mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  दि. १६ ऑगस्ट २०२५         

आजरा तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय ध्वजारोहण तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पंचायत समिती येथे सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आजरा अर्बन बँकेमध्ये अध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते तर आजरा साखर कारखाना व जनता सहकारी बँकेमध्ये अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वामी विवेकानंद पतसंस्थेमध्ये अध्यक्ष दयानंद भुसारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आजरा शाखेमध्ये तालुका संघाचे उपाध्यक्ष दौलती पाटील यांच्या हस्ते तर तालुका खरेदी विक्री संघामध्ये अध्यक्ष महादेव पाटील धामणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तालुकाभर स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

व्यंकटराव शिक्षण संकुल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिवस विविध शालेय उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.

आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. त्याचबरोबर व्यंकटराव शिक्षण संकुलाच्या नवीन बोधचिन्ह फलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. एस. पी. कांबळे, सचिव श्री. अभिषेक शिंपी, संचालक श्री. पांडुरंग जाधव, श्री. कृष्णा पटेकर , श्री. सुधीर जाधव श्री. सचिन शिंपी तसेच आनंदराव कुंभार, श्री रवी केळकर, श्री सदाशिव डेळेकर , श्री बाबाजी नाईक , सिनिअर कॉलेजचे प्र. प्राचार्य श्री पन्हाळकर ,प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार, प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री. आर. व्ही.देसाई, व्यंकटराव शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक, हितचिंतक, विद्यार्थी आणि आजरा नगरीतील नागरिक उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव मा श्री अभिषेक शिंपी यांच्या संकल्पनेतून शाळा व परिसर तसेच शाळेतील, तहसील कार्यालय येथील शासकीय ध्वजारोहण व्हिडिओ रिल स्पर्धा, घोषवाक्य , पोस्टर व फलक लेखन स्पर्धा आयोजित केली होती. हा उपक्रम कलाशिक्षक कृष्णा दावणे व श्री एस एम पाटील यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने राबवून त्यातील उत्कृष्ट घोषवाक्य फलक व पोस्टर यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यामार्फत आजरा तहसील कार्यालयासमोरील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांच्या मदतीने करण्यात आले. स्वच्छ आजरा सुंदर आजरा, व्यसनाचे दुष्परिणाम, कचऱ्याचे निर्मूलन, मोबाईलचा अति वापर आणि दुष्परिणाम, पर्यावरण रक्षण ही आमची जबाबदारी, प्लास्टिक बंदी इत्यादी विषयावरील विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे आजरा तहसीलदार श्री. समीर माने यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आली.

रवळनाथ पतसंस्थेतील ध्वजारोहणाचा मान संस्थापक सभासदाला

रवळनाथ पतसंस्थेत भारतीय स्वातंत्रदिनी होणारे ध्वजारोहण संस्थापक सभासद व सामाजिक कार्यकर्ते अहमदसाब मुराद यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी प्रजासत्ताकदिनी व स्वातंत्र्यदिनी होणारे ध्वजारोहण हे संस्थेचे अध्यक्ष अभिषेक शिंपी हे आपण स्वतः न करता समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ सभासद, महिला आदी व्यक्तींना ध्वजारोहणाचा मान देतात. त्याप्रमाणे यंदाही अध्यक्ष शिंपी यांनी संस्थापक सभासद मुराद यांना ध्वजारोहणाचा मान देवून आपला समाजासमोरील आदर्श कायम ठेवला आहे. दरवर्षी संस्थेत स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी होणारे ध्वजारोहण विदयमान अध्यक्ष यांच्या हस्ते केले जाते. मात्र शिंपी यांनी आपण अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर आपल्या काळात होणारे ध्वजारोहण हे आपण स्वतः न करता समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ सभासद, महिला आदी व्यक्तींना ध्वजारोहणाचा मान देण्याचा निर्णय घेतला व स्वातंत्रदिनी होणा-या पहिल्या ध्वजारोहणाचा मान ज्येष्ठ सभासद देगा डिसोझा यांना दिला त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी होणारे ध्वजारोहणाचा मान जिल्हयातील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. स्मिता फर्नांडीस यांना देवून महिलांचाही सन्मान करण्यात आला. यंदाही संस्थेचे संस्थापक सभासद मुराद यांना ध्वजारोहणाचा मान दिल्याने अध्यक्ष शिंपी यांनी सुरू केलेला पायंडा या निमित्ताने कायम राहिला आहे.

यावेळी दिवाकर नलवडे, देगा डिसोझा, दयानंद गजरे, राजू परीट, नितीन कारेकर, संगम गुंजाटी, हुसेन दरवाजकर, मंजुर मुजावर, अबु माणगावकर, संस्थेचे उपाध्यक्ष समीर गुंजाटी, सर्व संचालक, मॅनेजर विश्वास हरेर उपस्थित होते.

