mrityunjaymahanews
अन्य

मंगळवार – सातच्या बातम्या

बुधवार दि.४ नोव्हेंबर २०२६

स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पोलिसांकडून फसवून सोने लुटणाऱ्या टोळीचा छडा…

दोन मुलांसह आई गजाआड

आजरा : प्रतिनिधी

दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी लक्ष्मीबाई निऊंगरे ( वय ७० ) या उत्तूर येथील आठवडा बाजारातून परत जात असताना एका अनोळखी महिलेने त्यांना बोलावून घेतले. त्या ठिकाणी दोन मुले आली आणि त्या महिलेच्या हातातील पुतळ्या खऱ्या सोन्याच्या असून त्यांची किंमत १५ लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या अनोळखी महिलेने पुतळ्या खऱ्या असल्याचे सांगून त्या एका कापडात बांधून लक्ष्मीबाईंच्या हातात दिल्या आणि त्याबदल्यात त्यांच्या अंगावरील सोन्याची बोरमाळ, कर्णफुले आणि पट्ट्या असे दागिने फसवून काढून घेऊन पळून गेली. या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपास सुरू असताना पोलीस अंमलदार समीर कांबळे, राजू कोरे आणि रोहीत मर्दाने यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी कागल ते मुरगूड रोडवरील पाटबंधारे कार्यालयाजवळ येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी उजळाईवाडी ता करवीर येथे सापळा लावून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची नावे विजय यंकाप्पा गोंधळी ( वय २५) आणि राकेश यंकाप्पा गोंधळी ( वय ३३ दोघे रा तहसिलदार प्लॉट निपाणी जि बेळगाव कर्नाटक) अशी आहेत.

त्यांच्याकडून २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची  १२५ सीसी मोटरसायकल असा एकूण १ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत त्यांनी आई सगिता गोंधळी हिच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना मुद्देमालासह आजरा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

बनावट मृत्यू दाखला करून वारस नोंद, दोघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : प्रतिनिधी

बनावट मृत्यू दाखला तयार करून वारस नोंद घालून फसवणूक केल्याप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ संतू पोवार (वय ७९, व्यवसाय शेती, रा. मौजे चितळे, ता. आजरा ) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात एकनाथ विष्णू पोवार,  पंढरीनाथ रघुनाथ पोवार (दोघे रा. चितळे, ता. आजरा ) यांचा समावेश आहे.

ही घटना दि. ३१/०३/२०२२ ते दि. ३०/१०/२०२५ या कालावधीत गावकामगार तलाठी कार्यालय, चितळे येथे घडली आहे. या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरीनाथ पोवार याने आपले वडील कै. रघुनाथ विष्णू पोवार यांचा बनावट मृत्यू दाखला तयार केला. सदर दाखला  एकनाथ पोवार यांना दिला. मृत्यू दाखला बनावट आहे हे माहित असतानाही पंढरीनाथ याने दि. ३१/०३/२०२२ रोजी तहसिल कार्यालय, आजरा येथे प्रतिज्ञापत्र व त्यासोबत कै. रघुनाथ विष्णू पोवार यांचा बनावट मृत्यू दाखला जोडून तलाठी कार्यालय, चितळे येथे सादर केला.

त्यानंतर चितळे येथील जमीन गट क्र. २१, ९, भावेवाडी जमीन गट क्र. २६, ५५, जेऊर जमीन गट क्र. ५८ मध्ये आपले व इतर नातेवाईकांची नावे वारस म्हणून लावून फसवणूक केली, अशी फिर्याद देण्यात आली आहे.

आवंडी ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने सोडवले जातील : जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

आजरा : प्रतिनिधी

चित्री प्रकल्पामधे विस्थापित झालेल्या आवंडी ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने सोडवले जातील अशी ग्वाही जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी दिली.

कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी अजय पोवार, पुनर्वसन अधिकारी हेमंत निकम यांच्याशी आवंडी प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी श्री. राठोड यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेवून पुनर्वसनाबाबत माहीती घेतली. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगीतले. अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक सूचना दिल्या. आजरा भुदरगडचे प्रातांधिकारी हरेश सुळ, पुनर्वसनच्या तहसीलदार रुपाली रेडेकर आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत, आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे व पाटबंधारेचे अधिकारी उपस्थित होते.

