mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

बुधवार दि.१८ जून २०२५       

ना सभासदत्व… ना साखर… ना पैसे परत…

‘त्या ‘ २७२२ जणांची अवस्था

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा साखर कारखान्याचे सभासदत्व मिळवण्यासाठी कारखान्याकडे भाग भांडवलपोटी रकमा भरल्या. दरम्यानच्या काळात कारखान्यातील अंतर्गत राजकारण उफाळून आले. या मंडळींच्या सभासदत्वाबाबत हरकती घेतल्या गेल्या. या सर्व प्रकारात सभासदत्व तर मिळाले नाहीच परंतु भरून घेतलेले पैसेही नाहीत आणि साखरही नाही अशी विचित्र अवस्था पैसे भरलेल्या २७२२ जणांची झाली असून किमान आम्हाला पैसे तरी परत द्या. अशी मागणी आता होत आहे.

      सभासदत्व मिळेल या आशेने संबंधितांनी चार ते पाच वर्षांपूर्वी सदर रकमा भरल्या होत्या. परंतु संचालक मंडळांतर्गत संघर्षामुळे या मंडळींना आजतागायत सभासदत्व मिळालेले नाही. जर सभासदत्व मिळत नसेल तर किमान भरलेल्या रकमा तरी परत करा असा पवित्रा आता संबंधित मंडळी घेऊ लागली आहेत.

       सद्यस्थितीत कारखाना आर्थिक संघर्षातून वाटचाल करत असल्याने लाखो रुपयांच्या या रकमा परत मिळतील का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.

राजकीय हेतूने केलेले मतदार वगळा
‘अन्याय निवारण’ ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सन २०२५ मध्ये होणाऱ्या आजरा नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रभागांमध्ये सखोल चौकशी केली असता असे निदर्शनास आले आहे की, काही मतदार हे प्रत्यक्षात संबंधीत प्रभागात वास्तव्यास नसून ते परगावचे रहिवासी आहेत. असे मतदार केवळ नाव नोंदवून मतदानाचा लाभ घेत आहेत. परंतु वास्तवात त्या ठिकाणी वास्तव्य करत नाहीत.

       या प्रकारामुळे निवडणूकीत स्थानिक नागरिकांच्या मताधिकारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व न्याय राहण्यासाठी अशा बाहेरील व वास्तव्यास नसलेल्या मतदारांची केवळ राजकीय हेतूने मतदार यादीत घुसडलेली नावे मतदार यादी मधून वगळण्यात यावीत अशी मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे. याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

       त्याचप्रमाणे जर असे बोगस मतदार मतदान करतेवेळी आढळून आले किंवा कोणी त्यांचे विषयी आपणाकडे तक्रार आलेस कडक कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.

      निवेदनावर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, बंडोपंत चव्हाण, मिनीन डिसोझा, वाय. बी. चव्हाण, गौरव देशपांडे, विजय थोरवत, जोतिबा आजगेकर,पांडुरंग सावरतकर, जावेद पठाण, आदींच्या सह्या आहेत.

भाताचे उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रियेबरोबर रोपवाटीका व्यवस्थापन महत्वाचे : डॉ .शैलेश कुंभार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भाताचे उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया जितकी महत्त्वाची आहे तितकेच रोपवाटीका व्यवस्थापन महत्वाचे आहे. असे प्रतिपादन राधानगरी कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ .शैलेश कुंभार यांनी केले.

     देऊळवाडी तर्फे पोतनीस सातेवाडी येथे शेतकरी शेतीशाळा कार्यक्रम झाला. या वेळी डॉ .कुंभार यांनी मार्गदर्शन केले. रिसोर्स फार्मर सूर्यकांत दोरुगडे, कृषी सेवक स्वामिनी दातीर, मंगेश पोतनीस, गोपाळ कदम, संभाजी पोतनीस प्रमु‌ख उपस्थित होते.

      आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अमित यमगेकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात शेतीशाळेचे महत्व व उद्देश स्पष्ट केले डॉ. कुंभार म्हणाले, शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावे. मातीचा पोत सुधारण्यासाठी कंपोष्ट, हिरवळ व शेणखताचा वापराबरोबर मातीचा सामु तपासावा, जमिन तयार करताना शेणखताबरोबर सोळा मुलद्रव्यांची आवश्यकता असते. यापध्दतीने खतांचा वापर केल्यास जमिन सुपिक होते. श्री. दोरुगडे म्हणाले, पेरणीपूर्वी
शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावी. या वेळी त्यांनी बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवले.
भात लागवडीच्या चार सुत्री, श्रीपध्दतीची माहीती दिली. के. दातिर यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहीती दिली.

