

आजऱ्यातील समस्यांची सोडवणूक करा…
शिवसेनेची मागणीनगरपंचायतीसमोर बोंब मारो आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शहरात दिवसेंदिवस नागरिकांना विविध दैनंदिन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विस्ककळित पाणी पुरवठा, भटकी कुत्री, रस्ते चिखलमय, डेंगीची साथ आणि कचऱ्याच्या समस्या यामुळे शहरवासीय वैतागले आहे. या समस्यांचे तातडीने सोडवणूक करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने धडक मोर्चा काढून केली. जनतेच्या प्रश्नाबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या दारात बोंब मारो आंदोलन केले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी सुरज सुर्वे उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख श्री. पाटील म्हणाले, कर्मचाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नाही. दिवसेंदिवस नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही. शहारत कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे. या कचऱ्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. हा कचरा कधी हटवणार, निधी उपलब्ध नसल्याचे कारण देऊन वेळ मारून नेली जात आहे. शासन व लोकप्रतिनिधीकडून निधी का उपलब्ध करून घेतला नाही. निधीसाठी आम्ही तुम्हाला मदत करू.
दयानंद भोपळे म्हणाले, भटकी कुत्री आणून सोडणाऱ्यांच्यावर कार्यवाही करावी. युवराज पोवार यांनी समस्यांचा पाढा वाचला. मुख्याधिकारी सुर्वे म्हणाले, शासनाकडून एक कोटींचा निधी मिळणार आहे. लवकरच तोडगा काढला जाईल. वरिष्ठ लिपीक संजय यादव यांनी कचरा उठाव करण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्याचे सांगितले.
यावेळी दिनेश कांबळे, महेश पाटील, अभिजीत मणगूतकर, हरिश्चंद्र फराकटे, चंद्रकांत पाटील, अमित गुरव, दिनकर मगदूम, बिलाल लतिफ, आरिफभाई खेडेकर, निसार लाडजी, जोतिबा सावंत, रवी यादव, भिकाजी विभूते, रवी सावंत, शिवाजी आडाव, सुयोग पाटील, संजयभाई सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

कचरा प्रश्नी अन्याय निवारण समितीकडून नगरपंचायतीचा निषेध…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून सर्वत्र दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे . या पार्श्वभूमीवर आजरा शहर अन्याय निवारण समितीने आक्रमक भूमिका घेत आज नगरपंचायतीवर धडक मारली.
सुरुवातीला नगरपंचायत प्रशासनाने अन्याय निवारण समितीला दिलेल्या वागणुकीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला.सभागृह बैठकी करता खुले न केल्याने सभागृहाच्या दारातच समितीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला.
यावेळी बोलताना अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे म्हणाले शहरामध्ये स्वच्छतेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे त्यामुळे शहरभर सर्वत्र कचऱ्याचे ढीग व दुर्गंधी पसरली आहे याचबरोबर भटकी कुत्री अनियमित पाणीपुरवठा हे प्रश्न कायम आहेत. नगरपंचायतीकडून हे प्रश्न सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत. यामुळे शहरवासीयांचे प्रचंड हाल होत आहेत .आठवडा बाजारामध्ये येणाऱ्या माझी विक्रेत्यांसह इतर व्यापाऱ्यांकडून कचरा उठाव करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना होणे आवश्यक आहे. किमान आठवडा बाजाराचा कचरा तरी तातडीने उचलण्याची गरज आहे असेही स्पष्ट केले.
मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी याबाबत योग्य त्या हालचाली करण्याचे आश्वासन दिले. नगरपंचायतीच्या मालकीची वाहने कचरा उचलण्याकरीता तूर्तास वापरली जातील नागरिकांनी स्वतः त्यामध्ये कचरा टाकून सहकार्य करावे असे आवाहन केले, तर पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भटकी कुत्री पकडण्याची मोहीम लांबली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये गौरव देशपांडे, अमानुल्ला आगलावे, वाय. बी. चव्हाण, राकेश चौगुले, पांडुरंग सावरतकर, राजू विभुते यांनी भाग घेतला.

