mrityunjaymahanews
अन्य

गुरुवार – सातच्या बातम्या

गुरुवार दि.५ नोव्हेंबर २०२६

अपघात प्रकरणी वाहन मालकावर गुन्हा नोंद

आजरा : प्रतिनिधी

काल बुधवारी झालेल्या अपघातात समर्थ पांडुरंग या १७ वर्षीय मुलाच्या झालेल्या मृत्यू प्रकरण पोलिसांनी चारचाकी चे मालक पृथ्वीराज मानसिंग पाटील ( वय २४ वर्षे रा. आजरा ) यांना जबाबदार दुंडाप्पा बसवाणी वाजंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

आजरा – आंबोली मार्गावर ‘ त्या’ अपघातात प्रथमेश अमित सुतार हा गंभीर जखमी झाला आहे. अल्पवयीन मुलाकडे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नसताना त्यांच्या ताब्यात चार चाकी गाडी दिल्याने सदर अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार अनिल सरंबळे करीत आहेत.

इमारतीवरून पडून बालिकेचा मृत्यू

आजरा : प्रतिनिधी

येथील गांधीनगरमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर खेळणारी यचना भूकन निशाद ही दीड वर्षीय बालिका तोल जावून इमारतीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली होती. तिला गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. येथे प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालय कोल्हापुर येथे हलवण्यात आले होते. काल तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे.

यचना हीचे मुळगाव मोंगाव (जि. कवरदा, छत्तीसगड, सध्या रा. गांधीनगर, आजरा) याबाबतची वर्दी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सामाजिक बांधिलकी जपत फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

आजरा : प्रतिनिधी

दुष्काळसदृश परिस्थितीत धनगरवाडी व परिसरातील गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी मुकुल माधव फाउंडेशन, पुणे आणि फिनोलेक्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने CSR निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य व दैनंदिन वस्तूंचा समावेश असलेल्या या किटचे वाटप फिनोलेक्स विभागाचे प्रमुख ए.सी.एम. श्री. वैभव कुलकर्णी, ए.सी.ए. श्री. आकाश खैरे (कोल्हापूर) आणि आजरा-गडहिंग्लज-चंदगड विभागातील फिनोलेक्सचे अधिकृत विक्रेते तथा उद्योजक श्री. सचिन शिंपी  यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहनही करण्यात आले.

पेरणोली येथे खुल्या लेझीम स्पर्धांचे आयोजन

पेरणोली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी नगर, पेरणोली येथे भव्य खुल्या लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे ९ वे वर्ष असून सन २०२६ ची ही स्पर्धा मंगळवार दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता छ. शिवाजी नगर, पेरणोली येथे होणार आहे.दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

प्रथम क्रमांक – रु. १५००१/-
द्वितीय क्रमांक – रु. १०००१/-
तृतीय क्रमांक – रु. ७००१/-
चतुर्थ क्रमांक – रु. ५००१/-
पाचवा क्रमांक – रु. ३००१/-
सहावा क्रमांक – रु. २००१/- व चषक
उत्तेजनार्थ – रु. १००१/-

वैयक्तिक बक्षिसे :

उत्कृष्ट घुमके / ढोल वादक – रु. १००१/-
उत्कृष्ट कैचाळ वादक – रु. १००१/-
उत्कृष्ट हलगी वादक – रु. १००१/-

स्पर्धेची प्रवेश फी रु. ५००/- असून नियम व अटी खालील प्रमाणे आहेत. प्रत्येक संघात कमीत कमी १२ व जास्तीत जास्त १६ खेळाडू (वाजवणारे सोडून), वादन विभागात हलगी १, घुमके/ढोल १, कैचाळ १ असे खेळाडू राहतील. सर्व संघांना १५ मिनिटांचा कालावधी राहील. दि. ०९/११/२०२६ पर्यंत नाव नोंदविणाऱ्या संघास प्राधान्य राहील.

अधिक माहितीसाठी तुषार भिऊंगडे – ९२८४९७६३२६, रुपेश चव्हाण – ९६०४६७८९८९, रणजित रेळेकर – ७०५७७५६८५६, अक्षय सुतार – ८८८८४०४३१९, ऋतुराज सावंत – ९१७२९३०२८९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कृष्णा पाटील यांचे निधन

आजरा : प्रतिनिधी

रवळनाथ कॉलनी, आजरा येथील रहिवासी श्री. कृष्णा / के.एच. पाटील (निवृत्त उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग) यांचे काल बुधवार, दिनांक ०४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता बेळगाव येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गुरुवार, दिनांक ०५/११/२०२६ रोजी सकाळी ६.४५ वाजेपर्यंत रवळनाथ कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी मुरुडे येथे करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी ,विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे.

