मंगळवार दि. १५ जुलै २०२५


जि.प. मतदारसंघातून कोळींद्रे ,आजरा गायब
मतदार संघ पुनर्रचनेत फटका
तालुका वासियांतून संताप

ज्योतिप्रसाद सावंत
जिल्हा परिषद मतदार संघ पुनर्रचनेत अखेर आजरा तालुक्यातून जिल्हा परिषदेचा आजऱ्यासह कोळींद्रे मतदार संघ गायब झाला आहे, तर दोन पंचायत समितीचे मतदारसंघही रद्द झाले आहेत. मतदारसंघांची संख्या पूर्वीप्रमाणे रहावी या तालुकावासियांच्या मागणीला अखेर वाटाण्याच्या अक्षता मिळालेल्या आहेत. या प्रकारामुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. प्रसंगी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याची तयारीही बोलून दाखवली जात आहे. याबाबत उच्च न्यायालयात दादही मागण्यात आली आहे. उद्या १६ जुलै रोजी याबाबतची सुनावणी आहे असे समजते.
नवीन रचनेनुसार उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये उत्तूर व भादवण असे दोन पंचायत समिती मतदारसंघ राहणार आहेत…
उत्तुर पंचायत समिती मतदार संघामध्ये पुढील गावांचा समावेश राहील
उत्तुर,पेंढारवाडी, मुम्मेवाडी, महागोंड, महागोंडवाडी, चव्हाणवाडी, धामणे, आरदाळ, वडकशिवाले बेलेवाडी, बहिरेवाडी, हालेवाडी, होण्याळी, झुलपेवाडी, करपेवाडी,
चिमणे
भादवण पंचायत समिती मतदार संघामधील गावे –
भादवण, मडिलगे, मासेवाडी, चांदेवाडी, जाधेवाडी, वझरे, चव्हाणवाडी, हाजगोळी, हाजगोळी खुर्द,सरोळी, सुलगाव, सोहाळे, निंगुडगे, खेडे, मुंगूसवाडी, खोराटवाडी, कानोली, कोवाडे, गजरगाव
पेरणोली जिल्हा परिषद अंतर्गत पेरणोली व वाटंगी असे दोन पंचायत समिती मतदारसंघ राहणार आहेत.
पेरणोली पंचायत समिती मतदार संघातील गावे पुढील प्रमाणे...
पेरणोली, पोळगाव, पारपोली, मसोली, शेळप, देऊळवाडी, देवर्डे, देवकांडगाव, विनायकवाडी, दाभिल, लाटगाव, सातेवाडी, किटवडे, अंबाडे, यरंडोळ, आवंडी, इटे, वेळवट्टी,पेठेवाडी, पारेवाडी, हरपवडे, हाळोली, मेढेवाडी, दर्डेवाडी, सुळेरान, साळगाव, कासार कांडगाव, खानापूर, कोरीवडे,गवसे, आल्याचीवाडी
वाटंगी पंचायत समिती मतदार संघातील गावे…
वाटंगी, मोरेवाडी, मलीग्रे, कागिनवाडी, मेंढोली, बोलकेवाडी, सावरवाडी, चाफवडे, लाकूडवाडी, शिरसंगी, यमेकोंड, चितळे, जेऊर, भावेवाडी, किणे, बुरुडे,मुरुमे, हात्तिवडे, होनेवाडी, सरंबळवाडी, सुळे, शृंगारवाडी, उचंगी, कोळींद्रे, पोश्रातवाडी, हांदेवाडी
जिल्हा परिषद मतदार संघाच्या या नवीन रचनेमुळे विधानसभा मतदारसंघात सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. विधानसभा मतदारसंघात एकीकडे तर जिल्हा परिषद मतदार संघात दुसरीकडे मतदान अशी विचित्र अवस्था होणार आहे. आजरा ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीमध्ये झालेल्या रूपांतराचा मोठा फटका जिल्हा परिषद मतदार संघ रचनेत बसला आहे. यामुळे अनेकांचे जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करण्याचे मनसुबे उधळले आहेत.
भौगोलिक दृष्ट्या मतदारसंघाची व्याप्ती वाढल्याने केवळ प्रचार यंत्रणा राबवतानाच नाही तर मिळणारा निधी व समाविष्ट गावे यांना निधी देताना ताळमेळ घालताना संभाव्य जिल्हा परिषद सदस्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.

