mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न…
लेंड ओहोळ ओढ्यावरील मोरीसह रस्त्याचे काम थांबवले…
नवीन मोरी बांधण्याची मागणी

.       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरातील संभाजी चौक येथे लेंडओहोळ नाल्यावरील मोरी ही कमकुवत झाली असून महामार्गाचे काम करताना पडझड झाली आहे. नाल्याची स्वच्छता न झाल्याने मोरीतून पाणी जाण्यावर मर्यादा येत असून पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यास नाल्यातील दूषित पाणी संपूर्ण चौकभर पसरण्याची शक्यता असल्याने मोरीवरील रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांनी काल सायंकाळी रोखले . नवीन मोरी करण्याची मागणी ही उचलून धरली आहे. एकंदर या मोरीची अवस्था नकटीच्या लग्नासारखी झाली आहे.

     गेले दोन महिने संभाजी चौक ते बस स्थानक परिसरातील रस्त्याचे काम रेंगाळले आहे. चार दिवसांपूर्वी रस्त्याच्या कामासाठी खुदाई करत असताना लेंड ओहोळवरील मोरीची पडझड झाली. दगड निसटल्याने मोरीला भगदाडही पडले. सध्या या मार्गावरून छोट्या-मोठ्या वाहनांसह १६ चाकी अवजड वाहने ये-जा करीत असतात. भगदाड पडलेल्या ठिकाणी स्लॅब टाकून त्यावरून रस्ता करण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदाराकडून सुरू असताना स्थानिक नागरिकांनी याला आक्षेप घेतला. जर हे दगड निघालेच असतील तर या मोरीची स्वच्छता करून मोरी मध्ये अडकलेली घाण पूर्णपणे काढून पाण्याचा मार्ग खुला करावा. हा तात्पुरता उपाय व पाऊस कमी येताच मोरीची नव्याने बांधणी करावी जेणेकरून भविष्यात पडझड होऊन एखादा मोठा अपघात होणार नाही अशी भूमिका घेतली. नागरिकांचा आक्रमक पवित्रा बघून बांधकामासाठी आलेल्या मंडळींनी आपले साहित्य तातडीने हलविले.

     मुळातच दोन महिने रेंगाळलेले हे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज बैठक…

      सदर मोरी संकेश्वर- बांदा महामार्गाच्या प्लॅनमध्ये नवीन करण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे. या नव्या मोरीचा समावेश प्लॅनमध्ये का केला नाही? यासह विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता आज रात्री कार्यालयात संबंधित ठेकेदार व शहरवासीयांची बैठक होणार असल्याचे समजते.

आजरा बसस्थानकावरील स्वच्छतेबाबतचा ढिसाळपणा दूर व्हावा

अन्याय निवारण समितीची मागणी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा बसस्थानकावरील स्वच्छतेबाबत अनास्था दिसत आहे. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पहावयास मिळते. याबाबत आगार व्यवस्थापनाला वारंवार विनंती करूनही फारसे गांभिर्य दाखवलेले नाही. आगार प्रमुखांनी बसस्थानक स्वच्छतेसह अन्य मागण्याबाबत काय कार्यवाही केली ? असा सवाल अन्याय निवारण समितीने केला आहे. याबाबतचे निवेदन आगार व्यवस्थापकांना दिले आहे.

      स्वच्छता, आरक्षणासह परिसराचे सुशोभिकरण याविषयावर या वेळी चर्चा झाली. अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे म्हणाले, आजरा बसस्थानक आवारात स्वच्छतेसाठी दोन कर्मचारी नेमण्याची आगार प्रमुखांना परवानगी असतांना येथे स्वच्छता कर्मचारी उपस्थित नसल्याने कचरा होवून याचा त्रास प्रवासी वर्गाला होत आहे. एका बेकरी व्यावसायिकाला येथील सुशोभिकरण व अन्य कामे करण्याच्या अटीवर दु‌कानगाळा दिला आहे. या अटी काय आहेत हे स्पष्ट करावे. सर्वच जबाबदारी संबंधीत दु‌कानधारकावर सोपविणे चुकीचे आहे. काही बसफेऱ्या नव्याने सुरु झाल्या आहेत. परंतु त्याची माहीती प्रवाशाना नाही. या नवीन बसफेऱ्यांची प्रसिध्दीचा फलक बसस्थानकावर लावावा. समीर लतिफ यांनी बसस्थानक आवारात लावल्या जाणाऱ्या डिजीटल फलकांना नेमकी परवनागी कोण देते अशी विचारणा केली व कोणालाही असे फलक लावण्याची परवानगी देवू नये व तशा सूचना दर्शनी भागावर लिहाव्यात.

