शनीवार दि. २८ डिसेंबर २०२४


उत्तूर येथील हत्येचा प्रयत्न प्रकरणी एकास सात वर्षाची शिक्षा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ता.आजरा येथील विनायक उर्फ विनोद एकनाथ घोरपडे याला गैरसमजातून सत्तुर ने मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी शकील मुन्ना तांबोळी ( वय वर्ष २८, रा. विनायक नगर, दुसरी गल्ली, सांगली ) याला भा.दं.वि.स. कलम ३२७ अंतर्गत सात वर्षाची शिक्षा व ५००० रुपये दंड सुनावला आहे. सदर घटना १४ ऑक्टोबर २०१८ रोजी रात्री १० वाजता उत्तूर येथे घडली होती .
उत्तुर येथील विनायक उर्फ विनोद घोरपडे हे दूध घालून घरी परतत असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दिलावर नाईकवाडे यांचे जावई शकील मुन्ना तांबोळी रा. सांगली व नौशाद निसार लतीफ ( रा. आजरा ) यांनी विनोद यांच्याकडे काम आहे असे फोनवरून सांगून त्यांना बोलावून घेतले. विनोद हे तेथे आले असता तांबोळी व लतीफ हे तेथे उभे होते. गैरसमजातून दोघांनी विनोद यांची गाडी थांबवून त्यांच्या हातातील सत्तूरने विनोद यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. याबाबतची फिर्याद सौ.नीता दिनकर शिवणे राहणार उत्तूर यांनी आजरा पोलिसात दिली होती.
याप्रकरणी मान. जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश, गडहिंग्लज यांनी शकील मुन्ना तांबोळी (वय वर्ष २८ रा. सांगली ) याला भा.दं.वि.सं. कलम ३०७/३४ अन्वये सात वर्षाची शिक्षा व ५०००/- रुपये दंड सुनावला आहे व दंड न भरलेस दोन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारी वकील म्हणून एस.ए.तेली यांनी काम पाहिले. तर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बी जगताप यांनी सदर प्रकरणाचा तपास केला होता.
यातील दुसरा आरोपी नौशाद लतीफ ( रा. आजरा ) हा यापूर्वी मयत झाला आहे.


स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी सुधीर कुंभार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन उपाध्यक्षपदी सुधीर बाबुराव कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक सुजय येजरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या झालेल्या विशेष सभेत सदर निवड झाली. उपाध्यक्ष पदासाठी सुधीर कुंभार यांचे नाव रवींद्र दामले यांनी सुचवले तर संचालिका सूनिता कुंभार यांनी अनुमोदन दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दयानंद भुसारी, संचालक शिवाजीराव येसणे, सुकाणू समिती सदस्य मलीककुमार बुरुड, अरुण देसाई, सर्व संचालक, सुकाणू समिती सदस्य, सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार व कर्मचारी उपस्थित होते.


‘व्यंकटराव’ चा आज विविध गुणदर्शन कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम आज शनिवार दिनांक २८ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिमला मैदानावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य आर.जी. कुंभार यांनी दिली आहे.


वाटंगी येथे आज कबड्डी स्पर्धा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सेंट सेबेस्टियन युथ ग्रुप, वाटंगी यांच्या वतीने ५८ किलो वजनी गटांमध्ये आज शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ५००१/- एक रुपये ४००१/- रुपये ३००१/- रुपये व २००१/- रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त बेस्ट बायडर व बेस्ट डिफेंडर याच्या करता स्वतंत्र चषक देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी ऑस्टिन डिसोझा ( ८४०८०२१८९७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


उत्तूरची महालक्ष्मी यात्रा १६ ते १८ मे रोजी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी यात्रेसंदर्भात यात्रा कमिटी व सरपंच ग्रामपंचायतमार्फत घेण्यात आलेल्या बैठकीत यंदाची महालक्ष्मी यात्रा १६ व १७ मे मध्ये करण्याचे सर्वानुमते ठरले. सन २०२५ च्या नियोजनासाठी येथील भावेश्वरी मंदिर येथे झालेल्या बैठकीत यात्रेची ठरविण्यात आलेली रूपरेषा पुढीलप्रमाणे अशी सोमवार १२ मे २०१५ रोजी इरडे पडणे, शुक्रवार १६ मे लक्ष्मी खेळवणे व जागर, शनिवार व रविवार- १७ मे व १८ मे – ओटी भरणे व भर यात्रा.
यात्रेसाठी तयार करण्यात आलेली कमिटी अशी अध्यक्ष अमृत लक्ष्मण पाटील, कार्याध्यक्ष किरण शंकर आमणगी, सचिव आप्पासाहेब रावजी शिंत्रे, खजिनदार – वैभव बाजीराव कुराडे, उपाध्यक्ष धैर्यशील मधुकर येसादे, सह उपाध्यक्ष – कल्लाप्पा ईश्वरा नाईक, सहसचिव – संजय अनंतराव धुरे, सहखजिनदार – मंदार श्रीपती हळवणकर सल्लागार – शशिकांत हरी रेडेकर, सल्लागार राजेंद्र चव्हाणवाडी.



