गुरुवार दिनांक २२ मे २०२५


लिलावातील झाडांच्या वाहतुकीसाठी ५ हजार मागितले : वनपाल यादव गजाआड
‘लाचलुचपत’ची कारवाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या लिलावातील झाडांच्या वाहतुकीसाठी ५ हजारांची लाच मागितल्याच्या आरोपावरून वनपाल सागर पांडुरंग यादव (वय ४३. मूळगाव हसूर दुमाला, ता. करवीर, सध्या रा. गणेश बंगला, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
तक्रारदार लाकूड व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी झाडे निविदा प्रक्रियेतून घेऊन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान एका रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्या रस्त्यात बाधित होणारी झाडे तोडण्याचा ठेका त्यांना लिलावाद्वारे मिळाला आहे. त्यानुसार त्यांनी आजरा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे झाडे तोडणे आणि वाहतुकीचा परवाना मागितला होता. त्यांचा अर्ज येथील परिमंडल वनअधिकारी कार्यालयात चौकशीसाठी आल्याचे यादव याला समजले.
संबंधित ठेकेदार आपल्या अर्जाचे पुढे काय झाले? याच्या चौकशीसाठी यादव यांच्याकडे गेले असता वनपाल यादव याने अर्जाच्या चौकशीचा अहवाल मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी ६ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तडजोडीअंती ५ हजार देण्याचे ठरले होते. त्यासंदर्भात त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. २९ एप्रिल २०२५ रोजी ‘लाचलुचपत’ विभागाच्या पथकाने पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली, त्यात यादव याने स्वतः साठी आणि वरिष्ठ अधिकान्यांना देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. परंतु त्याने लाच स्वीकारलेली नाही. ठेकेदाराच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत याबाबत गुन्हा नोंद झाला आहे.

तर शिक्षा अटळ आहे…
घनसाळ भेसळीबाबत कृषी विभाग आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात घनसाळ तांदळामध्ये अन्य तांदूळ मिसळून भेसळ तांदळाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतच्या तक्रारीही ग्राहकांनी केल्या . भेसळयुक्त घनसाळ तांदळाची विक्री करू नका, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे. कृषीकडून याबाबत तांदुळ विक्रेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
आजरा घनसाळ तांदळाला भौगोलीक उपदर्शन (जी.आय.) मानांकन मिळाले आहे. या तांदळात अन्य तांदळाची भेसळ करून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. भौगोलिक मानांकनाचे उल्लंघन करून भेसळयुक्त तांदळाची विक्री केल्यास त्या व्यक्ती अथवा कंपनीला कठोर कारवाईचा सामोरे जावे लागेल. दोषींना महीन्यापासून तीन वर्षापर्यंत वनवास होवू शकतो. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनीच्या उत्पादनाची जप्ती होवू शकते याबाबत कृषी विभागाने कारवाईला सुरुवात केल्याचे सांगण्यात आले.
सर्व विक्रेत्यांना अशा प्रकारे नोटीस देऊन भेसळयुक्त आजरा घनसाळ तांदळाची विक्री न करणेबाबत बजावले आहे. तसेच प्रत्येक दुकानातील घनसाळ तांदळाचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत.सदर कारवाई श्री. किरण पाटील उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज, श्री. भुषण पाटील तालुका कृषी अधिकारी आजरा, श्री. प्रकाश पाटील मंडळ कृषी अधिकारी उत्तुर, श्री. प्रदीप माळी मंडल कृषी अधिकारी आजरा व श्रीमती स्वामिनी दातीर कृषी सहाय्यक यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.
पर्यटकांच्या तक्रारी…
कोकण पर्यटनासाठी येणारे बहुतांशी पर्यटक घनसाळ खरेदीला प्राधान्य देताना दिसतात. परंतु बऱ्याच वेळा अनेक ग्राहकांच्या माथी भेसळयुक्त घनसाळ तांदूळ मारला जातो असेही निदर्शनास येत आहे. पालकमंत्र्यांपर्यंत ही कांही पर्यटक अधिकाऱ्यांच्या तक्रारी गेल्याचे समजते.
उत्पादन व उपलब्ध तांदूळ यामध्ये तफावत
आजरा तालुक्यामध्ये विशिष्ट भागामध्येच दर्जेदार घनसाळ पिकवले जातो .असे असताना सध्या बाजारपेठेत प्रचंड प्रमाणात घनसाळ तांदूळ उपलब्ध आहे. तो ‘ आजरा घनसाळ’ या नावाने ग्राहकांना दिला जातो. पिकणारा तांदूळ व उपलब्ध तांदूळ यामधील ही तफावत मोठी असल्याने हा तांदूळ येतो कुठून ? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

