
सोमवार दि.२ नोव्हेंबर २०२६
कोल्हापूरच्या आतिथ्य क्षेत्रात ‘हॉटेल स्कारलेट इन’चा दिमाखदार प्रवेश

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूरच्या आदरातिथ्य क्षेत्रात आधुनिकतेची ओळख ठरणाऱ्या ‘हॉटेल स्कारलेट इन’ चा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री. प्रकाशराव आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॉटेलमध्ये आधुनिक वास्तुरचना, आकर्षक बाह्यरचना, सुबक अंतर्गत सजावट असून ११ प्रीमियम सुईट्स , दर्जेदार रेस्टॉरंट आणि बँक्वेट हॉलची सुविधा आहे. शहरातील पार्किंगचा प्रश्न लक्षात घेऊन दोन मजली पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे.
या प्रकल्पामागे उद्योजक श्री. सुरेश होडगे यांची दूरदृष्टी असून, या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देण्यात आर्किटेक्ट केदार कुलकर्णी यांचे वास्तुरचनात्मक नियोजन मोलाचे ठरले असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
‘स्कारलेट’ मधील आकर्षकता आणि ‘इन’ मधील आपुलकी यांचा मिलाफ या हॉटेलमध्ये अनुभवायला मिळतो. हा प्रकल्प केवळ गुंतवणूक नसून कोल्हापूरच्या आदरातिथ्य क्षेत्रात नवा दर्जा निर्माण करणारे पाऊल असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.
उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक व जि.प. सदस्य सुधीर देसाई, रणजीत सरदेसाई, इंद्रजीत देसाई, सोमनाथ होडगे, मधुकर येलगार, आप्पा पावले, ॲड. करवीरकर, नेताजी कातकर ,तुकाराम प्रभू , चंद्रकांत गुरव, निवृत्ती कसलकर, डॉ . श्रद्धानंद ठाकूर,रोहित पाटील (कोल्हापूर), शिंगटे साहेब यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बाबाजी नाईक यांचे निधन

आजरा : प्रतिनिधी
जनता बँकेचे संचालक श्री.बाबूराव उर्फ बाबाजी भाऊ नाईक यांचे वयाच्या ८० व्या वर्षी आजरा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने आज सोमवारी सकाळी निधन झाले.
गेले कांहीं दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात डॉ. गौतम व योगेश ही दोन विवाहित मुले, पत्नी गीता नाईक, एक विवाहित मुलगी, सूना, जावई,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे मूळ गाव एरंडोळ येथे त्यांच्यावर सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आयकर विभागाचा दणका ; केशरी शिधापत्रिका झाल्या शुभ्र

आजरा : प्रतिनिधी
जास्त उत्पन्न असतानाही कमी उत्पन्न दाखवून शासनाच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्यांना आयकर विभागाने चांगलाच दणका दिला आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांची आधार, पॅन कार्ड आणि बँक खाते लिंकच्या आधारे तपासणी करण्यात आली असून, वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या शेकडो लाभार्थ्यांच्या केशरी शिधापत्रिका थेट शुभ्र शिधापत्रिकेत वर्ग करण्यात आल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
आयकर विभागाने केशरी शिधापत्रिकाधारकांच्या उत्पन्नाची माहिती संकलित केली आहे. बँक व्यवहार, पॅन कार्डला लिंक असलेले उत्पन्न आणि आधारशी जोडलेल्या माहितीच्या आधारे अनेकांनी उत्पन्न लपवल्याचे उघड झाले आहे. जे शिधापत्रिकाधारक शासनाच्या सवलतीच्या धान्य योजनेत आहेत, परंतु त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त आहे, अशा सर्वांना आता केशरीतून वगळून शुभ्र (APL) गटात टाकले जात आहे.
महसूल विभागाकडून नोटिसा
याबाबत महसूल विभागाकडून संबंधित शिधापत्रिकाधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उत्पन्नाची खात्री झाल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड आपोआप शुभ्र करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचे धान्य मिळणे बंद होणार आहे.
यामुळे जास्त उत्पन्न असतानाही कमी उत्पन्न दाखवून मोफत किंवा अल्पदरात धान्याचा लाभ उठवणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यात शेकडो शिधापत्रिका अशा पद्धतीने केशरी वरून शुभ्र मध्ये वर्ग झाल्या असून ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंतच शासकीय योजनेचा लाभ पोहोचावा, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