       यावेळी संतोष पोतनीस, मनोहर पोतनीस, सुरेश पोवार, गीता पाटील, जयश्री पोतनीस यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. गोपाळ कदम यांनी आभार मानले.

व्यंकटराव शिक्षण संकुलात नवागतांचे स्वागत

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       येथील आजरा महाल शिक्षण मंडळ, आजरा संचलित व्यंकटराव शिक्षण संकुलात नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांसह प्रशालेच्या प्रवेशद्वारावर ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. प्रशालेच्या प्रांगणातील सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन संस्थेचे संचालक श्री. सचिन शिंपी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष श्री. एस. पी. कांबळे, सचिव श्री. अभिषेक शिंपी, खजिनदार श्री. सुनील पाटील ,संचालक श्री.कृष्णा पटेकर, श्री. सुधाकर जाधव, श्री. विलास पाटील, प्राचार्य श्री. एम. एम. नागर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार उपस्थित होते.

       मान्यवरांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन त्यांना वह्या, पुस्तक व ड्रेस यांचे वाटप करण्यात आले. यावेळी काही पालकही उपस्थित होते त्यांचेही स्वागत करण्यात आले.

      अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांनी शाळेत आलेल्या नवीन व जुन्या सर्व विद्यार्थ्यांना मन लावून शिकत आपले ध्येय साध्य करण्याबरोबरच आई-वडिलांचे स्वप्नही साकार करण्याबद्दल सांगितले. तुमचे यश हेच शाळेचे यश आहे या शाळेत आपल्याला पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कारक्षम शिक्षण देण्याकडे आमच्या शिक्षकांचा विशेष कल असेल असे सांगून शुभेच्छा दिल्या.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. आर. पाटील यांनी केले व श्री. पी. व्ही. पाटील यांनी आभार मानले.

श्री रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिरच्या नवागतांचे स्वागत...

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      श्री रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर येथे नवागतांच्या स्वागताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री. अशोक आण्णा चराटी, उपाध्यक्ष श्री. विलास नाईक, श्री. विजय पाटील, सल्लागार श्री.विजय बांदेकर , सौ. सुरेखा भालेराव , सौ.नूरजहॉं सोलापुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

      यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले तसेच गोड खाऊ म्हणून चॉकलेट वाटून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पोतदार यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देसाई यांनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सौ. कामत , सहशिक्षिका सौ. कुराडे , सहशिक्षक श्री. बिद्रे सर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच आदर्श बालक मंदिर व रवळनाथ बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. नारे व इतर शिक्षक वृंद उपस्थित होता. आभार कु.घेवडे यांनी मानले.

विदया मंदीर पेरणोली येथे नवागतांचे स्वागत

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        पेरणोली लोकनियुक्त सरपंच प्रियांका जाधव व पंचायत समिती माजी सभापती उदय पवार यांचे हस्ते पेरणोली प्राथमिक विद्यामंदिर मध्ये नवागंताचे स्वागत व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

       मुलांच्या स्वागतासाठी गुलाब व फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून वर्गात प्रवेश देण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांनी आपल्या मनोगतातून शाळेवर पालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल पालकांचे आभार मानले.माजी सभापती उदय पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

      ‘एक पेड माँ के नाम…’ या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या शुभहस्ते शाळा परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

       व्यवस्थापन समिती सदस्य संदीप पारदे,इतर सदस्य सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अनुष्का गोवेकर  यांनी केले.

पाऊस पाणी…

       तीन ते चार दिवसाच्या सलग पावसानंतर काल मंगळवारी तालुकावासियांना सूर्यदर्शन झाले. दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठेत गर्दी दिसत होती. सायंकाळनंतर मात्र पुन्हा पावसाने हजेरी लावली.

विशेष सूचना :-

      ” या पोर्टल चॅनल वरील प्रसिद्ध बातम्या/ लेख / फोटो कॉपी पेस्ट करणे अथवा इतरत्र प्रसिद्ध करताना पूर्व परवानगी आवश्यक आहे.”

               …. मुख्य संपादक 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

एसटी चालकाला मारहाणप्रकरणी सातजणांविरोधात गुन्हा नोंद…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!