mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

बुधवार  दि. १६ जुलै २०२५         

निंगुडगे येथून सव्वादहा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

महिलेसह चौघे संशयीत ताब्यात

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुक्यातील निंगुडगे येथील संभाजी श्रीपती भोसले यांच्या राहत्या घरातून तब्बल साडेदहा लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञातांनी लंपास केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी  चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी…

     निंगुडगे येथील संभाजी श्रीपती भोसले हे मोरजीम, गोवा येथे रहातात. भाऊ आजारी असल्याने आईला निंगुडगे येथील घरी ठेवून उपचारासाठी भावाला घेऊन ते मुंबई येथे महिनाभरापूर्वी गेले होते. दरम्यान जाताना त्यांनी आपले सोन्याचे ब्रेसलेट लक्ष्मी हार, चेन यासह इतर दागिने दागिने बेडरूम मधील तिजोरीतील लॉकरमध्ये ठेवून गेले होते. महिनाभरानंतर ते १३ जुलै रोजी पुन्हा गावी परतल्यानंतर लॉकर मधील दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतची फिर्याद त्यांनी आजरा पोलिसांत दिली आहे.

      याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह  चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.

      ताब्यात घेतलेल्या मंडळींकडून सदर गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता असल्याची समजते. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

  वाघाच्या हल्ल्यात दोन गाई, रेडा ठार, हरपवडे धनगर वाड्यावरील घटना

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      हरपवडे धनगर वाडा (ता. आजरा) येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन गायी व रेडा ठार झाला आहे. वाघाच्या वावराने धनगर वाड्यावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेले आठ दिवस वाघ या परिसरात वावरत आहे.

ग्रामस्थ व वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी…

      चार दिवसांपूर्वी वाघाने दादू येडगे यांची जनावरे मालकी क्षेत्रात चरत असताना त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये एक गाय व एक रेडा ठार झाला. रविवारी (ता.१३) वाघाने नागेश झोरे यांची जनावरे चरत असताना केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाले आहे. धनगर वाड्याच्या परिसरात वाघाचा वावर वाढल्याने पशुपालकांच्या भीतीचे वातावरण आहे. त्यांना जनावरे चरण्यासाठी सोडताना अडचण झाली आहे. वनविभागाने या घटनेची नोंद घेतली असून परिसरात वाघ भरताना ग्रामस्थांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पट्टेरी वाघच…

धनगर वाड्यावरील जनावरांवर झालेल्या हल्ल्यांचे स्वरूप पाहता हे हल्ले पट्टेरी वाघाकडूनच झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. 

अल्बर्टसाब को घुस्सा क्यूँ आया….?
नेत्यांसमोर व्यक्त केली खदखद

                   ज्योतिप्रसाद सावंत

     साहेब बारा आणि पंधरा हजारांसाठी आम्हाला गोकुळच्या पदाधिकाऱ्यांकडे खेटे मारावे लागत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल..‌. अशा शब्दात मंत्री मुश्रीफ व गोकूळचे नूतन अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांच्यासमोर गोकुळच्या सुरू असणाऱ्या कारभाराबाबत माजी सभापती व सन्मित्र संस्था समूहाचे अल्बर्ट डिसोझा यांनी स्पष्ट मत मांडल्याने काही वेळ नेमके कशा संदर्भात ते बोलत आहेत याचा संदर्भ न कळल्याने काही दूध संस्थांचे पदाधिकारी अवाक झाले तर ते कशाबाबत बोलत आहेत याचा अंदाज असणाऱ्या मंडळींनी मात्र समाधान व्यक्त केले.

     रविवारी आजऱ्यात गोकुळचे माजी संचालक रवींद्र आपटे प्रेमी कार्यकर्त्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गोकुळचे नूतन अध्यक्ष यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी मनोगत व्यक्त करताना दूध संस्था चालकांचे प्रतिनिधी म्हणून डिसोझा यांनी मनातील खदखद खुलेआम बोलून दाखवली.

