

एकाच कुटुंबातील तिघेजण बुडाले
सुळे गावावर शोककळा

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुळे ता. आजरा येथील अरुण बचाराम कटाळे( वय 55 वर्षे) उदय बचाराम कटाळे( वय 52 वर्षे) व जयप्रकाश अरुण कटाळे( वय तेरा वर्षे )यांचा गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली सुदैवाने यामध्ये ऋग्वेद उदय कटाळे हा बचावला. यात्रा कालावधीत सदर प्रकार घडल्याने सुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यात्रेनिमित्त आलेले हे कटाळे कुटुंबीय कपडे धुण्यासाठी व आंघोळी करता गजरगाव येथील बंधारा नदीपात्रामध्ये उतरले होते. यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून जयप्रकाश अरुण कटाळे यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
प्रवासी बस स्थानकावर… बसेस निवडणुकीसाठी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुळातच संख्येने कमी असणाऱ्या आजरा आगाराच्या बसेस निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दिल्या गेल्याने काल प्रवासी बस स्थानकावर बसची वाट पाहत तर बसेस निवडणूक प्रक्रिया साहित्य नेण्यासाठी अशी विचित्र परिस्थिती झाली.यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांनी तर वडापचा आधार घेतला परंतु कांही प्रवाशांना बसेस अभावी दिवसभर ताटकळत बसावे लागले.
प्रवाशांना कोणतीही कल्पना नसताना ऐनवेळी केवळ एक साधा फलक लावून आजरा आगाराने बहुतांशी बस फेऱ्या काल रद्द केल्या. प्रवासी याबाबत अनभिज्ञ असल्याने प्रवाशांनी प्रवासाकरिता बस स्थानक आवार गाठले परंतु गडहिंग्लज, कोल्हापूर सह ग्रामीण भागातील अनेक बसफे-या रद्द असल्याचे बस स्थानकावर गेल्यानंतर प्रवाशांना कळाले.असे असतानाही उपलब्ध बसेस केंव्हा सुटणार याच्या वेळापत्रकाचा कोठेही पत्ता नसल्याने तासनतास प्रवासी वर्गाला ताटकळत बसावे लागले. जी अवस्था आज-याहून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची झाली तीच अवस्था कोल्हापूर सह विविध भागातून आजर्याकडे येणाऱ्या प्रवाशांची बसअभावी झाली.

स्वामी विवेकानंद पतसंस्थेला ३ कोटी ३८ लाखांचा ढोबळ नफा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेला सन २०२३-२४ सालात ३ कोटी ३८ लाखांचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी करून रुपये १ कोटी ७४ लाखांचा निर्मळ नापास झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले व संचालक मंडळाने दिली आहे.
संस्थेचे वसूल भाग भांडवल चार कोटी ४७ लाख रुपये इतके असून आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी सुमारे चार कोटी ८९ लाख इतक्या वाढल्या असून एकूण ठेवी रुपये १८२ कोटी ७० लाख इतक्या झाल्या आहेत. संस्थेचे कर्ज वाटप चालू साली रुपये ९ कोटी ८३ लाख इतके वाढून एकूण कर्जवाटप १४५ कोटी ४२ लाख झाले आहे. संस्थेची गुंतवणूक ६० कोटी ७५ लाख इतकी असून संस्थेचा राखीव व इतर निधी १४ कोटी ८० लाख आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय ३२८ कोटी १२ लाखांपेक्षा अधिक झाला आहे.
संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून संस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमास आर्थिक मदत केली आहे. सर्व शाखांकडे ऑनलाइन विज बिल, फोन बिल, मोबाईल बिल, डीटीएच रिचार्ज, सर्व प्रकारची विमा पॉलिसी उतरवण्याची सोय, मनी ट्रान्सफर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संस्थेला राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कोकणामध्ये सहकार रुजवण्याचे काम संस्थेने केले असून सभासद व कर्मचाऱ्यांच्या विश्वासावर संस्थेचे कामकाज उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे अध्यक्ष टोपले यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष दयानंद भुसारी, संचालक नारायण सावंत, रवींद्र दामले, सुधीर कुंभार, रणजीत पाटील, विश्वजीत मुंज,राजेंद्र चंदनवाले, मुकुंद कांबळे, सौ. सुनीता कुंभार, सर व्यवस्थापक अर्जुन कुंभार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

