मंगळवार १७ जून २०२५

खेळ कुणाला दैवाचा कळला…?
सागर व सुषमाच्या मृत्युने तालुका हळहळला...

लहानपणीच आईचे क्षत्र हरवणे, कोरोनामध्ये अचानकपणे वडिलांचे निधन होणे, त्यातूनही स्वतःला सावरत जिद्दीने उभे राहणे, येणाऱ्या प्रत्येक संकटाशी सामना करणे असा स्वभाव असणाऱ्या सागरच्या दणक्यात झालेल्या विवाहाची चर्चा सुरू असतानाच केवळ महिनाभरातच विश्वासापलीकडचा त्याचा पत्नीसह झालेला मृत्यू निश्चितच अनेकांच्या मनाला चटका लावून गेला. खेळ कुणाला दैवाचा कळला..? याची प्रचिती आजरेकरांना आली.
गॅस गिझरने पाणी तापवण्याचे निमित्त झाले व हे केवळ मृत्यूसाठी कारण ठरले. ३२ वर्षीय सागर व २६ वर्षीय सुषमा यांचा धक्कादायक रित्या घुसमटून मृत्यू झाला. तालुक्यात प्रथमच अशी घटना घडली असल्याने अनेकांचा या घटनेवर आजही विश्वास बसत नाही. परंतु होनी को कोन टाल सकता है… त्यांच्या मृत्यूचे सत्य हे स्वीकारावेच लागेल.

विवाह सोहळ्याच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांच्या व मित्र परिवाराच्या स्वागतासाठी लावण्यात आलेला डिजिटल फलक काढण्यापूर्वीच केवळ २६ दिवसांचा नुकताच सुरू झालेला संसार उध्वस्त झाला.
अत्यंत संघर्षातून सुरू असलेली सागरची यशस्वी वाटचाल केवळ एका घटनेने संपुष्टात आली. रात्री उशिरा त्यांच्यावर शिवाजी नगर स्मशानभूमीत एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले.

तालुकावासीयांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका…
सर्वपक्षीय बैठकीतून इशारा, जि.प.चे तीन गट कायम ठेवण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
डोंगराळ आणि दुर्गम असलेल्या आजरा तालुक्यावर सातत्याने अन्याय होत आला आहे. विधानसभा मतदार संघ पुनर्रचना असो, उपविभाग निर्मिती असो याचा प्रत्येक वेळी आजरा तालुकाच बळी ठरला आहे. आता तर जिल्हा परिषदेचा तालुक्यातील एक गट रद्द करून तालुकावासीयांवर पुन्हा अन्याय करण्यात आला असून शासन व प्रशासनाने तालुकावासीयांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारा सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आला. आण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली आजरा नगरपंचायत सभागृहात ही बैठक पार पडली.
यावेळी चराटी म्हणाले, तीन विधानसभा मतदार संघात तालुका विभागल्याने विकासाला मर्यादा आल्या आहेत. आता जि. प. चा एक गट रद्द करण्यात आल्याने विकासाला खीळ बसणार असून यासाठी सर्वपक्षीयांचा लढा उभारणे आवश्यक आहे. तालुक्यातील जनतेच्या हितासाठी सर्वपक्षीय मंडळीच्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा लागला तरी सर्वांनी तयारी ठेवावी. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांनाही आपत्त्यासोबत घ्यावे लागले असे मतही चराटी यांनी मांडले.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढ्याचीही तयारी ठेवू आजरा तालुका आता अन्याय सहन करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया माजी नगरसेवक विलास नाईक यांनी व्यक्त केली. तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा शासनाने विचार केला पाहिजे असे मत माजी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी व्यक्त केले. तर गगनबावडा तालुक्यात १८ हजार लोकसंख्येला, जिल्हयातील इतर तालुक्यातील बहुतांशी जि. प. गट ३० ते ३५ हजार लोकसंख्या धरून तयार केले असताना आजरा तालुक्यातच ५० हजारांचा एक गट कशासाठी असा सवाल शिंपी यांनी केला.
आजरा साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई म्हणाले, प्रत्येक वेळी नवा प्रयोग आजरा तालुक्यावरच केला जातो, त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या नकाशात आजरा तालुका असेल की नाही याची शाश्वती नाही अशी शंका देसाई यांनी उपस्थित केली. तालुक्याला पूर्ववत जिल्हा परिषदेचे तीन गट व पंचायत समितीचे सहा गण व्हावेत यासाठी सत्ताधारी पक्षांच्या मंडळींनी दोन मंत्री व आमदारांसह पुढाकार घ्यावा आम्ही तुमच्या सोबत असत्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. यानंतर सी. आर. देसाई यांनी निवेदनाचे वाचन केले.
ज्ञजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे म्हणाले, १९९२ मध्ये तालुक्यात चार गट आणि आठ गण होते. नंतरच्या काळात ही संख्या तीन गट व सहा गण अशी झाली. आता निवडणूक आयोगाने दोन गट व चार गण अशी रचना करताना तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला आहे. आजरा नगरपंचायत क्षेत्रातील लोकसंख्या वगळून देखील १ लाख २ हजारांवर लोकसंख्या असताना तीन गट कायम राहणे गरजेचे होते. तालुक्याची भौगोलिक स्थितीचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. यासाठी तालुक्याचे तीनही आमदारांना सीचत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. शासनच्या परिपत्रकानुसार जि. प. सदस्या संख्या ७५ पर्यंत वाढविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. आता ही संख्या ६८ असून आजऱ्याचा एक गट वाढविल्यास ती ६९ होईल. त्यामुळे कोठेही नियमांचे उल्लंघन होण्याचा प्रश्न राहत नाही. हा प्रश्न आज-याची अस्मिता बनला आहे.
यावेळी बैठकीस शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, राजेंद्रसिंह सावंत, रमेश रेडेकर, प्रकाश कोंडुस्कर, राजू होलम, दशरथ अमृते, जनार्दन टोपले, रणजीत सरदेसाई, विक्रम देसाई, अनिकेत चराटे संभाजी सरदेसाई ,परेश पोतदार,उमेश पारपोलकर, संजय रेडेकर, संभाजी पाटील(हात्तीवडे) दिगंबर देसाई, किरण कांबळे, बाळ केसरकर, रवींद्र भाटले, बिलाल लतीफ, किरण कांबळे, अमित गुरव, अनिल पाटील, तानाजीराव देसाई, दयानंद नेऊंगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पोरांची उत्तरे बघून सायबाच्या भुवया उंचावल्या
विद्या मंदिर शेळप शाळेस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शाळेच्या पहिल्याच दिवशी भर पावसात जिल्हाधिकारी मअमोल येडगे यांनी विद्या मंदिर शेळप शाळेस भेट दिली. शाळेतील वर्गखोल्या,पट, विद्यार्थी, शिक्षक याविषयी माहिती घेतली.नंतर इयत्ता पहिली व चौथीच्या वर्गाला भेट दिली.मुलांशी संवाद साधला. मुलांशी बोलताना साहेब आपुलकीने बोलत होते.त्यामुळे मुलांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला.मुलांनी न घाबरता हाताची घडी घालून साहेबांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलेली समर्पक उत्तरे पाहून जिल्हाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. ग्रामीण भागातील शिक्षणाचा उत्तम दर्जाही यामुळे अधोरेखित झाला.
आपण जिल्हाधिकारी साहेबांशी बोलत आहोत हे माहित नसल्याने मुले निरागसपणे बोलत होती.साहेबांनी मुलांचे खूप कौतुक केले.मुलांशी संवाद साधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कौशल्य पाहून उपस्थित सर्वच अचंबित झाले.
शालेय परिसर, वर्गखोल्या अतिशय सुंदर व बोलक्या असल्याने एकंदरीत शालेय कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासोबत आजऱ्याचे तहसीलदार समीर माने, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ ,नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई , गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव ,मंडल अधिकारी सौ.गीता कुंभार ,शेळप गावचे सरपंच अर्जुन बागडी ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री.सानप , पोलीस पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा आजगेकर ,अध्यापक श्री.संभाजी बापट ,सौ. अर्चना पाटील मॅडम विषय शिक्षक श्री. परमेश्वर नलवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवागतांच्या स्वागतासाठी किटवडे धनगर वाड्यावर जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शाळा प्रवेशोत्सव दिनानिमित्त आदरणीय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी म आजरा व कोल्हापूर मधील सर्वात दूर व दुर्गम अतिपावसाच्या ठिकाणी असलेल्या धनगरवाडा, किटवडे शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर स्वागत करून शुभेच्छा दिल्या . ठीक सकाळी साडेनऊ वाजता संबंधित शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांना पुस्तके गणवेश ,खाऊ वाटप व व इतर साहित्य वाटप करण्यात आले
यावेळी सदर शाळेचे शिक्षक श्री. कोकितकर यांनी शाळेबद्दलची माहिती देऊन मुलांचे गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल सविस्तर माहिती दिली .
जिल्हाधिकारी यांनी श्री. कोकितकर सर वर्षापासून सदर दुर्गम शाळेत काम करत असून मुलांची गुणवत्ता व अभ्यास याबद्दल चांगले प्रयत्न केल्यामुळे त्यांचे कौतुक केले. त्यानंतर तिथे ग्रामस्थांची संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून सांगितल्या व प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घाटकरवाडी येथील तलावात पर्यटन पर्यटन संबंधित काय उपाययोजना करण्यात येतील यासाठी भेट दिली .तसेच दाभिल येथील घनसाळ तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांची भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच घनसाळ तांदळाचे ब्रॅण्डिंग करणे तसेच त्यामध्ये भेसळ होणार नाही यासाठी कसे प्रयत्न करता येईल याबाबत तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी यांना सूचना दिल्या. तहसील कार्यालयात सर्व विभागाचे अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून नैसर्गिक आपत्ती मधील उपाय योजना तसेच विविध प्रशासकीय कामे याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी श्री संपत खिलारी, प्रांताधिकारी श्री हरेश सुळ, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, गट शिक्षण अधिकारी बी.सी. गुरव नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई व महसूल अधिकारी तलाठी कर्मचारी उपस्थित होते.

