mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  दि. २९  डिसेंबर २०२४              

आजऱ्यात पाणीप्रश्नी शहरवासीय आक्रमक…
संतप्त शहरवासीय आंदोलनाच्या पवित्र्यात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरातील नळपाणीपुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून शहरातील अनेक भागांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्यातील प्रमुख पाणी प्रकल्प पूर्ण झाले असताना व हिरण्यकेशी आणि चित्रा नदीच्या काठावर असणाऱ्या शहरामध्ये मात्र पाण्याची वानवा दिसत आहे. नगरपंचायतीचे ढिसाळ नियोजन व नवीन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाण्याकरता लागणारा विलंब यामुळे शहरवासीय अक्षरशः वैतागून गेले आहेत. आता शहरातील पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

     शहरामध्ये पाणीपुरवठा वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे. काही ठिकाणी चार-चार, पाच-पाच दिवस पाण्याचा पत्ता नाही हे वास्तव आहे. अनेक ठिकाणी नळ पाणीपुरवठा योजनेला गळत्या लागल्या आहेत. तर कांही भागांमध्ये कमी दाबाने तर काही भागात दुषित पाणी येत आहे अशी अवस्था निर्माण झाली आहे. शहरवासीयांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवण्यास पाणीपुरवठा योजना कारणीभूत ठरू लागली आहे.

     जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली आहे तर नवीन पाणीपुरवठा योजना रेंगाळली आहे अशा विचित्र अवस्थेमध्ये आजरा शहरवासीय सापडले आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेमध्ये अर्थपूर्ण (?) व्यवहार झाल्याने या योजनेकडे अनेक मंडळी हेतूपुरस्कार दुर्लक्ष करत आहेत असा आरोप आता शहरवासीय करत आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन टाकण्याकरता शहरभर खुदाई सुरूच आहे. यामुळे शहरांमध्ये गल्लीबोळात सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे.

     नवीन पाणीपुरवठा योजनेवर नेमके नियंत्रण कोणाचे? ही योजना नेमकी केव्हापासून कार्यान्वित होणार ? हे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

शहराचे सौंदर्य घालवले…

      जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या गळत्या काढण्याकरता व नवीन पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन घालण्याकरता ठिकठिकाणी केलेल्या खुदाईने शहरभर सर्वत्र खड्डे, धूळ आणि धुळच असल्याने शहराचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे तर वयोवृद्ध नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

आखिर ‘ बंदर हो गया अंदर...’

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील हरपवडे गावात ग्रामस्थांना चांगलाच त्रास देणाऱ्या वानराला पिंजरा लावून बंदीस्त करण्यात वन विभागाला यश आले. या वानराने परिसरातील फळझाडे , पिके आणि घरांच्या नुकसानी बरोबरच स्थानिक ग्रामस्थांना जेरीस आणले होते.गावामध्ये वानरांची दहशत पसरली होती.

     याबाबत गावच्या सरपंच सागर पाटील, देवदास गुरव व ग्रामस्थांनी वनविभागाकडे या वानरांचा प्रतिबंध करण्याबाबत विनंती केली होती. वनविभागाने सदर वानर पकडून त्याची रवानगी आंबोली येथील जंगल परिसरात केली आहे.

नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट टाकून मक्तेदार गायब..

वझरे ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुक्यातील वझरे येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत टाकून मक्तेदार काम न करता पूर्ण बिले घेऊन गायब झाला असल्याने या निकृष्ट दर्जाच्या कामाची व अपूर्ण कामाची चौकशी व्हावी अन्यथा ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांसह सर्व ग्रामस्थ पंचायत समितीवर आंदोलन करणार असल्याचा इशारा वझरे ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांना देण्यात आला आहे.

      वझरे ता. आजरा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेतील प्रस्तावित कामामधील घागरवाडी येथील पुरवठा विहिरीचे बळकटीकरण, खोतवाडी, घागरवाडी, वझरे दाबनलिका, खोतवाडी येथे आरसीसी बैठी पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था इत्यादी कामे मक्तेदाराने अपूर्ण ठेवून काम न करता पूर्ण बिले घेतलेली आहेत. तसेच केलेली वितरण व्यवस्था ही पूर्णपणे ना शदुरुस्त झालेली आहे. मक्तेदाराने वितरण व्यवस्थेवर केलेले काँक्रीटही अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. मक्तेदार हा कोल्हापूरमध्ये राहत असून त्याने दुसऱ्या मक्तेदाराला हे काम दिलेले आहे असे सरपंच शांताबाई गुरव यांनी सांगितले.

     याबाबतचे लेखी पत्र देण्यात आले असून याप्रकरणी सदस्य मंगल भालेकर, तुकाराम कुंभार, भारती जाधव, शितल कांबळे, मधुकर खोत इत्यादी मंडळी आक्रमक झाली आहेत.

