शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५


पेरणोली येथे ४५ जणाचे रक्तदान …सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता.आजरा येथील संस्थापक एकता गृहतारण व सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर झाले. ४५ जणांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान केले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पेरणोलीच्या सरपंच सौपत्नी प्रियांका संतोष जाधव अध्यक्षस्थानी होत्या. माजी सभापती उदयराज पवार, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, , उपसरपंच संकेत सावंत, ग्रामपंचायत सदस्य रणजीत फगरे, सामाजिक कार्यकर्ते उदय कोडक, एकता समुहाचे अध्यक्ष अनिल पारदे, यशवंत कोडक सचिन देसाई , युवराज लोंढे,संजय दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन उद्घाटन झाले.
यावेळी अण्णासाहेब गळतगे ब्लड बँक गडहिंग्लजचे डॉ. सुभाष पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. यावेळी संतोष जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. व्यासपीठावरील मान्यवरांचाही सत्कार झाला.
यावेळी अमर पवार, पांडुरंग दोरुगडे,सुरेश कालेकर,मारुती देसाई, अमर कालेकर, काकासो देसाई, मुरली देसाई, हर्षद लोंढे, निलेश चव्हाण, संतोष सावंत, संदीप पारदे, लाँरेन्स डिसोजा , अवि जोशीलकर ,एकनाथ जोशिलकर , राजेंद्र कळेकर ,राहुल लोखंडे, अरविंद लोखंडे सोपान फगरे, राजेंद्र भोकरे,के पी चव्हाण, यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रणजीत कालेकर स्वागत व प्रास्ताविक केले.

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर अखेर आजरा तालुक्यात सेवा पंधरवडा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्त सेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन व महात्मा गांधी जयंती यांच्या निमित्त आजारा तालुक्यामध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर अखेर सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली.
या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मंडळनिहाय एक एक गावांची निवड करून पाणंद रस्ते कार्यक्रम प्रसिद्ध करणे, गाव शिवार फेरी काढणे, गावातील रस्त्यांची यादी तयार करणे, ग्रामसभा घेऊन यादी अंतिम करणे, ग्राम ठरावासह यादी तहसीलदारांना सादर करणे, अतिक्रमण रस्त्याबाबत प्रस्ताव सादर करणे, भूमि अभिलेख विभागाकडून गाव नकाशातील रस्त्याबाबत आवश्यक ठिकाणी सीमांकन करणे, तहसीलदार यांनी रस्त्यावर अतिक्रमणाबाबत सुनावणी घेऊन आदेश पारित करणे, अतिक्रमण निष्कसित करणे, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे यासह विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले.

निधन वार्ता
शकुंतला गुरव

सुलगाव तालुका आजरा येथील शकुंतला बाळकृष्ण गुरव (८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने कोल्हापूर मुक्कामी निधन झाले.
त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा असून विवाहित मुली,जावई ,सून,नातवंडे असा परिवार आहे.
एस.टी. महामंडळाचे परिवहन अधिकारी प्रशांत/वैभव गुरव यांच्या त्या मातोश्री होत.

मोरजकर महाराज सप्ताह सांगता समारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले सात दिवस उत्साहात सुरू असलेल्या आजरा येथील ह.भ.प.लक्ष्मण बुवा मोरजकर यांच्या सप्ताहाची सांगता महाप्रसाद व तांदळाच्या प्रसादाने झाली.
सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ दिवस भजन, कीर्तन, प्रवचन या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच नेत्र तपासणी शिबिर, दिंडी असे विविध कार्यक्रम पार पडले.
पंचक्रोशीतील भाविकांसह महाराष्ट्र कर्नाटक व गोवा राज्यातील भाविकांनी या सप्ताह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात कोल्हापूरात बैठक
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुंबई ही केवळ स्वप्ननगरी नाही, तर गिरणी कामगारांच्या रक्त, घाम आणि अथक परिश्रमावर उभी राहिलेली नगरी आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईतील गिरण्यांमध्ये लाखो कामगार काम करत होते. या कामगारांनी आपल्या संसाराचा त्याग करून, अपार मेहनत, कठोर श्रम व संघटीत ताकद यांच्या जोरावर मुंबईचे औद्योगिक साम्राज्य उभे केले.
गिरणी कामगारांनी केलेल्या संघर्षामुळे केवळ औद्योगिक क्रांतीच घडली नाही तर देशातील कामगार चळवळीला देखील नवे बळ मिळाले. मात्र काळाच्या ओघात गिरण्या बंद पडल्या आणि कामगारांवर उपासमारीची वेळ आली. रोजगार गमावलेले कामगार आणि त्यांचे वारस आजही घर, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत गरजांपासून वंचित आहेत.
शासनाने गिरणी कामगारांना घरे देण्याचे वेळोवेळी आश्वासन दिले. काही प्रमाणात घरे वाटप झाली, पण अजूनही हजारो गिरणी कामगार व वारस हक्काच्या घरापासून वंचित आहेत. मुंबईतच घर मिळावे हीच त्यांची एकमुखी मागणी असून या प्रश्नावर आजवर अनेक मोर्चे, आंदोलने व उपोषणे झाली आहेत. तरीदेखील शासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही.
अलीकडेच काही ठगांनी गिरणी कामगारांना फोन करून “आम्ही म्हाडा मधून बोलत आहोत, तुमचे व्हेरिफिकेशन बाकी आहे” असे सांगून त्यांना फसवले. कामगारांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून OTP मागवला जातो आणि त्यानंतर खोटी कागदपत्रे व संमती पत्रे भरून घेतली जातात. ही संमती पत्रे पूर्णपणे फसवी असून, सदर बैठकीत ती संमती पत्रे तातडीने रद्द करून घेण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. अंबाजी गुरव यांच्या पुढाकाराने व आवाहनानुसार उद्या दिनांक १४ सप्टेंबर रविवार, संध्याकाळी ७ वाजता हनुमान मंदिर, धामणे येथे गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस सागर चव्हाण (गिरणी कामगार वारसदार) यांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे बैठकीस नवे बळ आणि दिशा मिळणार आहे.

सोमवारी सप्टेंबर रोजी देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचा किसान सभेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर निदर्शने
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सोमवार दि.१५ सप्टेंबर रोजी देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांची आजरा तहसिलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तालुक्यातील देवस्थान जमीन धारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्या बाबत सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. सदर आंदोलनात तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीन धारक शेतकरी तसेच इतर खाजगी ट्रस्टशी संबंधित सर्व देवस्थान शेतकरी सहभागी होत आहेत. सरसकट सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा आणि देवस्थान शेतकऱ्यांचे पीक पाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. निदर्शने आजरा तहसिलदार कार्यालयासमोर होऊन तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
देवस्थान शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य व न्याय निर्णय व्हावा.ही अखिल भारतीय किसान सभेची आग्रही भूमिका आहे.अन्यथा या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक व बेमुदत आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.असा इशारा देण्यासाठी व मागण्यांची अंमलबजावणी होण्यासाठी हा निदर्शने करण्यात येणार आहेत असे कॉ.संग्राम सावंत , ॲड.दशरथ दळवी, कॉ.शिवाजी गुरव, हणमंत गुरव, शिवाजी गिलबिले, संजय गुरव, जानबा धडाम, काशिनाथ तेली यांनी स्पष्ट केले आहे.


आज आजऱ्यात...
रामतीर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आजरा व सुयश शिक्षण संस्था आजरा यांच्यावतीने स्पर्धा परीक्षातील यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, यशस्वी शाळा व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण दुपारी एक वाजता डॉ. जे.पी.नाईक पतसंस्था सभागृहात होणार आहे.