     दूध संस्थांवर हेतू पुरस्सर सापत्नभावाने दंडात्मक कारवाई करणे याबाबत त्यांचा मुद्दा होता. स्थानिक ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याने ईदच्या पार्श्वभूमीवर संघाकडे दूध न पाठवल्याने संघाकडून बारा ते पंधरा हजार रुपयांचा दंड करून कारवाईचा बडगा उगारला गेल्याबद्दल वाटंगी येथील दुध संस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत अध्यक्षांसह गोकुळच्या प्रमुख कारभा-यांना लेखी पत्र देऊन कपात केलेली दंडाची रक्कम परत मिळावी अशी मागणी करूनही फारसा फरक पडत नसल्याने ही खदखद अखेर मेळाव्यात बाहेर पडली.

     प्रातिनिधीक स्वरूपातील डिसोझा यांनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल अखेर मंत्री मुश्रीफ यांनाही घ्यावी लागली. दखल घेण्याशिवाय पर्यायही नव्हता. कारण निवडणूक तोंडासमोर असताना अशी खदखद संस्थांच्या ठराव धारकांकडून जाहीररित्या व्यक्त होत असेल तर ते निश्चितच अडचणीचे ठरू शकते याची जाण मुश्रीफ साहेबांनाही आहे.

     आम्हालाही अल्बर्ट साब को गुस्सा क्यूँ आया ? याचे कारण थोडे वेळानेच समजले. पण समजले हे मात्र नक्की.

साहेब आम्ही शेतीला कंटाळलो…
हत्ती व रानडुकरांकडून पश्चिम भागात लाखोंचे नुकसान
माजी खा. शेट्टी यांना निवेदन

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       गेले महिनाभर घाटकरवाडी, धनगरमोळ्यासह पश्चिम भागामध्ये हत्ती व रानडुकरांकडून नुकसानीचे सत्र सुरू असून सध्या जोरदार पावसामुळे शेत जमिनीमध्ये असणारे पाणी व त्यातच हत्ती व रान डुकरांचा वावर यामुळे शेतीतील उभी पिके आडवी होऊन लाखोंचे नुकसान होऊ लागले आहे. साहेब आता तुम्हीतरी हा प्रश्न हातात घेऊन आम्हाला न्याय द्या अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे केली आहे.

      हत्ती, रानडुकरे यांनी ऊस पीक उध्वस्त केले आहे. योग्य नुकसान भरपाई मिळत नाही. गावातील २५ एकर शेतात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असून शेतीतून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे.

      गोविंद पाटील, मटकर, यादव,पाटील, शेळके, या कुटुंबातील सर्वांचा ऊस हत्तीने खाऊन तुडवून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान केले आहे. महिनाभर रोज शेतात रात्री पिकामध्ये प्रवेश करून हत्तीकडून नुकसान सुरू आहे. झाल्या नुकसानीची तुलना करता मिळणारी मदत किरकोळ स्वरूपाची आहे. हत्ती, रान डुकरांचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे अशा आशयाचे निवेदन खासदार शेट्टी यांना देण्यात आले.

      यावेळी राजेंद्र गडयानवार, गोपाळ पाटील, गोविंद पाटील, हरी पाटील गंगाराम डेळेकर, सुधाकर पाटील, संग्राम पाटील बाळासाहेब पाटील, रघुनाथ पाटील, गुंडू पाटील उपस्थित होते.