उत्तूरमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ; ध्वजारोहण व कवायत सादर

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्तूर व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत आणि स्थानिक शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, तरुण, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.मुख्य कार्यक्रम उत्तूर ग्रामपंचायत या सार्वजनिक ठिकाणी पार पडला.

सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावातील माजी सैनिक, शिक्षकवर्ग, महिला व पुरुष नागरिक, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर सर्व शाळांनी मिळून कवायत प्रकारांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व तालबद्ध पद्धतीने कवायत सादर केली. त्यांच्या एकसंध हालचाली आणि देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचा इतिहास व त्यामागील बलिदानांची माहिती दिली.

माजी सैनिकांनी आपल्या आठवणी सांगत तरुण पिढीला देशसेवेचे महत्त्व पटवून दिले.
गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन, उत्तूर कमान, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व शाळांमध्ये देखील स्वतंत्रपणे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले. प्रत्येक ठिकाणी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.

मुमेवाडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

मुमेवाडी तालुका आजरा येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

प्राथमिक विद्यामंदिर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. वैभव कांबळे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास शाळा व्यावस्थापन समितीचे सर्व सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत श्री. एकनाथ पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. गुरव सर यांनी केले. यावेळी देवचंद कॉलेज चे माजी प्राध्यापक श्री. व्ही. जी. घाटगे यांच्या वतीने शाळेला क्रीडा साहित्य देण्यात आले. तसेच ग्रामपंचायत, माजी मुख्याध्यापक श्री. विठ्ठल भिऊंगडे व आनंदा भिऊंगडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच श्री. संत बाळूमामा दूध संस्था चेअरमन रामदास साठे यांच्या वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आला. यावेळी श्री. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती निमित्य पसायदानाचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मान्यवरांचे आभार पुंडपळ यांनी मानले.

भादवण येथे सैन्यदलातील मुलांच्या आई वडीलांच्या हस्ते ध्वजारोहण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवण ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त शिलालेख पूजन लोकनियुक्त सरपंच प्रा. सौ माधुरी रणजित गाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.भारतीय सैन्य दलात व पोलिस भरती झालेल्या मुला – मुलींच्या आई – वडीलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यामुळे नवीन पिढी समोर एक नवीन आदर्श निर्माण करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

यावेळी श्री.आनंदा आजगेकर यांनी लिहीलेले “माझ गाव” या पुस्तकाचे प्रकाशन सरपंच व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . पोस्टमन म्हणून सेवानिवृत्त झालेल्या श्री आनंदा डोंगरे तसेच दहावी परीक्षा , शिष्यवृत्ती परीक्षा व क्रिडा स्पर्धामध्ये विशेष प्राविण्य मिळवले बद्दल आदर्श विद्या मंदिर व भादवण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव करण्यात आला .

यावेळी माजी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी – माजी सैनिक संघटना, सेवा सोसायटी संचालक, तंटामुक्त समिती , शाळा व्यवस्थापन समिती, देवस्थान समिती, विविध संस्थांचे , ग्राम विकास अधिकारी , तलाठी , शाळेंचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका ,युवक युवती,महिला,भादवण ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .

वाटंगी हायस्कूलमध्ये ध्वजारोहण उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाटंगी हायस्कूल वाटंगी येथे ध्वजारोहण गोकुळ दुध संस्था वाटंगीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर सोनार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नवसाक्षरांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीचे मार्च २०२५ मधील उत्तीर्ण विद्यार्थी यांचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास शाळेचा सर्व स्टाफ सर्व विद्यार्थी, संस्था अध्यक्ष श्री. अल्बर्ट डिसोझा, गोकुळ दुध संस्था वाटंगी चे संचालक व ग्रामपंचायत सदस्य, पालक उपस्थित होते.

मुख्याध्यापक अनिल देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. संगीत कवायतीचे उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थ्यांना मार्फत करण्यात आले.

बीरेश्वर पतसंस्था

येथील जोल्ले ग्रुपच्या बीरेश्वर पतसंस्थेत शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संचालक महेश कुरूणकर, तानाजी डोणकर, अनिकेत शिंत्रे, सुरेश मिटगे, सुशांत निकम, पत्रकार रणजीत कालेकर, हर्षद देसाई व्यवस्थापक दत्तात्रय सुतार, कु. संस्कृती सावंत, युवराज पाटील, तुषार इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पेरणोली ग्रामपंचायतचा प्रथम कर भरणाऱ्या चंद्रकांत वंजारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोली ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त शिलालेख पूजन मेजर मारुती कळेकर व संविधान कट्टा पुजन सरपंच सौ. प्रियांका संतोष जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.

पेरणोली सरपंच यांनी आपला ध्वजारोहणाचा मान ग्रामपंचायत सन २०२५-२०२६ मध्ये प्रथम कर भरणाऱ्या सामान्य कुटुबातील शेतकरी चंद्रकांत वंजारे यांना दिला. ग्रामपंचायत कर वाढला तर गावचा विकास करता येतो. तसेच तंबाखु व्यसनमुक्ती शपथ संजय मोहिते यांनी सर्वाकडुन घेतली.