साळगाव उपसरपंचपदी बबन भंडारी यांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बबन रामा भंडारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच धनंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेल्या विशेष बैठकीत सदर निवड करण्यात आली.
यावेळी उषा नावलकर अर्जुन कुंभार, विजय कांबळे, कमल केसरकर, स्वप्नाली केसरकर, पूजा पाटील, माजी सैनिक विश्वास व्हळतकर, मधुकर कुंभार, ग्रामसेवक सुनील पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

परोली जॅकवेल परिसरात नगरपंचायतीने खबरदारी घ्यावी…
स्थानिक रहिवाशांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या पाणी योजनेच्या अंतर्गत परोली या गावाकडे जाण्याच्या मार्गावरती चित्री नदीवर जॅकवेल उभे केले आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार या नदी काठावरती वरील सर्व गावकरी गणेश मूर्ती विसर्जनाकरिता तसेच दुर्गामाता मूर्ती विसर्जनाकरिता या ठिकाणचा वापर करत आलेले आहेत.
गेल्या वर्षी या ठिकाणी अपघाती पद्धतीने चार युवकांचा बुडून मृत्यू या ठिकाणी झाल्या कारणाने या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण परंपरागत पद्धतीने या जागेचा वापर गौरी गणपती विसर्जन व अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने तसेच दसऱ्या दिवशी दुर्गामाता मूर्ती विसर्जनाकरीता वापरले जाणार आहे.
या कालावधीत पुन्हा मागील दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता आपण प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. गौरी गणपती विसर्जना दिवशी आपण आपल्या प्रशासनाचा उपयोग करून त्यादिवशी तिथे सुरक्षा यंत्रणा वाढवून योग्य ती सोयीसुविधा पुरवावी अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन ही देण्यात आले आहे.
निवेदनावर आकाश शिंदे यांच्यासह धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ गांधीनगरचे कार्यकर्ते, गांधीनगर, आंवडी वसाहत, नेवरेकर कॉलनी, शिव कॉलनी व आयडियल कॉलनी रहिवाशी यांच्या सह्या आहेत.

आजरा तालुका भाजपा अध्यक्षपदी अनिकेत चराटी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टीच्या आजरा तालुका अध्यक्षपदी अण्णाभाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक अनिकेत अशोक चराटी यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी ही निवड करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

ग्रीन क्लब उत्तूरतर्फे वृक्षारोपण उपक्रम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रीन क्लब, उत्तूरतर्फे जोमकाई मंदिराच्या डोंगर परिसरात ४० देशी झाडांचे यशस्वी वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, कडूनिंब, करंज व उंबर अशा झाडांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी बीजारोपणाचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर यंदा मोठी देशी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी गावातील निसर्गप्रेमींनी सहकार्य केले.
या उपक्रमात मंदार हळवणकर, संतोष बोरनाक, चैतन्य जाधव, तुषार रावळ, प्रा. अतुल देशपांडे, दिपक भाईगडे, संदेश रायकर, प्रविण लोकरे, प्रदीप लोकरे, विजय पाटील सर, प्रवीण स्वामी यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.उपक्रमासाठी श्री शैलेंद्र आमणगी, श्री वसंत पटेल, श्री शशिकांत पाटील, श्री विकास देसाई, सौ. मंजुषा देसाई व उत्तूर विद्यालयाची १९९९-२००० दहावी बॅच यांचे सहकार्य लाभले.

आजरा महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला पार पडला.
यावेळी अशोकअण्णा चराटी यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास करून हसत खेळत येणाऱ्या परिस्थितीस सामोरे जावे. तसेच यश मिळवण्यासाठी लढण्यास सज्ज राहावे. भविष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करून महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे असे सांगितले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यांनी यशाला शॉर्टकट नसतो. यश मिळवायचे असल्यास कष्टाला पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मार्गदर्शन करताना पालक व विद्यार्थी यांच्या खासगी क्लासेसकडे वाढत्या कलाबाबत गांभीर्याने लक्ष वेधले. आजरा महाविद्यालयामध्ये अनुभवी, तज्ञ मार्गदर्शकांकरवी दर्जायुक्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असताना देखील पालकांनी खासगी क्लासेसला अॅडमिशन घेऊन आर्थिक भुर्दंड सहन करण्यापेक्षा महाविद्यालयात पाल्यांना प्रवेश घेऊ द्यावा असे आवाहन पालकांना केले.
सौ. रागिणी विभुते यांनी महाविद्यालयाच्या MHT-CET च्या यशाच्या चढत्या गौरवपूर्ण आलेखाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी संचालक कृष्णा येसणे, प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी सरदेसाई यांनी केले तर आभार श्री. अरुण सुरुंगले यांनी मानले.

वाढदिवस….


निधन वार्ता
सोनाबाई घोरपडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ता.आजरा येथील सोनाबाई शंकर घोरपडे ( वय वर्ष ८४ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याना तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे.
सुधाकर घोरपडे यांच्या त्या आई होत.

पाऊस पाणी
दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून रोप लावण्याची कामे वेगावली आहेत.