मलिग्रे कागिनवाडी पुलावरील रस्ता पूर्ण करण्याची मागणी

          आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मलिग्रे-कागिनवाडी रस्त्यावरील गु-हाळकी ओढ्यावर पुल बांधकाम मार्च पासून सुरु केले आहे. पावसाने मे महीन्यापासून सुरुवात केली असल्याने वाहन धारक,  लोकांचे येणे जाणे अवघड झाले. या पावसातून पुलाचे व विद्युत खांबाचे कामे पुर्ण झाली आहेत, परंतू रस्त्यावर मजबूत खडीकरण झालेले नाही, त्यामुळे कागिनवाडीला जाणारी एसटी बस बंद करण्यात आली असल्याने, शालेय विध्यार्थी सह ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. विशेषतः मलिग्रे येथील शेतकरी व वयोवृध्द नागरिकांना एसटी बंद असल्यामुळे सकाळ संध्याकाळी इतर वाहन धारकांवर अवलबूंन रहावे लागत आहे, तरी रस्त्यावर रोलिंग करून मजबूत खडीकरण करून एसटी सुरू करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

आजरा साखर कारखान्यास एन सी डी सी अधिकाऱ्यांची यांची भेट

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        स्व.वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास मार्च २०२५ मध्ये एन सी डी सी मार्फत १२२ कोटी ६८ लाख इतके दिर्घ मुदतीचे कर्ज मंजूर होवून मिळाले आहे. सदर कर्जाचा विनियोग तसेच उपयोगिता प्रमाणपत्र तपासणी कामी आज एन सी डी सी मुख्य कार्यालयाचे डेप्युटी डायरेक्टर  आशुतोष शुक्ला व असिस्टंट डायरेक्टर  मोहम्मद फइजल यांनी कारखाना कार्यस्थळावर प्रत्यक्ष भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी कारखान्याने कर्जाचा विनियोग व नियमांचे काटेकोर पालन करून कर्जावरील व्याजाची नियमित सुरू असलेली परतफेड यांची माहिती घेऊन विशेष समाधान व्यक्त केले. तसेच कारखान्यास अजूनही कोणती कर्जे मिळू शकतात, त्याचे निकष काय आहेत याबाबत माहिती दिली.

     यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, जेष्ठ संचालक  उदयसिंह पोवार,  अनिल फडके,  रणजीत देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत,  प्रकाश चव्हाण,  रमेश वांगणेकर, कार्यालय अधिक्षक अनिल देसाई व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

देवर्डे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली भाताची रोप लावणी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     येथील श्री रवळनाथ हायस्कूल देवर्डेच्या विद्यार्थ्यांनी संस्कार शिबिरांतर्गत यशवंत पाटील माजी पोलीस पाटील यांच्या शेतामध्ये रोप लावणीचा अनुभव घेतला यावेळी शेतकरी सोमा मळेकर यांनी विद्यार्थ्यांना भाताचे तरवे टाकण्यापासून रोप लावणी पर्यंत मशागत कशी करावी रोप लावणी कशी करावी याविषयी माहिती दिली.

     यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष सावंत, शिक्षक राजेंद्र पाटील, राजीव गुरव यांसह विद्यार्थी उपस्थित होते.

कन्या विद्या मंदिर व केंद्रीय शाळा उत्तूर शाळेचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश

           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सन २०२४-२५ या शिष्यवृत्ती परीक्षेत
कन्या वि. मं. उत्तूर व केंद्रशाळा उत्तूरचे ३ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले. यामध्ये यशराज दिनेश पावरा, प्रणव संदीप बादरे, श्रीरंग गजानन हिंगे यांचा समावेश आहे.

      या विद्यार्थ्यांना अलका अनिल बामणे, मुख्याध्यापक संतोष मारुती गुरव , अनिल नारायण बामणे , केंद्रप्रमुख संतोष बिल्ले, रावसाहेब देसाई ,गटशिक्षणाधिकारी श्री. बसवराज गुरव यांचे मार्गदर्शन लाभले .

निधन वार्ता
शामराव इंचाळकर

       बहिरेवाडी तालुका आजरा येथील शामराव बाबु इंचनाळकर ( वय ६५ वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली, जावई असा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

आजरा शहराला वादळी पावसाने झोडपले

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

GROUND REPORT

mrityunjay mahanews

पोळगाव येथील महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी महागाव येथील तरुणाविरोधात गुन्हा नोंद ….

mrityunjay mahanews
error: Content is protected !!