mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाठळक बातम्याभारतमहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि. १८ जुलै २०२५         

तालुकावासियांच्या मागणीला केराची टोपली

आजपासून टोल वसुली सुरू

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      संकेश्वर-बांदा महामार्गावर मसोली नजीक उभारण्यात आलेला टोल नाका सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर उभा करण्यात यावा, आजरा तालुकावासीयांना टोल मधून मुक्त करावे या मागणीच्या पार्श्वभूमीवर तालुकावासीयांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोर्चासह आंदोलनाचे रान उठवले. तत्कालीन मोर्चा वेळी नेतेमंडळींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन तालुक्याला टोल मुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र आज शुक्रवारपासून टोल वसुलीला सुरुवात होत असल्याने तालुकावासियांच्या या मागणीला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. टोल मुक्तीसाठी ना कुठल्या बैठका झाल्या, ना विधानसभा निवडणुकीनंतर चर्चा झाल्या, ना तालुका वासियांना सवलत मिळाली. आता याचे दुरगामी परिणाम तालुकावासीयांना भोगावे लागणार हे निश्चित. यामुळे तालुक्यात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

     टोलमुक्ती संघर्ष समितीने शुक्रवार (दि. १८) रोजी सकाळी आठ वाजता कार्यकर्त्यांनी टोलनाक्याजवळ उपस्थित राहून टोल वसुलीला विरोध करावा असे आवाहन केले आहे.

आता कोल्हापूर – आंबोली व्हाया गारगोटी,देव कांडगाव

      कोल्हापूर, पुण्याहून कोकण व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. कोगनोळी टोल नाक्यानंतर मसोली येथे टोल द्यावा लागणार असल्याने यापुढे पर्यटक निपाणी मार्गे येण्याऐवजी निश्चितच गारगोटी, देवकांडगाव मार्गे आपली वाहने वळवतील व त्याचा मोठा फटका आजरा शहरातील व्यापारी पेठेस बसण्याची शक्यताही बोलून दाखवली जात आहे.

भादवणवाडी येथे पोक्सो अंतर्गत एकावर गुन्हा

          आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भादवणवाडी ता. आजरा येथे बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश दशरथ कांबळे (वय २८ रा.भादवणवाडी) असे त्याचे नाव आहे.

      त्याच्याविरुद्ध पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे याला पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील अधिक तपास करीत आहेत.

आजरा तालुक्यामधील घरफोड्या, चोऱ्यांवर नियंत्रण ठेवा..
तालुक्यातील सरपंचांची मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यातील विविध गावांमध्ये, चोरांकडून वारंवार घरफोड्यांचे प्रकार घडताना दिसत आहेत. यामध्ये मासेवाडी, उत्तूर, देवर्डे, आजरा, निंगुडगे इत्यादी गावांमध्ये हा प्रकार घडल्याने नागरीकांमध्ये भितीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरलेले आहे. मालमत्तेच्या चोरीबरोबरच जीविताची हानी होण्याचा संभव मनामध्ये डोकावत आहे.

      कुलूप लावलेली बंद घरे फोडणे व चोरी करणे चोरांनी टार्गेट केलेले आहे. सदरच्या घटनामध्ये गावामध्ये बंद असणाऱ्या घरावर पाळत ठेवून, अंदाज घेऊन, चोऱ्या घडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे गावामध्ये येणाऱ्या फेरीवाल्यांच्याकडे सदर घटनेच्या संशयाची सुई जाते. त्यामुळे गावातील पोलीस पाटील व पोलिस प्रशासन माध्यमातून सदरच्या फेरीवाल्यावर लक्ष ठेवून त्यांची ओळख परेड घेऊन खात्री झाल्याशिवाय, गावामध्ये फिरण्यास मज्जाव करण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाने नियोजन करुन होणाऱ्या घरफोड्या (चोऱ्या) नियंत्रणात आणण्याची मागणी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

      यावेळी राजू पोतनीस,जी. एम. पाटील, पांडूरंग तोरगले सरपंच , मासेवाडी,प्रियांका संतोष जाधव- सरपंच पेरणोली, युवराज दत्तू पाटील, दाभिल, समिक्षा शिरिष देसाई, विलास मारुती जोशिलकर, सरपंच मेंढोली, अनिल बळवंत पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थित होते.

