रविवार दि.१९ आक्टोंबर २०२५


सुकून गृहतारण संस्था सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न साकार करेल : सुधीर देसाई
संस्थेचे दिमाखात उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
समाजातील चांगल्या व उद्योजक व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेली सुकून सहकारी गृहतारण संस्था ही सर्वसामान्यांचे घरकुलांचे स्वप्न साकार करेल व या संस्था अल्पावधीतच नावारूपास येईल असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी व्यक्त करत जिल्हा बँकेकडून सर्वतोपरी या संस्थेला सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. संस्थेचे उद्घाटन उद्योजक सुरेश होडगे व सौ. वनिता होडगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी देसाई अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष भिकाजी पाटील यांनी केले. संस्थेच्या स्थापने मागील हेतू त्यांनी स्पष्ट केला. यावेळी बोलताना आजरा अर्बन बँकेचे संचालक विलास नाईक म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात सहकार पंढरी अशी ओळख असणाऱ्या आजरा तालुक्यामध्ये पगारदारांच्या गृहतारण संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. परंतु सर्वसामान्यांचे घरकुल उभारण्याचे स्वप्न साकार करताना अनेक अडचणी येताना दिसतात. सुकून संस्था निश्चितच त्यांचे स्वप्न साकार करेल.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार म्हणाले, तालुक्यातील सर्वच सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. अनेक संस्थांनी राज्य पातळीवर नावलौकिक कमावला आहे. या संस्थेमुळे आजरा तालुक्याच्या सहकार क्षेत्राच्या वैभवात भर पडेल असे स्पष्ट केले.
कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर महेश खोत, डॉ.दीपक सातोसकर,दयानंद भुसारी,निवासी तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, संजयभाऊ सावंत, विजय थोरवत, संजय शेणवी, नामदेव साबळे, नाथ देसाई, महेश पाटील, ब्रह्मा केसरकर, नितीन राऊत, आश्रम सांबरेकर,नंदकुमार पाटील, उत्तम सलामवाडे, संदीप सावंत,सूर्यकांत नार्वेकर सौ.पूनम पाटील, सौ.कांचन राणे यांच्यासह सर्व संचालक व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार भरत बुरुड यांनी मांडले.


वाय.बीं.च्या निधनाने सामाजिक पोकळी
आजऱ्यात शोकसभा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव बाळासाहेब तथा वाय. बी. चव्हाण यांच्या निधनाने शहरातील सामाजिक कार्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सामाजिक कार्य नेटाने पुढे चालू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन अनेक मान्यवरांनी आजरा येथे आयोजित शोकसभेत बोलताना केले. यावेळी चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारा सामाजिक कार्याचे भान असणारा असा हा कार्यकर्ता अचानकपणे निघून गेल्याने एका चांगल्या मित्राला व सहकाऱ्याला आपण मुकलो आहोत अशी भावना आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी व्यक्त केली.
कॉ.संपत देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, कृष्णा पटेकर, डॉ. नवनाथ शिंदे, पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत, सुनील शिंदे, रणजीत कालेकर आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
यावेळी संजयभाऊ सावंत, रशिद पठाण, रवी भाटले, रणजीत देसाई, विजय थोरवत, बी.एम.पाटील, शिवाजी इंजल, जयसिंग देसाई, सौ नंदा केसरकर,सौ. सुरेखा देसाई, अमोल मुरकुटे, प्रकाश मोरुस्कर, जावेद पठाण, आरिफ खेडेकर, दिनकर जाधव, गुरु गोवेकर, सतीश बामणे, गौरव देशपांडे, शिवाजी नाईक, जोतिबा चाळके, पांडुरंग सरंबळे, जोतिबा आजगेकर यांच्यासह शहरवासीय उपस्थित होते.



कामधेनु सहकारी दूध संस्थे मार्फत दूध दर फरक वाटप

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी येथील कामधेनु दूध संस्थेमार्फत सन २०२४-२५ मध्ये पुरवठा केलेल्या दुधावर शेकडा १२% तर गायीच्या दुधासाठी ९.५% प्रमाणे दूध दर फरक वाटप करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन जि. वाय.देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आजरा साखर कारखान्याचे संचालक दिगंबर देसाई होते.
जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक सौ.मंगल गोपाळ होडगे, द्वितीय क्रमांक श्री. दशरथ बाळू कुडव तृतीय श्री. सुनील भीमराव पताडे, चतुर्थ सौ. वनिता मनोहर देसाई पाचवा रामचंद्र अर्जुन कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रकाश दळवी चंद्रकांत दळवी बाबुराव देसाई महादेव कोकितकर सदाशिव परीट बंडू दळवी, बाळू कुडव, धोंडिबा पाटील ,धनाजी पताडे ,अशोक येलगार गोपाळ होडगे कृष्णा,टकेकर कृष्णा देसाई ,जनार्दन देसाई बाळकृष्ण वनिता देसाई, सुनंदा दळवी, सुनंदा गाईंगडे, निर्मला कुंभार आवूबाई सुतार उपस्थित होते. सचिव उमेश देसाई यांनी आभार मानले.

निधन वार्ता
मारुती पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता.आजरा येथील श्री.मारूती दत्तू पाटील वय ( वर्ष ९८ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ विवाहित मुलगे, २ विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आजरा तालुका अध्यक्ष व भादवणचे माजी सरपंच संजय पाटील यांचे ते वडील होत.
दिनकर घोडके

उत्तूर (ता. आजरा) येथील दिनकर सजन घोडके (वय ७३ वर्षे) यांचे शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वाजता होणार आहे.
माया सुतार

पेरणोली ता. आजरा येथील सौ. माया धनाजी सुतार ( वय 52 वर्षे ) यांचे उदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सून, सासू असा परिवार आहे.
उद्या सोमवारी रक्षा विसर्जन आहे.


देवर्डे येथे आजपासून हाफ पीच क्रिकेट स्पर्धा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवर्डे ता. आजरा येथे आजरा तालुका मर्यादित हाफ पीच क्रिकेट स्पर्धांचे आज रविवार दिनांक १९ व सोमवार दिनांक २० रोजी आयोजन करण्यात आले आहे. दिलीप पाटील प्रीमियर लीग अंतर्गत घोडे माळ देवर्डे येथे होणाऱ्या या स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ७००१/-, ५००१/-, ३००१/-, २००१/-, रुपये रोख व आकर्षक चषक बक्षीस स्वरूपात देण्यात येणार असून इतर अनेक वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.