जनता गृहतारणच्या कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ – चेअरमन मारुती मोरे

आजरा : प्रतिनिधी

संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या मेहनतीमुळेच संस्थेने ऑक्टोबर २०२६ अखेर १३५ कोटी रुपयांच्या ठेवींचे संकलन यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या वेतनात १२ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, त्यांचे जीवनमान उंचावेल आणि संस्थेच्या प्रगतीला आणखी गती मिळेल, असा विश्वास चेअरमन मारुती मोरे यांनी व्यक्त केला.

संस्थेमार्फत दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कर्मचाऱ्यांना नियमित वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र, यंदा संस्थेने कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीची आणि योगदानाची दखल घेऊन संचालक मंडळाने विशेष वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट झाले.

या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक बळ वाढण्यासोबतच त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होण्यास मदत होणार आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये काम करण्याची नवी ऊर्जा निर्माण करणे आणि संस्थेच्या विकासात त्यांचा सहभाग अधिक प्रभावी करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे चेअरमन मोरे यांनी सांगितले.

यावेळी आभार मानताना संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ.अशोक बाचुळकर म्हणाले की, संस्थेमार्फत कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते. तसेच ग्रॅच्युइटी, दिवाळी बोनस, कर्मचारी विमा, दैनिक भत्ता आणि घरभाडे भत्ता अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेमार्फत सातत्याने सकारात्मक निर्णय घेतले जात असून, यंदाची विशेष वेतनवाढ हा त्याचाच एक भाग आहे.

यावेळी संस्थेचे संचालक प्रा. रवींद्र आजगेकर, इंजि. श्री. प्रदीप मोरे, श्री. कृष्णा डेळेकर, श्री. युवराज शेटके, मॅनेजर मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, शाखाधिकारी सौरभ नांदवडेकर व कर्मचारी उपस्थित होते.

मानवनिर्मित अन्नस्थळे नष्ट करा, बिबट्या जंगलाकडे वळेल : सागर पोवार

उत्तूर : प्रतिनिधी

जंगलातील नैसर्गिक अधिवास आणि भक्ष्य कमी होत असल्याने बिबट्या मानवी वस्तीजवळील अन्नाच्या शोधात येत आहे. मेलेल्या कोंबड्या, गावठी कुत्री तसेच कचऱ्यावर जगणारी कुत्री ही बिबट्याची मानवनिर्मित अन्नस्थळे बनली आहेत. त्यामुळे अशा अन्नस्थळांची योग्य विल्हेवाट लावून ती नष्ट करण्याबाबत ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी. ही अन्नस्थळे कमी झाल्यास बिबट्या पुन्हा जंगलाकडे वळण्यास मदत होईल, असे आवाहन वनपाल सागर पोवार यांनी केले.उत्तूर परिसरात बिबट्याचा वावर आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच किरण अमणगी यांनी वनविभागाचे अधिकारी, उत्तूर ग्रामस्थ आणि परिसरातील गावांतील नागरिकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण अमणगी होते.यावेळी पोवार यांनी बिबट्यापासून बचावासाठी नागरिकांना विविध सूचना केल्या.

रात्रीच्या वेळी एकट्याने फिरणे टाळावे, सोबत काठी ठेवावी, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत, शेळ्या, मेंढ्या व कुत्र्यांची सुरक्षित व्यवस्था करावी तसेच बिबट्यापासून बचाव करण्यासाठी झाडावर चढू नये, असे त्यांनी सांगितले. उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देत बिबट्याच्या वावराबाबत मार्गदर्शनही केले.

बैठकीस पुंडलिक पाटील, धनाजी उत्तूरकर, तौसिफ लमतुरे, प्रशांत पोतदार, संदेश रायकर, अभिनंदन परुळेकर, आण्णासाहेब धामणकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. संभाजी कुराडे यांनी आभार मानले.दरम्यान, बैठकीनंतर वनपाल सागर पोवार यांनी सहकाऱ्यांसह बिबट्याच्या वावराच्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच ऊसतोड मजुरांना आवश्यक खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या.

आजचे पंचांग

दिनांक : ५ नोव्हेंबर २०२६
वार :गुरुवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : एकादशी तिथी (सकाळी १०.३५ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी नक्षत्र (६ नोव्हेंबर पहाटे ०३.५५ पर्यंत) त्यानंतर हस्त नक्षत्र
योग : वैधृति योग (६ नोव्हेंबर पहाटे ०५.०९ पर्यंत) त्यानंतर विष्कुम्भ योग
करण : बलवा करण (सकाळी १०.३५ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : सिंह राशी (सकाळी ०९.३५ पर्यंत) त्यानंतर कन्या राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी ०१.४७ ते दुपारी ०३.१२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : सकाळी ११.५९ ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.४२
सूर्यास्त : सायंकाळी ०६.०२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात मारामारी…

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!