आप्पासो पाटील म्हणाले, चित्री प्रकल्पग्रस्तांची आजऱ्या नजीक आवंडी येथे वसाहत आहे. या वसाहतीचे पुनर्वसनाबाबत अ‌द्याप अडचणी आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी १९९८ मधे पुनर्वसनाबाबत आदेश दिला होता. त्यानुसार पुनर्वसन झालेले नाही. त्याचबरोबर स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणीही पूर्ण झालेली नाही. नगरपंचायतीने गॅझेट केल्यामु‌ळे अडचणी वाढल्या आहेत. पुनर्वसनाबाबत ठोस प्रयत्न व्हावेत. सदर आवंडी वसाहतीचा भूमिअभिलेख विभागाकडून सीटी सर्व्हे करून घ्यावा. संबंधीतना प्रापर्टी कार्ड दयावे. संबंधीत नगरपंचायतीने आवंडी वसाहतीला पूर्ण नागरी सुविधा प्रवाव्यात. अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. आवंडी वसाहतीनजीक असलेला कचरा डेपोही तातडीने हलवावा असेही या वेळी सांगण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, सुनिल पाटील, चंद्रकांत निकम, अमोल गावडे, विष्णू दारुटे, रामचंद्र मांगले, महादेव राणे, अनिल कोले यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

 सांडपाणी हिरण्यकेशी नदीत सोडू नये

सरपंच परिषदेची मागणी, आजरा नगरपंचायतीला निवेदन, उपोषणाचा इशारा

आजरा : प्रतिनिधी

आजरा शहरातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना गटारी व नाल्यांमधून थेट नदीपात्रात मिसळत आहे. शहरातील लैंड ओहळ, वडाचा गोंड येथील सांडपाणी चित्रीत मिसळत आहे. त्यामु‌ळे हिरण्यकेशी व चित्री नदीचे पाणी दूषित झाल्या असून नदीकाठच्या तसेच खालच्या भागातील गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जॅकवेलमधून दूषित पाणी नागरिक पिण्यासाठी वापरत आहेत. या मुळे साथीचे आजार पसरण्याची भीती असून, नागरिक व लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नदीकाठच्या व खालच्या भागातील बुरुडे, मुरुडे, मेंडोली, बोलकेवाडी, हात्तिवडे, चांदेवाडी, सुलगाव, खेडे, हाजगोळी खुर्द, हाजगोळी बु ll, भादवण, भादवणवाडी, मासेवाडी, खोराटवाडी, सरोळी, गजरगाव आदी गावांतील नागरिकांना या प्रदूषणाचा फटका बसत आहे. दोन वर्षापासून नगरपंचायत प्रशासनाला निवेदन तोंडी व लेखी सूचना देण्यात आल्या. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही सांडपाणी व्यवस्थापनाबाबत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. शहरातील सिमेंटच्या गटारींमु‌ळे सांडपाणी जमिनीत मण्याची नैसर्गिक प्रक्रिया बाधित झाली आहे. प्रत्येक कुटुंबाच्या सांडपाण्याची शोषखड्ड्यांद्वारे विल्हेवाट लावणे किंवा गटारीतील पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा शेतीसाठी पुनर्वापर करणे आवश्यक होते पण हे झालेले नाही. यासाठी सांडपाणी प्रकल्प (एसटीपी) उभारण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ७ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून आजरा नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा सरपंच परिषद व त्रस्त ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आणि आजरा पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदनावर राजू पोतनीस, जी. एम. पाटील, श्री. पांडूरंग तोरगल्ले सरपंच मासेवाडी सौ. वनश्री देसाई सरपंच पेरणोली, श्री. विलास जोशिलकर सरपंच मेढोली- बोलकेवाडी, सौ. शकुंतला सुतार सरपंच मुरुडे, सौ. वैशाली गुरव सरपंच बुरुडे.श्री. धनाजी दळवी आदींच्या सह्या आहेत.

आजऱ्यातील तरुणांच्या योगदानातून तयार झालेल्या ‘बंधू’तून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडणार !

विशेष प्रतिनिधी …

 अभिनेता उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी ही दमदार जोडी पहिल्यांदाच बंधू या चित्रपटातून एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकारांची फळी या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे केवळ दमदार अभिनय आणि कथानकच नव्हे, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीतही ‘बंधू’ चित्रपटाने वेगळी उंची गाठली आहे. या चित्रपटाचे VFX आणि एडिटिंगचे काम आजऱ्यातच चित्रपटाचे VFX दिग्दर्शक व सुलगावचे सुपुत्र उन्मेष देसाई यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर आजऱ्याचे नाव चित्रपटसृष्टीत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. आजरा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभाग घेत आपली कलात्मक क्षमता सिद्ध केली आहे. उन्मेष देसाई, विकी रॉड्रिग्ज आणि किशोर देसाई यांनी आजऱ्यात सुरू केलेल्या या स्टुडिओचे आणि त्यांच्या जिद्दीचे कौतुक होत आहे .आजऱ्यातील तरुणांच्या हातून एका मोठ्या चित्रपटाचे तांत्रिक काम पूर्ण होणे ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्सुकतेने प्रतिसाद मिळत आहे. या संपूर्ण प्रवासात प्रा. रमेश चव्हाण यांचे योगदान व प्रोत्साहन तितकेच मोलाचे आहे. श्री. चव्हाण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. तब्बल १५ वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांच्या या प्रयत्नांना यश येत असल्याचा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