हवा होता तेव्हा गायब झाला…
नको तेव्हा मात्र हजर झाला…
आजऱ्यात अवकाळीची हजेरी

एकीकडे भात कापणीचा हंगाम सुरू होऊन शेतशिवारात लगबग वाढली असतानाच दुसरीकडे परतीच्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक ठिकाणी भात कापणीची कामे सुरू असतानाच पावसाने अचानक हजेरी लावल्याने कापणीच्या कामांना ब्रेक लागला आहे. काही ठिकाणी कापणी केलेला भात शेतातच पडून असल्याने ते भिजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वर्षभर कष्ट करून पिकविलेल्या भाताचे नुकसान होण्याच्या शक्यतेने भात उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.
यंदाच्या हंगामात भात पिकासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली. भाताची रोपे लावण्यापासून ते पीक तयार होईपर्यंत खत, औषधे, मजुरी आणि मशागतीवर मोठा खर्च केला आहे. पीक काढणीला आले असताना शेतकऱ्यांनी कापणीची तयारी केली होती. काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कापणी सुरूही केली होती. मात्र, परतीच्या पावसाने अचानक वातावरणात बदल घडवून आणल्याने कापणीची कामे थांबवावी लागली आहेत. शेतात उभे असलेले भातपीक आणि कापून ठेवलेल्या भाताच्या पेंढ्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. सतत ओलावा राहिल्यास भाताच्या दाण्यांची गुणवत्ता घसरणे, दाण्यांना काळपटपणा येणे, कणसे कुजणे तसेच काढणी व मळणीची कामे लांबणीवर पडण्याचा धोका आहे. परिणामी उत्पादन आणि मिळणारा बाजारभाव या दोन्ही बाबींवर परिणाम होऊ शकतो.
भात कापणीसाठी मजुरांची उपलब्धता, बदलते हवामान आणि वाढती मजुरी यामुळे आधीच शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. त्यातच पावसामुळे कापणीची कामे खोळंबल्याने मजुरांचे नियोजनही कोलमडले आहे. पाऊस थांबल्यानंतर शेतात पुन्हा कामे सुरू करण्यासाठी जमिनीतील ओलावा कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे कापणीचा हंगाम आणखी लांबण्याची शक्यता आहे.यंदाच्या हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे गणित आधीच बिघडले आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाची ओढ आणि आता कापणीच्या तोंडावर पावसाची हजेरी, अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या केवळ २०.९ टक्के पाऊस नोंदवला गेल्याची माहिती समोर आली होती. पावसामुळे भातपिकाचे प्रत्यक्ष किती नुकसान झाले आहे, याची पाहणी कृषी विभागाने करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतात उभे असलेले पीक, कापणी केलेला भात आणि पावसामुळे खराब झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार मदत मिळावी, अशी मागणीही पुढील काळात जोर धरू शकते.
एकूणच, वर्षभर घाम गाळून उभे केलेले भातपीक घरात आणण्याच्या तयारीत असतानाच पावसाने पुन्हा विघ्न आणले आहे. शेतकऱ्यांसाठी हा केवळ कापणी रखडण्याचा प्रश्न नसून, त्यांच्या वर्षभराच्या कष्टाचा आणि आर्थिक उत्पन्नाचा प्रश्न बनला आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला आता पावसाने उघडीप द्यावी आणि सुखरूप भातपीक घरात आणता यावे, एवढीच अपेक्षा आहे.
घनसाळ भाताच्या गुणवत्तेचीही चिंता…
आजरा तालुका हा घनसाळ भातासाठी प्रसिद्ध आहे. या भाताला चव, सुगंध आणि दर्जामुळे विशेष मागणी असते. मात्र, काढणीच्या कालावधीत पावसामुळे भात भिजल्यास त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः दर्जेदार तांदूळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे पाऊस कधी थांबणार आणि कापणीची कामे पुन्हा कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
छायाचित्र : भात कापणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्याने शेतातील कापणीची कामे रखडली असून भात कापणी थांबवून झाडाखाली बसलेल्या महिला मजूर ( छाया: शिवतेज कळेकर, सोहाळे)

