गुरुवार दि. १७ जुलै २०२५


निंगुडगे चोरीप्रकरणी तिघांना अटक : पाच दिवसांची पोलिस कोठडी

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा : निंगुडगे (ता. आजरा) येथे संभाजी श्रीपती भोसले यांच्या घरातून १० लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी आजरा पोलिसांनी प्रतीक पांडुरंग सावंत (रा. निंगुडगे ता.आजरा ), प्रज्वल पृथ्वीराज देसाई (रा. इंचनाळ, सध्या रा. डॉक्टर कॉलनी, गडहिंग्लज), सुबोध अरुण गवळी (रा. हेब्बाळ, कसबा नूल, ता. गडहिंग्लज) या तीन तरुणांना अटक केली असून, दोन विधिसंघर्षग्रस्त/अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर आणखी एकाचा शोध सुरू आहे. या तरुणांनी केवळ चैनीसाठी चोरीतील सोन्याचे कांही दागिने तरुणांनी विक्री करून तर काही पतसंस्थेत ठेवून कर्ज काढल्याचे पोलिसांना सांगितले. अटक केलेल्या तरुणांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
भाऊ रमेश आजारी असल्याने फिर्यादी संभाजी श्रीपती भोसले मुंबईला गेले व दरम्यान त्यांच्या आई आई द्रौपदी या घरी होत्या. चोरट्यांनी १५ जून ते १३ जुलै या कालावधीत बेडरूममधील तिजोरीतील लॉकरमधून साडेदहा तोळ्यांचे ब्रेसलेट, साडेतीन तोळ्याची चेन व दीड तोळ्यांचा लक्ष्मीहार असे साडेपंधरा तोळ्यांचे १० लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद संभाजी भोसले (रा. निंगुडगे) यांनी सोमवारी आजरा पोलिसांत दिली.
पोलिस तपासात गडहिंग्लजमधील सोन्याच्या दुकानात ब्रेसलेट विकण्यास एक तरुण गेल्याचे समजले. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर, पोलिस उपनिरीक्षक युवराज धोंडे, संदीप म्हसवेकर, वैभव गवळी,विकास कांबळे, हर्षाली शेवाळे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेतले.
तपासात पोलिसांना निंगुडगे गावातीलच प्रतीक पांडुरंग सावंत याने चोरी करून आपल्या मित्रांच्या ओळखीने सोन्याचे दागिने विक्री केले व आलेल्या पैशांतून चैनी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली. सर्व आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
ब्रेसलेट विकणे पडले महागात…
चोरीतील ब्रेसलेट प्रज्वल देसाई याने आपल्या वडिलांच्या ओळखीच्या सराफी दुकानात विकायला गेला. दागिना वितळावयास सांगून आई करता दुसरे दागिने घ्यायचे आहेत असे दुकानदारासमोर सांगितले. दुकानदाराने वडिलांना घेऊन येण्यास सांगितले. मात्र तो परत फिरकलाच नाही. त्यामुळे किंमती दागिने त्याने परत का नेले नाहीत ? असा प्रश्न दुकानदाराला पडला. येथेच चोरीचे भांडे फुटले.

गायरानामधील अतिक्रमण भोवले
निंगुडगे सरपंच अपात्र

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
निंगुडगे येथील सरपंच कृष्णा बाबूराव कुंभार यांनी २.१० आर इतक्या गायरान जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदी राहण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे.
सरपंच कृष्णा कुंभार यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य अमृत गोपाळ देसाई यांनी ९ ऑक्टोबर २०२३ रोजी केली होती. कुंभार यांनी हे अतिक्रमण आपले नसल्याबाबत कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित जागेची मोजणी केली. मोजणीत सरपंच कुंभार यांनी अतिक्रमण केले असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सरपंच कुंभार हे ग्रामपंचायत अधिनियमानुसार सदस्य व सरपंचपदी राहण्यास अपात्र ठरले आहेत. असा निकाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला. तर या प्रकरणी आपण विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले.

हरपवडे धनगर वाड्यावरील जनावरांवर हल्ला पट्टेरी वाघाकडूनच…?
पायांचे ठसे सापडले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडे धनगर वाडा (ता. आजरा) येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन गाई व रेडा ठार झाला आहे. सदर घटनेनंतर वनविभागाने या परिसरात पाहणी केली असता परिसरामध्ये पट्टेरी वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत.
वाघाच्या वावराने धनगर वाड्यावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेले आठ दिवस वाघ या परिसरात वावरत आहे असे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.
चार दिवसांपूर्वी वाघाने दादू येडगे यांची जनावरे मालकी क्षेत्रात चरत असताना त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये एक गाय व एक रेडा ठार झाला. रविवारी (ता.१३) वाघाने नागेश झोरे यांची जनावरे चरत असताना केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाले आहे. धनगर वाड्याच्या परिसरात वाघाचा वावर वाढल्याने पशुपालकांच्या भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे पुन्हा आरक्षण
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सन २०२५ ते २०३० करता आरक्षण सोडतीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक २१ जुलै रोजी सकाळी १२.३० वाजता नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, आजरा येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली.
सदर बैठकीस तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आदींनी उपस्थित रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे.