दहावी परीक्षा , शिष्यवृत्ती परीक्षा व आदर्श विद्या मंदिर व पेरणोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव करण्यात आला . यावेळी सरपंच प्रियांका जाधव, उपसरपंच संकेत सावंत , ग्रामपंचायत सदस्य रणजीत फगरे , अमोल जाधव , संदीप नावलकर, रुपाली पाईम,आश्विनी कांबळे, शुभदा सावंत, सुनिता कालेकर, माजी सभापती उदयराज पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमर पवार,आजी – माजी सैनिक संघटना, तंटामुक्त समिती , शाळा व्यवस्थापन समिती, विविध संस्थांचे पदाधिकारी , ग्राम विकास अधिकारी , तलाठी , शाळेंचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका ,युवक- युवती ,महिला ,पेरणोली ग्रामस्थ व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते .

डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल

डॉ.झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज आजराचे चेअरमन श्री.आलम अहमद नाईकवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यक्तिमत्व व कौशल्य विकास प्रशिक्षण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचालित, आजरा महाविद्यालय आजरा येथे तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाच्या IQAC व कॉम्प्युटर सायन्स (संगणकशास्त्र) विभागाच्या वतीने दिनांक ५ ऑगस्ट २०२५ ते १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत ‘Employability Enhancement and Youth Livelihood’ हा कौशल्यवृद्धी करणारा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. नांदी फौन्डेशन पुणे यांच्या महिंद्रा प्राईड क्लासरूम या प्रकल्पाच्या माध्यमातून या सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करणेत आले. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यामातून विद्यार्थीनीना रोजगार प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कौशल्यांचा वृद्धीसाठी प्रशिक्षित केले गेले. नांदी फौन्डेशन चे प्रशिक्षण समन्वयक श्री. पंकज दंडगे आणि प्रशिक्षक श्रीमती. हिमानी सावंत यांच्या सहाय्याने हा प्रशिक्षण वर्ग सुफळ संपन्न झाला. या प्रशिक्षणातून सहभागी विद्यार्थिनींचे कौशल्य विकसित होऊन त्यांना त्याचा उपयोग पुढील व्यावसायिक जीवनात होणार आहे.

या प्रशिक्षण वर्गासाठी संस्थेचे चेअरमन अशोकअण्णा चराटी यांच्यासह सर्व संचालक मंडळाची प्रेरणा मिळाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे व कार्यालय अधिक्षक श्री. योगेश पाटील तसेच विज्ञान, वाणिज्य व बी. सी. ए. विभागातील सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

मलिग्रे येथील मलिकार्जुन सेवा संस्था चेअरमनपदी अशोक शिंदे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मलिग्रे येथील मलिकार्जुन विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी माजी सरपंच अशोक शिंदे यांची तर व्हाईस चेअरमनपदी संतोष चौगुले यांनी निवड करण्यात आली. या निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुजयकुमार येजरे, सहाय्यक अधिकारी जोतिराम बंडगर होते. चेअरमनपदासाठी शिंदे यांचे नाव चंद्रकांत बुगडे यांनी सुचवले. त्यास बाबू सावंत यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी चौगुले यांचे नाव शिवाजी निऊंगरे यांनी सुचवले. त्यास शंकर जाधव यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

सचिव शिवराज देसाई यांनी आभार मानले. यावेळी आजरा साखर कारखान्याचे संचालक अशोक तर्डेकर, आनंदा बुगडे, गजानन देशपांडे, दत्ता परीट, संचालक विश्वास बुगडे, किशोर जाधव, सचिन सावंत, शिवानंद आसबे, दिलीप बुगडे, सुनील निऊंगरे, शंकर बुगडे, पुंडलिक गाडे उपस्थित होते.

निधन वार्ता
तुकाराम देसाई


पेरणोली तालुका आजरा येथील तुकाराम आनंदराव देसाई ( वय ७४ वर्षे ) यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांच्या मागे पाच विवाहित मुली, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

कोल्हापूर स्थित उद्योजक प्रकाश देसाई व ग्रामसेवक सुहास देसाई यांचे ते चुलते होत.

पावसाचा जोर वाढला


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून तालुक्यातील नद्या पुन्हा एकदा पात्राबाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोकुळाष्टमी व स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष केला जात असताना पावसाने शुक्रवारी दिवसभर जोरदार हजेरी लावली. पावसामुळे नद्या तुडुंब भरल्या असून आठवडा बाजारासाठी आलेल्या तालुकावासीयांची व व्यापारी वर्गाची मोठी धावपळ उडाली.

दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या.

 

संबंधित पोस्ट

आजरा अर्बन बँकेच्या गारगोटी शाखेचे नूतनीकरण व उद्घाटन..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जनता सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

mrityunjay mahanews

एक किलो १०० ग्रॅम गांजासह एक जण पोलिसांच्या ताब्यात

mrityunjay mahanews

अनुसया पोवार यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!