

दुचाकीस्वारांनी महिलेचे मंगळसूत्र लांबवले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेळप ता.आजरा येथील महिलेची सोन्याची माळ लांबवल्याची घटना ताजी असतानाच बहिरेवाडी ता. आजरा येथील महादेवी परशराम चौगुले या महिलेचे अज्ञात दुचाकी स्वारांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे.
ज्ञमहादेवी चौगुले व आक्काताई शिंदे या दोघी शेताच्या दिशेने चालल्या होत्या. दरम्यान अज्ञात दुचाकी स्वारांनी त्यांना रस्त्यात गाठून सोलापूरच्या दिशेने जाणारा रस्त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. ही चौकशी करत असतानाच त्यापैकी एकाने महादेवी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले व गडहिंग्लजच्या दिशेने सुसाट निघून गेले.
शनिवारी सकाळी हा प्रकार घडला याबाबतची फिर्याद महादेवी चौगुले यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

लेंडओहोळ नाल्यावरील पुलाची पुन्हा पडझड
वाहतुकीचा बोजवारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शुक्रवारी रात्री रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने संभाजी चौकात केलेल्या खुदाईमुळे न रस्त्याला भगदाड पडल्याने शुक्रवारसह शनिवारी वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला. वाहन चालकांसह स्थानिक रहिवाशांनाही याचा मोठा फटका बसत असून शनिवारी दिवसभर पुन्हा- पुन्हा वाहतूकीची कोंडी होत होती. भरीस भर म्हणून या पुलाची शनिवारी पुन्हा पडझड झाली आहे.
महामार्गाचे रेंगाळलेले काम आजरा शहरवासीयांसह कोकणच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. अर्धा -अर्धा तास वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी लागत असल्याने वाहनधारकांचा वेळ वाया जात आहे. ही कोंडी दूर करताना पोलीस कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. शहरातील नळपाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा खंडित झाल्याने शहरवासीयांचे हाल होत आहेत.
एखादा जोरदार पाऊस झाल्यास वाहनधारकांची दैना उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ओढ्याचे मूळ पात्र बदलू नये…
खोराटवाडी ग्रामपंचायतची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराकडून खोराटवाडी येथील ओढ्याचे मूळ पात्र बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हा प्रयत्न खोराटवाडीकर ग्रामस्थ कदापिही यशस्वी होऊ देणार नाहीत. प्रशासनाने तातडीने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी खोराटवाडी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मौजे खोराटवाडी येथील ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार दिनांक- १५/०५/२०२४ रोजी घेतलेल्या मासिक सभेत विषयास अनुसरून मौजे खोराटवाडी येथून चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ H च्या कामकाजामध्ये प्रस्तावित मौजे मासेवाडी ते हिरण्यकेशी नदीपात्रास जोडणाऱ्या सर्व क्षेत्रातील पावसाचे पाणी जाणाऱ्या ओढ्याचे कामकाज पूर्ण केले आहे. सदर ओढ्यावर जुना असलेला ब्रिटीशकालीन पूल पाडून सदर ठेकेदार यांनी नविन बांधकाम पूर्ण केले आहे. सदर परीस्थितीत वैयक्तिक लाभासाठी किवा आर्थिक आमिषापोटी केलेल्या कामकाजामध्ये बदल करून सदर ओढा/नाला याचे मूळपात्र बंद करून अन्य मार्गे त्याचा प्रवाह चालू ठेवणेसाठी सदर ठेकेदार यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत असा आरोप करण्यात आला आहे.
सदर कामांचे शासकीय मापदंडानुसार होणारे कामकाज पूर्ण करणेत यावे. सदर कामात कोणतीही उणीव राहिल्यास होणारे नुकसान संबधित अधिकारी/ठेकेदार यांचेकडून वसूल करण्याचा पूर्णपणे अधिकार हा आपल्या शासकीय यंत्रणेमार्फत वापरण्यात यावा.
सदर ओढ्याचा पाणी प्रवाह बदलल्यामुळे शेजारी असणाऱ्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा विहिरीचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. तरी संबंधितांकडून विहिरी सभोवताली योग्य प्रकारे संरक्षण करा १० मीटरवर जुन्या ओढ्याच्या पात्रानुसार संरक्षक भिंत उभारून ग्रामस्थांचे पाण्याचे होणारे हाल रोखण्यास मदत होईल. सदरचे काम पूर्णपणे न झाल्यास सर्व ग्रामस्थ मिळून सदरचे नवीन होऊ घेतलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ H रोखून आपला निषेध नोंदवणार आहेत. तरीही कामकाज पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. त्यामुळे तहसीलदारांमार्फत योग्य आदेश होऊन समस्त ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.