ते गायब झाले… दोन दिवसांनी पुन्हा परतले… परतल्यानंतर देवाघरीही गेले...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भर पावसात शुक्रवारी अचानक पणे घरातून निघून गेलेले रामा चंद्रू निवळे हे दाभिल येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक कुटुंबीयांनी शोध घेतला असता परिसरातील जंगल भागांमध्ये आढळून आले. रविवारी त्यांना घरी आणल्यानंतर अल्पावधीत त्यांचे निधनही झाले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…
दाभिल येथील रामा निवळे हे पावसाचं जोर वाढला असताना शुक्रवारी अचानकपणे बेपत्ता झाले. भर पावसामध्ये कुटुंबीयांनी दोन दिवस शोधमोहीम राबवली. दोन दिवसानंतर जवळच्या जंगल परिसरात ते एका तारेच्या कुंपणाशेजारी आजारी अवस्थेत आढळून आले. त्यांना घरी आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले दरम्यान घरी आणल्यानंतर त्यांचे लगेच निधन झाले.
भर पावसात दोन दिवस जंगलात राहिल्याने त्यांची प्रकृती बिघडून त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

हत्तरगी येथेे आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हत्तरगी येथील श्री हरी काका गोसावी भागवत मठात गोकुळ अष्टमी निमित्त
दिनांक २६ ऑगस्ट रोजी आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा सकाळी ११ वाजता
आयोजित करण्यात आल्या आहेत. या आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत भजनी मंडळ संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन पीठाधीश डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे ११,००,१ /- रुपये रोख बक्षीस व मानचिन्ह ठेवण्यात आले आहे. आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत सहभागी संघांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत सहभागी संघांना सादरीकरणास १८ मिनिटे वेळ असेल. या वेळेत किमान दोन अभंग व एक गवळण सादर करावी लागेल. या रचना संत रचितच म्हणजे गाथ्यामधील असाव्यात. सादरीकरण अभंग रचना मराठी व कानडी भाषेत असावेत. इच्छुक संघांनी दिनांक २० ऑगस्ट पर्यंत आपली नावे श्री हरी मंदिर हत्तरगी, जिल्हा बेळगाव येथे नोंदवावीत. द्वितीय क्रमांकास रुपये ७००१ /- रोख व मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रुपये ५००१/- रोख व मानचिन्ह, उत्तेजनार्थ रुपये ३००१/- रोख व मानचिन्ह तसेच उत्कृष्ट वादक व गायक यांना प्रत्येकी १००१/- रोख व मानचिन्ह देण्यात येणार आहे .

आजरा महाविद्यालयात काॅ.संपत देसाई यांची प्रकट मुलाखत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक आणि डाव्या पुरोगामी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते काॅ. संपत देसाई यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि.८ ऑगस्ट रोजी आजरा महाविद्यालयाच्या सभागृहात मराठी विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सदरची मुलाखत संपन्न होणार आहे. प्रा.एकनाथ पाटील काॅ.देसाई यांचेशी संवाद साधणार आहेत. पुस्तक रुपाने प्रकाशित झालेल्या एका लोकलढ्याचा पट या निमित्ताने उलगडला जाणार आहे.
शिवाजी विद्यापीठ आणि जनता एज्युकेशन सोसायटीचे आजरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या नव्या अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने याच कार्यशाळेच्या एका सत्रात सदरची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डाॅ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.अशोकअण्णा चराटी उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डाॅ. नंदकुमार मोरे यांचे बीजभाषण होणार आहे. शिविमचे अध्यक्ष डाॅ .भरत जाधव यावेळी प्रमुख उपस्थित असतील. डाॅ. अरुण शिंदे, डाॅ. श्यामसुंदर मिरजकर कार्यशाळेच्या वेगवेगळ्या सत्रात विविध विषयांवर मांडणी करणार आहेत. शिविमचे उपाध्यक्ष डाॅ. जयवंत दळवी समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे आहेत. प्राचार्य डाॅ अशोक साबळे समारोप सत्राचे अध्यक्ष असतील. डाॅ. मांतेश हिरेमठ यावेळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. मराठी विभाग प्रमुख डाॅ. आनंद बल्लाळ, डाॅ. आप्पासो बुडके, प्रा. बाळासाहेब कांबळे आणि योगेश पाटील कार्यशाळेचे संयोजन करीत आहेत.

पाऊस पाणी…

आजरा शहर व परिसरामध्ये गेल्या २४ तासात ८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून श्रावणाच्या आगमनाबरोबर सूर्यदर्शन होण्याबरोबरच पावसाचा जोरही ओसरला आहे. नद्यांचे पाणी कमी झाल्याने सर्व बंधारे वाहतुकीकरता खुले झाले आहेत.