पारेवाडी वनसंशोधन केंद्रात ४० स्थानिक प्रजातीची रोपे…
विक्रीला सुरुवात
शेतकऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साळगाव रस्त्यावरील पारेवाडी वनसंशोधन केंद्र आहे. या केंद्रामध्ये स्थानिक वृक्षांच्या चाळीसहून अधिक प्रजातीची रोपे विक्रीसाठी तयार केली आहेत. वनसप्ताह निमित्त याची विक्री सुरु आहे. शेतकऱ्यांसह वृक्षप्रेमी, सामाजिक संस्था, शाळा, शासकीय कार्यालय यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
सामाजिक वनिकरणाचे पारेवाडी येथे केंद्र आहे. या केंद्रात विविध वृक्षांच्या प्रजातीची रोपे तयार केली जातात. यंदा चाळीहून अधिक स्थानिक प्रजातीची रोपे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये सीता अशोक, नागकेशर, बेल, नरक्या (अमृता), खैर, बेहडा, बिब्बा, बीजा, दालचीनी, मिरी, आवळा, जारुळ (राज्य पुष्प), चिंच, कोकम, बांबू (मानवेल), मिरवा, त्रिफळा, पाडळ, जांभूळ, मोह, सप्तरंगी, भेडला माड, हिरडा यासह विविध स्थानिक प्रजातीची रोपे तयार करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री प्रशासकिय गतिमानता अभियानांतर्गत नागरिकांचे समस्या समाधान अभियान

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री प्रशासकिय गतिमानता अभियानांतर्गत नागरीकांचे समस्या समाधान अभियान राबविणेबाबत कार्यवाही करणेत येणार आहे.सदर अभियानांतर्गत सर्व नागरीकांनी आपल्या अडीअडचणी संदर्भात. दिनांक २१/०७/२०२५ ते ०८/०८/२०२५ या कालावधीत तालुकेतील सर्व शासकिय /निमशासकिय कार्यालयात व महसूल विषयक कामाबाबत प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय आजरा येथे नागरिकांचे समस्या समाधान कक्ष स्थापन करणेत येणार असून त्या ठिकाणी नागरीकांनी आपल्या अडीअडचणींसंदर्भात अर्ज करणेत यावेत. महसूल विषयक कामकाजाबाबत तहसिलदार कार्यालय आजरा व अन्य शासकिय /निमशासकिय कामकाजाबाबत ज्या त्या शासकिय / निमशासकिय कार्यालयातील नागरिकांचे समस्या समाधान कक्ष या कक्षाशी संपर्क साधावा. असे अवाहन तहसिलदार आजरा श्री. समीर माने यानी केले आहे.

अनुप चिगरे व श्लोक पाटील यांचे यश

सरस्वती हायस्कूल, हात्तिवडेचा विद्यार्थी अनुप गजानन चिगरे याने ग्रामीण विभागात कोल्हापूर जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये शिष्यवृत्तीधारक होऊन यश संपादन केले. विविध परीक्षांमध्ये यापूर्वी चिगरे याने घवघवीत यश संपादन केले आहे. त्याला मुख्याध्यापक उदय अमणगी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
विद्या मंदिर, पेद्रेवाडी शाळेचा विद्यार्थी श्लोक शशिकांत पाटील याने देखील या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. त्याला शिक्षक बाबासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

शिवसेनेच्या (उ.बा. ठा.)पाठपुराव्याला यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरात सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना एक वर्षांपूर्वी चालू करण्यात आला होता. पण या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नव्हते यामुळे रुग्णांना सेवा मिळत नव्हती शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला. यामुळे या दवाखान्यात काही दिवसापूर्वी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आज त्या डॉक्टर मुबशीरा मॅमेल (MBBS) यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या या दवाखान्यात गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी अशी सूचना करण्यात आली.
यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्य विस्तार अधिकारी काटकर साहेब, कौस्तुभ पाटील,स्वप्निल कोगेकर अधिपरिचारक, शाहीर मालदार एम पी डब्ल्यू याचबरोबर शिवसेनेचे देऊळवाडी ग्रामपंचायत उपसरपंच संजय सावंत, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख सुयश पाटील, महादेव गुरव विजय डोंगरे,सदानंद कदम हजर होते.

उद्या आजऱ्यात बांबू कार्यशाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील मध्यवर्ती इमारतीमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात उद्शुया क्रवार (ता. १८) बांबूच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता कार्यशाळेला सुरवात होईल. मुल्यवर्धन व शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी बांबू लागवड हा विषय आहे. यामध्ये तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. आजऱ्याचे तहसीलदार समीर माने, आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सामाजिक आणि आर्थिक बदल संस्था (आयएसईसी) बेंगलोर कार्यकारी संचालक डा. प्रमोदकुमार, एडीआरटीसीचे सहाय्यक प्रा. डॉ. विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होणार आहे.
भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) नवी दिल्ली यांच्याशी सलग्न कृषी विकास आणि ग्रामीण परिवर्तन केंद्र (एडीआरटीसी), सामाजिक आणि आर्थिक बदल संस्था (आयएसईसी) बेंगलोर आणि आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशन यांनी संयोजन केले आहे. शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निधन वार्ता
अभय पाटील
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर ता. आजरा येथील मेडिकल व्यावसायिक अभय श्रीपती पाटील ( वय ४८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. अमित श्रीपती पाटील यांचे ते बंधू होत.




