mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


लोकसभा निकालाची प्रतीक्षा…

तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार

          आजरा : ज्योतिप्रसाद सावंत 

     संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह आजरा तालुक्याला लोकसभा निवडणूक निकालाची प्रतिक्षा असून लोकसभा निवडणूक निकालानंतर तालुक्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय अभ्यासकांतून व्यक्त होत आहे.

     आजरा तालुक्यामध्ये सद्यस्थितीस राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणूक माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेसही घरोघरी पोहोचली आहे. आमदार सतेज पाटील यांचे वलय तरुणांसह कार्यकर्त्यांना आकर्षित करू लागले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे आजरा तालुक्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत. एकीकडे हे दोन्हीही नेते कार्यकर्त्यांना विविध निवडणुकांच्या माध्यमातून बळ देताना दिसत असताना दुसरीकडे मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे स्थानिक कार्यकर्त्यांकडे फारसे लक्ष नसल्याचेही स्पष्टपणे जाणवते. मुळातच भाजपा मधील नवे व जुने हा वाद संपुष्टात आणण्यात जिल्हास्तरीय नेते मंडळींना फारसे यश आलेले दिसत नाही. याचा परिणाम म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. या अंतर्गत वादामुळे वरिष्ठ नेते मंडळीही आजरा तालुक्यात प्रचार सभा घेणे अथवा इतर राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावताना फारसे उत्साही दिसले नाहीत.

    वास्तविक समोर विधानसभा निवडणुकीसह पंचायत समिती, जिल्हा परिषद आजरा नगरपंचायत या प्रमुख निवडणुकांचे नगारे वाजत असताना तालुक्याची राजकीय मशागत करण्याची आलेली संधी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी फारशी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही.तर राष्ट्रवादीमध्ये वरिष्ठ पातळीवर फूट पडली असली तरीही तालुक्यातील कार्यकर्ते मात्र ही फूट गांभीर्याने न घेता विविध निवडणुकांना एकत्रितरित्या सामोरे जाताना दिसतात याचा निश्चितच त्यांना वेळोवेळी फायदा झाल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेत राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात कुठेही आक्रमक दिसले नाहीत.

    शिवसेनेचा शिंदे गट व या शिंदे गटाचे नेमके कार्यकर्ते कोण ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. एकीकडे ‘ उबाठा ‘ गटाचे कार्यकर्ते विविध प्रश्नांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरत असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते फारसे आक्रमक दिसत नाहीत.लोकसभा निवडणूक माध्यमातून डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते, वंचित चे कार्यकर्ते ,धरण व प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते, गिरणी कामगार एकत्र आल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. ही मोट अशीच राहिल्यास भविष्यात याची फार मोठी राजकीय किंमत महाविकास आघाडी विरोधातील मंडळींना मोजावी लागणार असे दिसत आहे.

    लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच विविध पक्षातील नाराज मंडळी ‘धक्कादायक’ निर्णय घेण्याच्या पावित्र्यात आहेत. उघडपणे नसली तरीही कार्यकर्त्यांशी याबाबत संवाद साधून आवश्यक त्या हालचालीही त्यांनी सुरू केल्या आहेत.

     लोकसभा निवडणुकीचा देशातील निकाल काहीही असो पण जिल्ह्यातील निकाल हा आजरा तालुक्यातील बऱ्याच राजकीय उलथापालथी घडवून आणण्यास कारणीभूत ठरणार आहे हे निश्चित.

तुमच्या उमेदवारीवेळी आम्ही तुमच्या सोबत…

     लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून प्रस्थापित मंडळींना प्रचार यंत्रणा राबवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कांही कार्यकर्ते थेट विरोधी उमेदवारांचा उघडपणे प्रचार करताना दिसत होते. याबाबत संबंधित कार्यकर्त्यांशी नेते मंडळींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तुमच्या निवडणुकीच्या वेळी साहेब आम्ही तुमच्या सोबतच आहोत यावेळी मात्र तुम्ही आम्हाला फारसा आग्रह करू नका असे स्पष्टच सांगताना कार्यकर्ते दिसत होते. पण यातील बरेच तात्पुरत्या स्वरूपात विरोधी प्रवाहात गेलेले कार्यकर्ते त्याच प्रवाहात राहण्याचे बोलू लागले आहेत. याचा फटका प्रस्थापितांना निश्चितच बसणार आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!