गोकूळच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार राजेश पाटील यांचा सत्कार

आजरा: प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजीत दादा पार्टीचे तालुका अध्यक्ष व आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष अनिल फडके यांच्या उपस्थितीत माजी सभापती अल्बर्ट डिसोझा व शासन नियुक्त संचालक दिगंबर देसाई यांच्या हस्ते माजी आमदार राजेश पाटील यांची गोकूळच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका संघाचे व्यवस्थापक जनार्दन बामणे, अल्फी डिसोझा उपस्थित होते.

पं.दीनदयाळचे जिल्हास्तरीय शोतोकान कराटे स्पर्धेत यश

आजरा : प्रतिनिधी
पं. दीनदयाळ विद्यालयाची विद्यार्थिनी कु.मीरा सुनील हरेर हिने जिल्हास्तरीय ‘शोतोकान कराटे ‘स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले. तिची रत्नागिरी येथे होणाऱ्या कराटे स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधीर मुंज ,सचिव मलिककुमार बुरुड ,विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांचे प्रोत्साहन लाभले.क्रीडा शिक्षिका कुंभार एस .आर ,निर्मळे एस .ए .तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मार्गदर्शन मिळाले.

श्री.रवळनाथ प्राथमिक शाळेत टॉइज लायब्ररीचे उद्घाटन

आजरा : प्रतिनिधी
आजरा येथील श्री. रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये ‘संपूर्ण शिक्षा अभियान अंतर्गत’ लहान मुलांनी खेळाच्या साहित्यांचा वापर करून मनोरंजनाबरोबरच शिक्षण मिळवावे यासाठी टॉईज लायब्ररी सुरु करण्यात आली आहे.
या टॉईज लायब्ररीचे उद्घाटन आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या NSS विभागाचे प्रमुख प्रा.अविनाश वर्धन सर यांच्या प्रयत्नातून व पी.सी.पी.एल फाउंडेशन च्या विशेष सहकार्यातून हि टॉइज लायब्ररी सुरु करण्यात आली.
या उद्घाटन प्रसंगी आजरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.पी.संकपाळ, पर्यवेक्षक प्रा.मनोज पाटील, अधिक्षक प्रा.योगेश पाटील, प्रा.रत्नदिप पवार ,श्री.रवळनाथ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी आजरा हायस्कूलचे पर्यवेक्षक गोरे सर, आजरा महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व श्री रळवनाथ शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक सौ.निलांबरी कामत यांनी केले. आभार विशाल गुरव सर यांनी मानले.

निधन वार्ता…
श्रीपती सिमणे

भादवणवाडी ता. आजरा येथील श्री.श्रीपती दत्तू सिमणे( वय ८६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने काल दि. १ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
त्यांच्या पाच्यात दोन विवाहित मुले, नातवंडे असा परिवार आहे
सोनाबाई सिमणे

भादवणवाडी तालुका आजरा येथील सोनाबाई तुकाराम सिमणे ( वय ७६ वर्षे )
यांचं काल दि.१ नोव्हेंबर रोजी हृदयविकारान निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी,सून, जावई , नातवंडे असा परिवार आहे.
आजचे पंचांग
दिनांक : २ नोव्हेंबर २०२६
वार :सोमवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अष्टमी तिथी (दुपारी ०१.१० पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : आश्लेषा नक्षत्र ( २ नोव्हेंबर पहाटे ०३.४६ पर्यंत) त्यानंतर मघा नक्षत्र
योग : शुभ योग (दुपारी १२.०६ पर्यंत) त्यानंतर शुक्ल योग
करण : कौलव करण (दुपारी ०१.१० पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : कर्क राशी ( २ नोव्हेंबर पहाटे ०३.४७ पर्यंत) त्यानंतर सिंह राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी ०८.०६ ते सकाळी ०९.३१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : सकाळी ११.५९ ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.४०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.०३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