मडिलगे खून प्रकरणी अतिग्रे ग्रामस्थ आक्रमक
सुशांत महाराजांवर कठोर कारवाईची मागणी...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे ता.आजरा येथील विवाहितेच्या हत्याप्रकरणी सौ. पूजा यांच्या हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील माहेरमधील जय जवान जय किसान संघटनेसह ग्रामस्थ, कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. आरोपी सुशांत महाराज यांच्यावर कडक कारवाईच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्याकडे केली आहे.
मडिलगे येथील विवाहिता सौ. पुजा गुरव या महिलेची रविवारी पती सुशांत गुरव याने निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी केलेला तपास निश्चितच कौतुकास्पद आहे. आम्हाला देशातील न्यायव्यवस्था, संविधान यावर विश्वास आहे. त्यामुळे या अनुषंगाने संबंधित नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा व कडक शासन होण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या पध्दतीने पुढील तपास करावा, तसेच न्यायालयामध्ये संबंधित किर्तनकाराविरोधात जे सबळ पुरावे उपलब्ध असतील त्याचा पुरेपूर वापर करून संबंधित नराधमाला अशा अमानवी कृत्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करावेत व आमच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा पध्दतीचे कृत्य करताना दुसरी व्यक्ती किमान दहा वेळा विचार करेल. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनावर अतिग्रे ग्रामस्थांसह जय जवान जय किसान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

शिरसंगी येथील मागासवर्गीय समाजाचा रस्ता खुला करून द्यावा…
तहसीलदारांकडे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी ता. आजरा येथे मागासवर्गीय समाजाचा शेताकडे जाण्याचा पूर्वीपासून वहिवाटीचा रस्ता एका व्यक्तीकडून बंद करण्यात आल्यामुळे य वैरणीचा प्रश्नही गंभीर झाला आहे. समाजाची संपूर्ण जमीन म्हारकी नावाचे शेत आहे व समाजाची दफनभूमी पण तिथेच आहे.
संबंधित व्यक्तीच्या शेतातून वाट असल्यामुळे समाजातील प्रत्येक शेतकऱ्याला वाटेतून जाण्यास मज्जाव केला जात आहे. संबंधित वाट खुली करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदनही तहसीलदारांसह पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.
निवेदनावर रामू कांबळे, सचिन कांबळे, निलेश कांबळे, तुकाराम कांबळे, शांताराम कांबळे, नीता कांबळे, दत्तात्रय कांबळे, शोभा कांबळे आदींच्या सह्या आहेत.

देवर्डे हायस्कूलची दहावीच्या निकालाची १००% ची परंपरा कायम…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवर्डे ता. आजरा येथील श्री रवळनाथ हायस्कूल देवर्डे चा दहावीचा निकाल सलग बाराव्या वर्षी १००% लागला.
शाळेत प्रथम श्रेया तानवडे ( ९३ % ) द्वितीय प्रीती पोवार (९१ % ) तृतीय सौरभ नाईक (९०.४०% ) या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक सुभाष सावंत, राजेंद्र पाटील,महेश नावलगी, चंद्रकांत घुरे, देवेंद्र शिखरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
पाऊस पाणी…
पाऊस सुरूच…
विजेचा खेळ खंडोबा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर व परिसरामध्ये पाऊस सुरूच असून पावसामुळे वीज वितरणच्या कामांवर मर्यादा येत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. बुधवारी रात्रभर वीज गायब झाल्याने शहरवासीय वैतागून गेले होते. गुरुवारी उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.
पाऊस मान्सूनपूर्व असला तरीही मृग नक्षत्राप्रमाणे पावसाचे आगमन झाले आहे. वातावरणामध्ये प्रचंड बदल झाला असून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. आजरा शहरासह तालुक्यात पाऊस सुरू आहे.