पेरणोली शाळेस येथे बेंटली सिस्टीम यांचे मार्फत ई लर्निंग प्रोजेक्टर प्रदान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     केंद्र शाळा विद्यामंदिर, पेरणोली येथे बेंटली सिस्टीम यांचे मार्फत ई लर्निंग प्रोजेक्टर मगरपट्टा पुणे येथे प्रदान करण्यात आला. ई लर्निंग प्रोजेक्टर चे उद्घाटन केंद्र शाळा पेरणोली येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

      यावेळी स्वागत श्रीम.कविता मगदूम यांनी केले.प्रास्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका अनुष्का गोवेकर यांनी शाळेचा आढावा मांडला. पेरणोलीच्या सरपंच मा. सौ.प्रियंका जाधव,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमर पवार,साखर कारखाना माजी संचालक राजेंद्र सावंत,उत्तम देसाई, काका देसाई, तानाजी भोकरे बेंटली सिस्टीमचे टेक्निकल सपोर्ट इंजिनियर तुषार बळवंत शिंत्रे यांच्या हस्ते सिस्टीमचे औपचारिक रित्या उद्घाटन करून बेंटली सिस्टीमच्या सामाजिक कार्याचा आढावा मांडला.तुषार शिंत्रे यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अविनाश जोशीलकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सर्व कमिटी मेंबर यांच्या हस्ते करण्यात आला.

      यावेळी शिक्षण तज्ञ किरण गुरव, उदय कोडक, बळवंत शिंत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप पारदे, पवन कालेकर नंदिनी देसाई, शितल हळवणकर ,सोनाली मोहिते,आरती शेडगे, दयानंद सासुलकर प्रभावती सावंत अश्विनी कांबळे विलास जाधव, अर्पिता शिंत्रे, रणजीत कालेकर .शैलेश कांबळे, शिक्षिका गायत्री नळकांडे तसेच ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

       आभार सौ. सुप्रिया पाटील यांनी मांडले.

व्हायरल बातमी…

….जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; या तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक !

        सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी तयार केलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची आवश्यकता ठरवली आहे. हे निर्णय वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी, वाहनांची ओळख पटवण्यासाठी आणि वाहनांवरील छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी खरेदी केलेल्या वाहनांसाठी ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे. जर तुमचे वाहन २ एप्रिल २०१९ पूर्वीचे असेल, तर तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. यामुळे वाहनांची ओळख निश्चित होईल आणि त्यांच्या सुरक्षा वैशिष्ट्यांची निगराणी केली जाईल. यामध्ये एखाद्या वाहनाच्या नंबर प्लेटला छेडछाड किंवा बनावट करणे अत्यंत कठीण होईल, कारण त्यामध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये असतात.

     १ एप्रिल २०१९ नंतर खरेदी केलेल्या वाहनांना उत्पादन कक्षामार्फत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली असते. त्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही. या नंबर प्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असतात. यामुळे वाहनांच्या छेडछाडीला प्रतिबंध होतो आणि वाहतुकीतील चोरी कमी होऊ शकते. तसेच, वाहनांच्या ओळखीला मदत मिळते आणि फसवणूक रोखता येते. यामुळे रस्त्यावर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घट होण्यास मदत होईल.

      सर्व वाहनधारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर [https://transport.maharashtra.gov.in](https://transport.maharashtra.gov.in) नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी तीन अधिकृत कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्यांकडून लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होणार नाही.

     तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्सच्या नोंदणी प्रक्रियेविषयी काही अडचणी, शंका किंवा तक्रारी असल्यास, तुम्ही परिवहन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर किंवा विभागाच्या ईमेल पत्त्यावर dytccomp.tpt-mh@gov.in संपर्क करू शकता. या ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला त्वरित तांत्रिक मदत आणि आवश्यक मार्गदर्शन मिळेल, तसेच अडचणींचे निराकरण करण्यात विभाग तुमच्या मदतीला तत्पर असेल. पोर्टलवर आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्यानंतर, तुम्ही नोंदणी प्रक्रियेतील प्रत्येक पायरी सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता.

     सर्व वाहनधारकांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करणे अनिवार्य आहे. या अंतिम तारखेपूर्वी नोंदणी न केल्यास, वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, नोंदणी न झालेल्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे शक्य होणार नाही आणि त्या वाहनावर कोणत्याही प्रकारचे कायदेशीर अडथळे येऊ शकतात. तसेच, योग्य नोंदणी नसल्यामुळे वाहनधारकांना दंड देखील लागू होऊ शकतो. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सर्व वाहनधारकांना या नंबर प्लेटची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, कारण यामुळे वाहतुकीची सुरक्षा वाढवता येईल आणि रस्त्यावर होणारी वाहनांची छेडछाड आणि बनावटगिरी रोखता येईल. त्यांनी सांगितले की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्सच्या वापरामुळे वाहतुकीची व्यवस्थित ओळख होईल, तसेच वाहने सुरक्षित राहतील. यामुळे त्यांचे उद्दिष्ट केवळ सुरक्षा वाढविणेच नाही, तर वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणि स्वच्छता आणणे आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यातील युवक अपघातात ठार

mrityunjay mahanews

आजऱ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा विराट जन आक्रोश मोर्चा 

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!