहेत . दोघांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत. या फिर्यादीवरून दोघांवरही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

मंत्र्यांसह नेत्यांना भेटण्यासाठी इच्छुकांची धावपळ…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

रविवार व दीपावलीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मंत्रिमहोदयांसह आमदारांनी मतदारसंघात ठोकलेला तळ नगरपंचायत निवडणुकी करता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या दृष्टीने पर्वणी ठरला. नेते मंडळी नेमकी आहेत कुठे हे जाणून घेऊन  ठिकठिकाणी इच्छुकांनी काल दिवसभरात भेटी घेतल्या.

पालकमंत्री प्रकाश आबीटकर,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार शिवाजीराव पाटील यांना भेटून त्यांच्याशी संबंधित इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांनी भेटी घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे.

काल दुपारनंतर समाज माध्यमावर या भेटीची छायाचित्रे प्रसारित होताना दिसत होती. २४ तारखेला आजरा साखर कारखान्याच्या गळीत शुभारंभ निमित्ताने पालकमंत्री आबिटकर व मंत्री मुश्रीफ यांना आमंत्रित करण्याचे नियोजन सुरू असल्याने याचवेळी नगरपंचायत पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता असल्याने इच्छुक कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.

पाच वर्षात ३३ कोटी ६१ लाखांची विकास कामे मंजूर करून आणली : जयवंतराव सुतार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

राज्यातील भाजपा व महायुती नेत्यांच्या मदतीने आजरा तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल ३३ कोटी ३१ लाखांची विकास कामे मंजूर करून आणली आहेत अशी माहिती भाजपाचे पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार यांनी दिली.

यावेळी जयवंत सुतार म्हणाले, तालुक्याच्या पूर्व भागातील एकही गाव विकास कामांपासून वंचित राहिलेले नाही. यामध्ये अंतर्गत रस्ते, तांडा वस्ती सुधार, पाणंद रस्ते गटर्स, हाय मास्ट यासह विविध विकास कामांचा समावेश आहे.

या कामी महायुतीतील वरिष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, विद्यमान आमदार शिवाजीभाऊ पाटील, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

 

आगामी जि.प. व पं. स. निवडणुका ताकतीने लढवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आगामी जि.प. व पं. स. निवडणुका ताकतीने लढवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार उत्तुर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) बैठकीत करण्यात आला.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील ३६ गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्तूर येथे भावेश्वरी दूध संस्थेच्या सभागृहात पार पडली. बैठकीस अध्यक्षस्थानी उत्तूर विभागाचे प्रमुख नेते श्री. वसंतराव धुरे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषदेसाठी मारुतीराव घोरपडे (उत्तूर), शिरीष देसाई (उत्तूर), दिपक देसाई (मडिलगे), एम. के. देसाई (सरोळी), दशरथ आजगेकर (खोराटवाडी), संजय येजरे (हालेवाडी) हे कार्यकर्ते इच्छुक आहेत. तसेच उत्तूर पंचायत समितीसाठी शिरीष देसाई, गणपतराव सांगले (उत्तूर), सुनील दिवटे (वडकशिवाले), संभाजी तांबेकर / भूषण नाडवडेकर / वसंत तारळेकर (चिमणे), विकास चोथे (बहिरेवाडी), बबनराव पाटील / रामदास साठे (मुंमेवाडी), महादेव पाटील (धामणे) हे इच्छुक असल्याचे जाहीर झाले. तर भादवण पंचायत समितीसाठी लता उत्तम रेडेकर (पेद्रेवाडी), सुमित्रा दिपक देसाई / साहिली अनिकेत कवळेकर (मडीलगे), स्मिता काशीनाथ तेल्ली (होन्याळी), कल्पना राजेंद्र मुरकुटे (कानोली), आशा सुभाष सुतार (भादवण), शुभांगी कुंभार (निंगुडगे) या महिला उमेदवारांनी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहोत असे सांगितले. उपस्थितांनी पक्षनिष्ठेचा व विकासाच्या राजकारणाचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीस राजेंद्र जोशीलकर, राजेंद्र मुरुकटे, उत्तम रेडेकर विजय वांगणेकर, सुधीर सावंत, तानाजी सावंत, संभाजी तांबेकर, सुनील दिवटे, आनंद घाटगे, दशरथ आजगेकर, संजय येजरे, सचिन उत्तूरकर,जोतिबा पवार, विजय गुरव,तसेच अनेक ग्रामपातळीवरील कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच काशिनाथ तेली, शिरीष देसाई दीपक देसाई, एम.के. देसाई, महादेवराव पाटील यांनी आपली मनोगते मांडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपतराव सांगले यांनी केले तर आभार प्रदर्शन गंगाधर हराळे यांनी केले.