 विहिरींवर सौर ऊर्जेवरील मोटर ; बाळासाहेब ठाकरे लोककल्याण योजनेतून प्रत्येकी १.७५ लाखांचा निधी मंजूर

आजरा : प्रतिनिधी

आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ मधील महिलांची पाण्यासाठीची गैरसोय दूर करण्यासाठी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते अभिषेक जयवंतराव शिंपी यांच्या संकल्पनेतून गोठण गल्ली येथील विहीर आणि भगवा रक्षक तिठ्ठा येथील विहीर या दोन्ही विहिरींवर प्रायोगिक तत्त्वावर सौर ऊर्जेवर चालणारी मोटर बसवली जाणार आहे. या कामासाठी ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण नागरी योजने’अंतर्गत प्रत्येक विहिरीकरिता १ लाख ७५ हजार रुपयांचा (₹१,७५,०००) निधी मंजूर झाला असून, हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी दिली.

या निर्णयामुळे महिलांना ७० ते ८० फूट खोल विहिरीतून रहाटाने पाणी शेंदण्याच्या शारीरिक कष्टापासून मोठी मुक्ती मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये पाण्याचा अपव्यय होऊ नये तसेच सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे नगरपंचायतीवर विजेच्या बिलाचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, याची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.

विहीर परिसरात सांडपाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा योग्य निचरा करण्याची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. तसेच विहिरीजवळील परिसराचे सुशोभीकरण करून तेथील वातावरण स्वच्छ, सुंदर व चैतन्यपूर्ण ठेवण्यावर भर दिला जाईल.
याचबरोबर, या दोन्ही विहिरींच्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची आणि वाटसरूंची तहान भागवण्यासाठी छोट्या स्टेनलेस स्टीलच्या पिंपात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून ठेवली जाणार आहे. अभिषेक शिंपी यांच्या या दूरदृष्टीच्या आणि लोकोपयोगी निर्णयाचे प्रभागातील नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.

विकास कामांमध्ये उचंगी ग्रामस्थांच्या पाठीशी : आमदार शिवाजी पाटील 

आजरा : प्रतिनिधी 

विकास कामांमध्ये उचंगी ग्रामस्थांच्या पाठीशी नेहमीच राहीन असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले ते उचंगी ता.आजरा येथे लोकनियुक्त सरपंच समीर पांडुरंग देसाई यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सरपंच समीर देसाई यांनी सर्व ग्रुप ग्रामपंचायत ग्रामस्थांचे स्वागत केले व गेल्या चार वर्षांमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेतला.

आतापर्यंत झालेल्या सर्व कामांमध्ये ग्रामपंचायत सदस्य व संपूर्ण ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याचे सरपंच देसाई यांनी सांगितले. त्यावेळी आमदार पाटील व अशोकअण्णा चराटी यांच्यासह प्रमुख मंडळींनी  विकास कामासाठी सरपंचांच्या पाठीशी उभा असल्याचे जाहीर केले.

या कार्यक्रमासाठी भारतीताई जाधव, जयवंत सुतार, समीर पारदे, संभाजीराव सरदेसाई, संतोष चौगुले, उदय सरदेसाई, संदीप देसाई, विकास बागडी,अशोक गडदे, रणजीत सरदेसाई, भीमगोंडा पाटील, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व उचंगी, शृंगारवाडी, हुडे गावातील प्रमुख मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छाया वृत्त 

श्री रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने मंदिर उभारणीकामी काम करत असणाऱ्या कारागिरांना दिवाळीचा फराळ व जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. याप्रसंगी डॉ. दीपक सातोसकर, आनंदा कुंभार, दीपक कुरुणकर, सुभाष नेवगी, सुजित देसाई, मल्लिकार्जुन तेरणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आजचे पंचांग

दिनांक : ४ नोव्हेंबर २०२६
वार :बुधवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : दशमी तिथी (सकाळी ११.०३ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (५ नोव्हेंबर पहाटे ०३.२९ पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
योग : ब्रह्म योग (सकाळी ०८.०० पर्यंत) त्यानंतर इन्द्र योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ११.०३ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : सिंह राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी १२.२२ ते दुपारी ०१.४७ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.४१
सूर्यास्त : सायंकाळी ०६.०३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अशोकअण्णा यांना विधानपरिषद अथवा महामंडळावर संधी द्यावी…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!