९ मे रोजी आजरा येथे संयुक्त शिवजयंतीचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरात परंपरेनुसार होणाऱ्या शिवजयंतीचे आयोजन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.गेली कित्येक वर्षे आजरा शहरात शिवजयंती ही अत्यंत उत्साहात साजरी होताना दिसते.दरवर्षी सुमारे २५ हून अधिक मंडळे या पारंपरिक शिवजयंतीत एकत्र होऊन सहभागी असतात.
यंदाच्या वर्षी सदर शिवजयंती ही वैशाख शु.द्वितीया,शके १९४६,गुरुवार दि.०९ मे २०२४ रोजी होत असून यानिमित्ताने बुधवार वैशाख शु.प्रतिपदा दि.०८ मे रोजी सकाळी ११:०० वाजता छ.शिवरायांच्या मूर्तीवर घातल्या जाणाऱ्या अभिषेकासाठी हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे पवित्र जल आणले जाणार आहे.
गुरुवार वैशाख शु. द्वितीया, ०९ मे (शिवजयंती दिनी) सकाळी ७:०० वाजता शिवरायांच्या अर्धाकृती मूर्तीस महाभिषेक करण्यात येणार असून सकाळी १०:०० वाजता पाळणा होणार आहे.
गुरुवारी सायंकाळी शिवजयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे.यामध्ये लेझीम,सजीव देखावे,हलगी,घोडे,लहान मुलांची शिवकालीन वेशभूषा,लाईटशो व अजून बर्याचश्या गोष्टी असणार आहेत.सदर मिरवणूक ही सायंकाळी ४:३० वाजता व्यंकटराव हायस्कुल पासून सुरू होणार असून आजरा तालुक्यातील तमाम शिवभक्तांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन संयुक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

पोल्ट्रीची घाण टाकणा-यांवर कारवाईची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोल्ट्रीची घाण व इतर टाकाऊ साहित्य टाकले जात असल्याने असे साहित्य टाकणार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोल्ट्रीच्या माध्यमातून टाकल्या जाणाऱ्या या घाणीमुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरत असून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत आहे. नागरिकांच्या दृष्टीने ही घाण धोकादायक आहे.
काल चाफ्याच्या विहीरीजवळ पोल्ट्रीची घाण टाकताना होनेवाडीकरांनी , ग्रामसेवकांनी , पोलीस पाटील यांनी पोल्ट्रीची घाण टाकणारा ट्रॅक्टर रंगेहाथ पकडला .
नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून अशी कृत्ये करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अन्यथा आंदोलन.. अन्याय निवारण समितीचे निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील संभाजी चौक व बस स्थानक परिसरातील रस्ता तातडीने व्हावा पाहिजे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आजरा अन्याय निवारण समितीने उपविभागीय अधिकारी तसेच आजरा तहसीलदार यांना दिला आहे.
याबाबत स्वतंत्र निवेदन देण्यात आले असून निवेदनामध्ये आजरा शहरातील प्रमुख येथील रस्ता खुदाई करून ठेवला आहे. याकडे पावसाळा तोंडावर आला तरी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्गाचा हा सावळा गोंधळ थांबावा व संभाजी महाराज चौक आजरा येथील रस्ता ताबडतोड करावा.
संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे. परंतु आजरा शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक ते बस स्थानक परिसर येथील मेन रोड व आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रमुख रहदारीचा आंबोली गोवा मार्ग आहे. हा मार्ग दोन महिन्यापासून खुदाई करून ठेवला आहे. परंतु पुढील कामकाज काही चालू नाही. यामुळे मागील चार दिवसापूर्वी वळवाचा आलेला मोठा पाऊस यामध्ये साचलेले पाणी व झालेला चिखल, धुळीच्या साम्राज्यात रहिवासी व येथील व्यापारी आजरावासीय वावरत आहेत. वेळोवेळी तोंडी सूचना देऊन देखील याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्षच राहिलेले आहे. येथील संभाजी महाराज परिसर व बस स्थानकापर्यंत रस्ता झाल्याशिवाय कोणतेही दुसरे काम करू न देण्याचा निर्णय आजरावासियांनी घेतला आहे.
ऐन पावसाळ्यात रस्ता केल्यास पाण्याचा व चिखलाच्या साम्राज्याचा नाहक त्रास आजरावासियासह तालुक्यातील येणाऱ्या नागरिकांना होणार आहे. रस्त्याचे काम येत्या दोन दिवसात चालू न केल्यास लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याच रस्त्यावर रास्ता रोको अन्याय निवारण समिती आजरा व आजरा तालुक्यातील तमाम नागरिक लोकप्रतिनिधी यांच्या वतीने करण्यात येणार आहे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर समिती अध्यक्ष परशुराम बामणे, पांडुरंग सावरतकर, यशवंत इंजल, गोपाळ आजगेकर, राजु विभुते व सदस्य उपस्थित होते.