हत्ती शिरसंगीत पुन्हा परतला…
भात व ऊस पिकाचे नुकसान शेतकरी भयभीत


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हत्तीने दोन महिन्यानंतर सिरसंगीत पुन्हा मोर्चा वळवला असून ऐन सुगीच्या वेळीच हत्ती परतल्यामुळे शेतकऱ्यांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे.
मळणी काढून ठेवलेले भाताच्या पिशव्या शेतशिवारात विस्कटून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याचबरोबर ऊस पिकाचेही नुकसान केले आहे. गेले दोन महिन्यांपासून उचंगी शृंगारवाडी, जेऊर चितळे या ठिकाणी वास्तव्यास असलेला हत्ती पुन्हा शिरसंगी येमेकोंड जंगलात परतल्याने शेतकऱ्यांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे.हणमंत बुडके, वंदना गाईगडे, शिवाजी सावंत, रामचंद्र दळवी शामराव दळवी यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले तर नामदेव मयेकर यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले असून ऐन सुगीच्या वेळीच हत्ती आल्याने शेतकऱ्यांत भिती पसरली आहे.

ऐन दिवाळीत वाहतुकीचा बोजवारा 


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

एकीकडे सर्वसामान्य नागरिक दिवाळीच्या खरेदीला बाजारपेठेत आले असताना दुसरीकडे आजरा महागाव मार्गासह ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे.

वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अत्यंत बेशिस्त पद्धतीने शहरांमध्ये पार्किंग केले जात आहे. भरीस भर म्हणून अवजड वाहनांसह खाजगी प्रवासी बसेस शहरातून जात असल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडत आहे.

आमदार शिवाजीराव पाटील यांचे हस्ते आजऱ्यात पदाधिकारी निवड पत्रे वाटप


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टी आजरा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांना आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते कार्यकारणीची पदे वाटप करण्यात आली.

यामध्ये आजरा शहराध्यक्ष पदी आकाश रावसाहेब पाटील व महिला शहराध्यक्षपदी माधवी पाचवडेकर यांना निवडीचे पत्र देण्यात आली. याचबरोबर इतर कमिट्यांची पदे शिवाजीराव पाटील व भाजपा आजरा तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी यांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यातील कामकाजाचा आढावा घेत पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले प्रस्ताविक व स्वागत अनिकेत चराटी यांनी केले, आभार जयवंत सुतार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी आजराच्या माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, संयोगिता बापट, शामली वाघ, आनंदा कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार, अनिल पाटील, सी. आर. देसाई, लहू वाकर, शैलेश पाटील, नाथ देसाई, अभिजीत रांगणेकर, दीपक गवळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा हायस्कूलच्या मुलींची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूल, आजरा येथील विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे. वारणानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत 4
४ × ४०० मीटर रिले शर्यतीत आजरा हायस्कूलच्या मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले.

या विजयी संघात दीपा रामचंद्र गावडे, साक्षी गंगाराम गावडे, मयुरी मारुती डोणे, विजयलक्ष्मी विश्वनाथ पाटील आणि श्रेया प्रदीप पाचवडेकर या विद्यार्थिनींचा सहभाग होता.

या संघाला म क्रीडा शिक्षक श्री. एम. एस. गोरे व सौ. एम. पी. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

 

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आल्याचीवाडी येथे मारहाणीत एक जखमी… देवर्डे येथे हत्तीकडून नुकसान… रामतीर्थयात्रा आजपासून सुरू.. एस.टी.सुविधा नाहीच..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आगामी सर्व निवडणुकांमध्ये  जिल्हा भाजपा अशोकअण्णांच्या पाठीशी  : भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे

mrityunjay mahanews
error: Content is protected !!