‘रामतीर्थ ‘चे प्रवेशद्वार बनत आहे कचऱ्याचे आगार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय असणाऱ्या रामतीर्थ या निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या मार्गावरील प्रवेशद्वारावरच आजरा शहरातील कांही मंडळींनी कचरा आणून टाकण्यास सुरुवात केल्याने भविष्यात हे प्रवेशद्वार कचऱ्याचे आगार बनल्यास आश्चर्य वाटू नये.

      रामतीर्थ धबधब्यासह येथील परिसराला पर्यटन मोठ्या संख्येने भेट देत असतात. लोकवर्गणीतून स्थानिक परिसरामध्ये सुशोभीकरण झाल्याने या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे रामतीर्थ मार्गाच्या प्रवेशद्वारावरच कचरा साठू लागला आहे. चार चाकी गाड्यांमधून कचरा आणून तो रस्त्याशेजारी टाकण्याचे काम कांही उच्चभ्रू मंडळींकडून होऊ लागले आहे. हा प्रकार पाहून पर्यटकांमधून संताप व्यक्त होताना दिसतो. नगरपंचायतीने या ठिकाणी फलक लावून कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी होत आहे.

महेश गुरव यांना प्रशिक्षणासाठी जर्मन कंपनीकडून आमंत्रण

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेरणोली ता. आजरा येथील महेश पांडूरंग गुरव यांना जर्मनी येथील सॅट स्टर्लिंग जीम बीएच या कंपनीने प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले आहे.

      उद्योजक आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेले गुरव हे चौथ्यांदा जर्मनी देशाच्या दौऱ्यावर जात आहेत. सॅट स्टर्लिंग जीम बीएच ही अग्रगण्य कंपनी वाहन क्षेत्रासाठी विविध यंत्र पुरवते. ह्या कंपनीच्या अंतर्गत करार स्वाक्षरी आणि प्रशिक्षण ह्या साठी गुरव यांना आमंत्रित केले आहे. गुरव यांनी इंजिनियरिंग पदवी डी के टी ई इचलकरंजी आणि प्राथमिक शिक्षण हे विद्या मंदिर पेरणोली येथे घेतले आहे.

छायावृत्त…

       आजरा-संकेश्वर-बांदा या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आजरा तालुक्यातील जनतेची फसवणूक करून जनतेची दिशाभूल होत आहे. तरी आजरा तालुक्यातील लोकप्रतिनिधींना विचारात घेवून हा निर्णय घ्यावा. अन्यथा आजरा शिवसेना यांच्या वतीने जन आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन शिवसेना उबाठा तर्फे आजरा तहसीलदारांना देण्यात आले आहे.

      निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील, ओंकार माद्याळकर,शहर प्रमुख आजरा, सुयश पाटील, युवासेना उप तालुका, बिलाल लतिफ उप शहर प्रमुख,युवराज पोवार शिवसेना तालुका प्रमुख, अमित गुरव युवासेना उपसंघटक,संजयभाई सावंत उपसरपंच, देऊळवाडी यांच्या सह्या आहेत.

पुरस्कार…

      धामणे येथील अंबाजी वसंत गुरव त्यांना युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने” राज्यस्तरीय क्रांतीरत्न समाजभूषण प्रेरणा पुरस्कार” जाहिर झाला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

निधन वार्ता
नरसू तुपट

      किणे तालुका आजरा येथील नरसू परसू तुपट ( वय-९० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, सून,नातसून, यांच्यासह मोठा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गाळे वाटपात ‘गाळा’ मारला कुणी? आजऱ्यात सुरू आहे जोरदार चर्चा… काय आहे हे प्रकरण

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हत्तीने दिली ट्रॅक्सला धडक…. रामतीर्थ यात्रा नाही तर राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये… ‘सर्वोदय’ मध्ये सत्ताधारीच

mrityunjay mahanews
error: Content is protected !!