

नो रिस्क...
पावसात पूल बांधणे अशक्य…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे प्रमाण जास्त आहे. अशावेळी पावसाच्या तोंडावर आजरा येथील लेंड ओहोळ नाल्यावरील पुलाचे काम करून घेणे केवळ अशक्य आहे. यासाठी तातडीने नाल्याची सफाई करून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने पडझड झालेल्या भागाची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करून घेऊन पावसाळ्यानंतर पुन्हा बाबत सकारात्मक निर्णय घेणे योग्य ठरेल सध्या पुलाबाबत ‘ नो रिस्क ‘असे मत आजरा तहसीलदार समीर माने यांनी व्यक्त केले. आजरा तहसील कार्यालयात महामार्ग विभागाचे अधिकारी, तहसीलदार समीर माने, पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, नगरपंचायतीचे अधिकारी व स्थानिक नागरिकांची बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार माने बोलत होते.
आजरा येथील लेंड ओहोळ नाल्यावरील पुलाच्या पडझडीमुळे वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे वास्तविक महामार्ग विभागाने आपल्या प्लॅनमध्ये नवीन पुलाचा समावेश करणे गरजेचे होते तसे न झाल्याने भविष्यात या पुलाखालून जाणारे पाणी बाहेर पसरून व पुलाचा कमकुवतपणा याचा त्रास वाहन चालकांसह आजूबाजूच्या व्यावसायिकांना होण्याची शक्यता आहे . एकदा रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्ग प्रशासन याकडे लक्ष देईल याची कोणतीही खात्री देता येत नाही. यासाठी आत्ताच या पुलाबाबत निर्णय होणे गरजेचे आहे असे मत यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, परेश पोतदार व अन्य उपस्थितांनी मांडले.
महामार्गाच्या प्लॅनमध्ये या नवीन पुलाचा समावेश नसल्याने त्याच्या मंजुरीसह इतर तांत्रिक सोपस्कार पूर्ण करण्याकरता कालावधी लागणारा आहे असे महामार्ग विभागाचे अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले. तर तातडीने पूल बांधणे शक्य नसल्याने पावसानंतरच याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे अन्यथा पावसाळ्यात कोकणच्या दिशेने जाणारे पर्यटक व वाहन चालकांचे प्रचंड हाल होणार आहेत असे सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगर यांनी सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत आम्हाला नवीन पूल हवा अशी आक्रमक भूमिका परशुराम बामणे व संभाजी पाटील यांनी घेतली.
सध्या नाल्याची सफाई करून त्यावर स्लॅब टाकून पावसाळ्यानंतर पुलाबाबत निर्णय घेण्यात यावा असे तहसीलदारांनी सांगितल्यानंतर तूर्तास हा प्रश्न निकालात निघाला आहे.
नवीन पुलाबाबत ठाम…
सध्या या मार्गावरून अवजड व मालवाहू वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात. त्यामुळे नवीन पुलाशिवाय कोणताही अन्य पर्याय नाही. आपण नवीन पुलाच्या मागणीवर ठाम आहोत असे परशुराम बामणे व संभाजी पाटील यांनी सांगितले.
बैठकीस विजय थोरवत, संतोष शेवाळे,यशवंत चव्हाण, गौरव देशपांडे, राजू विभुते, संजय यादव, जोतिबा आजगेकर, पांडुरंग सावरकर, रंगराव माडभगत, जावेद पठाण उपस्थित होते.

सिरसंगी येथे आज वारकरी मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अखिल भारतीय वारकरी मंडळ आजरा यांचे वतीने सिरसंगी येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिर पंचक्रोशी हरिभक्त पारायण येथे बुधवार दिनांक २२ मे रोजी सकाळी दहा वाजता ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ याच्या अध्यक्षतेखाली वारकरी मेळावा व आजरा तालूका नवीन कार्यकारणी सत्कार होणार आहे.
यासाठी आजरा व चंदगड तालुक्यातील वारकरी दिंडीने सामिल होत आहेत.

बारावी निकाल…

आजरा महाविद्यालय -९६.४५ %
उत्तूर ज्युनिअर कॉलेज – ९७.६७%
बापूसाहेब सरदेसाई ज्युनि.कॉलेज निंगुडगे – ८६.६६%
ऊर्दू ज्यूनिअर कॉलेज आजरा – ८२.६०%
व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज आजरा – १००%
ओम पॅरामेडिकल, आजरा – १००%
पं. दीनदयाळ आजरा – १९९%
नवकृष्ण हॅली उत्तूर – १००%

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जगदगुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, दक्षिण पिठ नाणिजधाम यांच्या वतीने अविरत विनामूल्य रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा गडहिंग्लज-आंबोली या महामार्गासाठी आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय नागेश यमगर यांच्या हस्ते पार पडला.
नाणीजधाम यांच्या वतीने देशभरामध्ये विविध ठिकाणी नॅशनल हायवेवर मोफत ॲम्बुलन्स सेवा पुरविली आहे. आजतागायत ५२ ॲम्बुलन्स कार्यरत असून २१५४८ अपघातग्रस्तांना जीवदान मिळाले आहे.
आजरा तालुक्यातील भक्तगणांनी संस्थांनमार्फत संकेश्वर -बांदा या महामार्गावर गडहिंग्लज ते आंबोली या परिसरात सेवेसाठी मागणी केली होती.यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. कृष्णात माळी , मुख्यपिठ महिला निरीक्षक सौ. सीमा पाटील , कोल्हापूर जिल्हा सचिव श्री. रमेश लोकरे , विशेष कार्यवाहक श्री. मधुकर बाबर , जिल्हा महिला अध्यक्षा सौ. प्रणाली पाटील , जिल्हा युवा प्रमुख श्री. अमोल पाटील, चंदगड तालुका अध्यक्ष श्री. कृष्णात पाटील , आजरा तालुका अध्यक्ष श्री. आकाराम देसाई, आजरा तालुका महिला अध्यक्षा सौ. प्रतिक्षा पाटील , आजरा तालुका युवा प्रमुख श्री. महेश पाटील, आजरा तालुका माजी अध्यक्ष श्री. कळेकर , आजरा तालुका सचिव शिवाजी सरंबळे ,तालुका कॅप्टन श्री. महादेव कुंभार, आजरा व भुदरगड तालुक्यातील भक्तगण उपस्थित होते.