पावसाचा जोर वाढला..
साळगाव बंधाऱ्यावर पाणी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात काल जोरदार पावसाने हजेरी लावली. एकीकडे सर्फनाला प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी व दुसरीकडे जोरदार सुरू असलेला पाऊस यामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सायंकाळी उशिरा साळगाव बंधाऱ्यावर पाणी येण्यास सुरुवात झाली होती.
गेले दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी घरीच राहणे पसंत केल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या रोडावली होती. साळगाव मार्गावरील वाहतूक सोहाळे -बाची मार्गे वळवण्यात आली.
पावसाच्या जोरदार सरींमुळे शहरात ठीक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसत होते.
रामतीर्थ परिसरात दक्षता…
पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने रामतीर्थ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. मुख्य धबधब्याशेजारी असणाऱ्या पुलावर जाण्याची प्रतिबंध करण्यात आला आहे. पावसामुळे वर्षा पर्यटकांची मात्र गर्दी दिसू लागली आहे.

डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये नवागतांचे स्वागत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अंजुमन इत्तेहादूल इस्लाम आजरा संचलित , डॉ. झाकीर हुसेन अंँग्लो उर्दू हायस्कूल अ़ँण्ड ज्युनिअर कालेज आजरामध्ये चालू शैक्षणिक वर्ष (२०२५-२६) शाळेच्या पहिल्या दिवशी इ. ५ वी मध्ये प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि स्कूल बॅग,वह्या, पेन, ओळख पत्र, बूट, सॉक्स व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. हाजी आलम अहमद नाईकवाडे, उपाध्यक्ष श्री. शौकत खताल लाडजी, सचिव श्री. हुसेन खुद्दबू दरवाजावर व खजिनदार श्री. अष्कर लष्करे व इतर संचालक यांच्या शुभ हस्ते सदरचे शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणेत आले.
यावेळी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

छाया वृत्त…

आजरा तालुक्यातील जिल्हा परीषदेची एक सदस्य व पंचायत समितीचे दोन सदस्यसंख्या कमी केली आहे ती पूर्ववत करावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देताना आजरा तालुका सरपंच संघटनेचे पदाधिकारी…
निधन वार्ता
पारूबाई आतकरे

यरंडोळ ता. आजरा येथील पारुबाई परसू आतकरे (वय – ७० वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुन, जावई नातवंडे असा परिवार आहे. येथील मातोश्री दूध संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव पाटील यांच्या त्या सासू होत.
दयानंद पाटील

हालेवाडी ता. आजरा येथील माजी सरपंच नंदू उर्फ दयानंद वाकोजी पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. हालेवाडी गावातील लक्ष्मी सहकारी दूध संस्थेचे ते सेक्रेटरी होते.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, तीन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.


