

शहरवासीय वैतागले…

ज्योतिप्रसाद सावंत
शहरभर ठीकठिकाणी करण्यात आलेली खुदाई, वारंवार खंडित होणारा पाणीपुरवठा, खुदाईमुळे सर्वत्र चिखल आणि धुळीचे असणारे साम्राज्य यामुळे आजरा शहरवासीय वैतागून गेले असून यातून सुटका होणार तरी कधी ? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
गेले काही दिवस संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम सुरू आहे.या कामाला विलंब होत असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. पाऊस पडल्यानंतर चिखल तर पाऊस गेल्यानंतर धूळ अशी विचित्र अवस्था निर्माण होत असून त्यातच वाहतुकीच्या वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे शहरवासीयांचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत.
या खुदाई मध्ये नळ पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटत असल्याने शहरभर पाण्याच्या नावाने शिमगा सुरू झाला आहे. नगरपंचायत प्रशासनाला त्याचे फारसे गांभीर्य नसल्याने शहराला कृत्रिम पाणीटंचाई भासू लागली आहे. एकीकडे सुट्ट्यांमुळे पै-पाहुणे यांची घरोघरी वर्दळ असताना पाण्याच्या नावाने बोंष सुरू झाल्याने नगरपंचायत कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
नवीन पाणीपुरवठा योजनेचे करोडो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अत्यंत निकृष्ट पद्धतीचे साहित्य वापरून सुरू असलेल्या या कामामुळे शहराच्या गल्ली बोळामध्ये खुदाई करण्यात आली आहे. खुदाई करून पंधरा- पंधरा दिवस पाईप न टाकल्याने सर्वत्र माती व चिखलच दिसत आहे. या पाणी योजनेमध्ये नगरपंचायत कारभाऱ्यांनी ‘अर्थ’पूर्ण व्यवहार केल्याने संबंधित ठेकेदाराला कामात होत असणाऱ्या दिरंगाईबाबत व दर्जा बाबत विचारण्याचे धाडस कारभा-यांमध्ये नसल्याची चर्चा शहरवासीय करत आहेत.
एकंदर परिस्थिती पाहता सद्यस्थितीत शहरवासीयांचे प्रचंड हाल सुरू असून शहरवासीयांना कोणी वाली राहिलेला दिसत नाही.

काजू बियांचा तर ११०/- ओलांडेना…
उत्पादक अडचणीत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले तीन वर्षे उत्पादकांना दरवाढीचे लागलेले ग्रहण यावर्षीही कायम असून हंगामाच्या अंतिम टप्प्यात ११० रुपये प्रति किलोच्यावर काजू बियांचे दर जात नसल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांना गेले तीन वर्षे लागलेले दरवाढीचे ग्रहण अद्याप कायम आहे.
गत आठवडा बाजारामध्ये काही व्यापाऱ्यांनी १०५/- रुपये प्रति किलो तर काहींनी ११०/- रुपये प्रति किलो दराने काजू बियांची खरेदी केली. सलग चार वर्षे हाच दर असल्याने एकीकडे महागाई गगनाला भिडत असताना काजू बियांचे तर मात्र स्थिरच असल्याने उत्पादकातून नाराजी व्यक्त होत आहे.
दरात व वजनातही तफावत…
काजू बिया खरेदी करताना काही व्यापारी दरामध्ये तफावत करताना दिसतात तर अनेक ठिकाणी वजन करताना शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसते. बियांचे अपेक्षेप्रमाणे नसणारे दर व वजनात होणारी फसवणूक अशा दोन्ही बाजूंनी उत्पादक अडचणीत येऊ लागले आहेत.

पावसाची जोरदार हजेरी
मान्सूनची चाहूल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यामध्ये ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या आठवड्यात वारंवार पाऊस झाला असून या पावसामुळे मान्सूनची चाहूल लागत आहे.
गतवर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाने आजरेकरांना चांगलेच अडचणीत आणले होते. याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर शेती पिकांवर जाणवला होता. अनेक ठिकाणी पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तालुक्याच्या पश्चिम भागात प्रथमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असताना या वर्षी मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात वळीव पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकरी वर्गाची खरीपपूर्व मशागतीची कामे वेगावली आहेत. ऊस पिकालाही आहे जीवदान मिळाले आहे. हवेतील उष्णता कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळत आहे.
एकंदर यावर्षी वारंवार पडणाऱ्या मान्सूनपूर्व वळीव पावसामुळे समाधानकारक मान्सूनची चाहूल लागण्याचे दिसत आहे.

निसर्गाचा चमत्कार…

आजरा येथील डॉ. धनाजी राणे यांच्या काजू बागेतील झाडांना काजूची विविध प्रकारच्या आकारांची विचित्र फळे लागलेली असून हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल…