      आगार प्रमुख श्री. शिंदे म्हणाले, यापूढे स्वच्छतेबाबत योग्य ती कार्यवाही करू. बसस्थानक आवारात लावल्या जाणाऱ्या फलकांची कोणतीही परवानगी आगाराकडून दिली जात नाही. नगरपंचायतीनेही ती देवू नये अशा सूचना केल्या जातील. या वेळी झालेल्या चर्चत ज्योतिप्रसाद सावंत,पांडुरंग सावरतकर, यशवंत चव्हाण, संदिप पारळे,सुजित देसाई प्रसाद जोशी यांनी भाग घेतला.यावेळी अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकशाहीर गव्हाणकर पुरस्काराचे
८ जूनला वितरण

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार ८ जून रोजी प्रतिभा शिंदे यांना डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते प्रदान करण्याचा निर्णय आजरा येथे झालेल्या पुरस्कार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयवंतराव शिंपी होते.

      प्रतिभा शिंदे या धुळे नंदुरबार परिसरातील आदिवासी, शेतकऱ्यांच्या लढाऊ नेत्या आहेत. नर्मदा प्रकल्पातील पुनर्वसनाची लढाई त्या नेटाने लढवत आहे. एक लढाऊ आणि झुंजार कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. डॉ भारत पाटणकर हे श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेचे लढाऊ नेते आहेत. एक जेष्ठ विचारवंत म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो.

      हा कार्यक्रम श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे होणार आहे.

      या बैठकीला मुकुंददादा देसाई, अल्बर्ट डिसोझा, डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. मीना शिरगुप्पे,सौ. पुष्पलता घोळसे, रवी भाटले, रणजित कालेकर, काशिनाथ मोरे, धनाजी राणे, कृष्णा सावंत यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

      आभार समितीचे सचिव सुनील पाटील यांनी मानले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनी सज्ज
प्राथमिक कामे पूर्ण

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत मान्सून पूर्व देखभाल दुरुस्तीची बहुतांशी कामे पूर्ण करण्यात आली. पावसाची सामना करण्यासाठी वीज वितरण कंपनी सज्ज झाली आहे.

     दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळय़ात अखंडित व नियमित वीज पुरवठा रहावा यासाठी आजरा-१ शाखा कार्यालयाच्या जनमित्रांनी व यंत्र चालकांनी उत्स्फूर्तपणे सदरचे काम पार पाडले. त्यात तारांना लागणार्‍या व स्पर्श होऊ शकणार्‍या झाडांच्या फांद्या तोडणे, एबी स्विच ला ऑयलिंग व ग्रीसिंग करणे, कटपॉईंट चे जंप मारणे, उपकेंद्रातील खराब झालेल गियर बदलणे, केबल किट दुरुस्ती करणे, नटबोल्ट बदलणे, यासारखी अनेक कामे पूर्ण करण्यात आली.

     यात प्रधान तंत्रज्ञ विनायक खोत, वरिष्ठ यंत्रचालक अनिल मर्यापगोळ, यंत्र चालक सचिन सोनार, वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ नागनाथ पवार, विद्युत सहाय्यक शुभांगी पैठणकर, व लहू कापडूसकर, सुशांत कांबळे, साहिल दोरुगडे, नागोजी रेडेकर, पंकज कुंभार, सुरेश नातलेकर इत्यादींनी सहभाग नोंदवला.

निधन वार्ता
तानाजी देसाई

     सरोळी ता. आजरा येथील तानाजी आप्पा देसाई ( वय ६३ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे महिनाभरापूर्वी त्यांच्या मुलाचा विवाह झाला होता महिनाभरातच देसाई यांचे निधन झाल्याने सरोळी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.


छायावृत्त…


       आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुकुंददादा देसाई, नौशाद बुड्ढेखान, रवी भाटले, निसार लाडजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


     युवा सेनेचे आजरा तालुकाप्रमुख राजकुमार भोगण यांच्या वाढदिवसानिमित्त बुरुडे येथे अंगणवाडीतील बालकांना प्रोटीन पोषणयुक्त खाऊ वाटप करण्यात आले.



 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लढण्याचा वारसा घेऊन निवडणूक रिंगणात : सूर्यकांत नार्वेकर

mrityunjay mahanews
error: Content is protected !!