

कोवाडे येथील एकाची आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोवाडे ता. आजरा येथील कृष्णा श्रीपती सुतार ( वय ४४ वर्षे ) यांनी राहत्या घराच्या मागील बाजूस असणाऱ्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबतची वर्दी उमेश रामचंद्र सुतार यांनी आजरा पोलिसात दिली असून कृष्णा हे व्यसनी होते. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कांबळे करीत आहेत.

मान्सूनपूर्वी मार्कांचा पाऊस…बाळसं की सूज…?पुढे काय ?

ज्योतिप्रसाद सावंत
दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. अपवादात्मक हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मुले अनुत्तीर्ण झाली. इतर मुलांनी मार्कांचा पाऊस पाडला. मार्कांचा हा पाऊस म्हणजे बाळसं की सूज ? असा प्रश्न निर्माण होण्याजोगी परिस्थिती आहे. सूज असेल तर पुढे काय हा प्रश्न निश्चितच चिंताजनक आहे.
अलीकडे शिक्षण विभागाची धोरणे पहाता दहावीच्या परीक्षा म्हणजे केवळ औपचारिकता असे चित्र निर्माण झाले आहे. नववीच्या परीक्षांपेक्षाही दहावीच्या परीक्षा सोप्या वाटू लागल्या आहेत. नववीच्या परीक्षेपेक्षाही दहावीच्या परीक्षेमध्ये नैसर्गिकरित्या जादा गुण मिळवताना विद्यार्थी दिसतात.
वीस-पंचविस वर्षांपूर्वी ७० ते ८० टक्के गुण ओलांडणे म्हणजे मोठे दिव्य होते. हे दिव्य पार करणारेच नामवंत इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, संशोधक व इतर उच्च पदस्थ अधिकारी म्हणून भविष्यात ओळखले जात होते. केवळ हे दिव्यच नाही तर काही मंडळींना पास होतानाही बरेच प्रयत्न करावे लागत होते. थोडक्यात त्यावेळी ‘ऑक्टोबरची वारी’ असा शब्दप्रयोग फारच प्रचलित झाला होता. अनेकदा प्रयत्न करूनही दहावी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या मंडळींवर सध्या पालकत्वाची जबाबदारी आली आहे. तर काहींची गाडी त्यावेळी ५०% च्या वरही जाताना मारामार होती. सध्या अशा पालकांच्या मुलांना ८० टक्के, ९० टक्के गुण मिळालेले पाहून त्यांचा ऊर भरून येताना दिसतो. आणि मग आपोआपच त्यांची पावले सध्या ठिकठिकाणी फोफावलेली इंजिनिअरिंगसह खाजगी अकॅडमी, विविध कोर्सेसची दुकाने यांच्या दिशेने वळू लागतात आणि ही दुकाने चालवणाऱ्यांची चांदी होताना दिसते.
वीस वर्षांपूर्वीचे ८० टक्के व आत्ताचे ८० टक्के यात जमीन आसमानचे अंतर आहे. सध्या पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थ्यांची गुणपत्रिका ७०-७५ टक्केच्या वरील दिसते. हे पालक मुलांच्या हुशारीची क्षमता विसरताना दिसतात. हजारो रुपयांच्या देणग्या देऊन इंजिनिअरिंगसह विज्ञान शाखेकरीता प्रवेश मिळवण्याचा पालकांचा कल दिसतो. यातून एक जीवघेणी स्पर्धा निर्माण होताना दिसते.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचे (cbse) विद्यार्थी तौलनिकदृष्ट्या या स्पर्धेमध्ये सहजरित्या पुढे सरकताना दिसतात. इतर मुलांची मात्र कालांतराने फरपट होत जाते. झेपत नाही म्हणून अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीसारखे शिक्षण अर्धवट टाकून कालांतराने पर्याय शोधताना दिसतात. समवयीन मुले पुढे गेल्याने आत्मविश्वास गमावणे, मानसिक दृष्ट्या खच्चीकरण होणे, नैराश्य, व्यसनाधीनता याचा यातूनच उगम होऊन पुढेही मुले कुटुंबीयांच्या दृष्टीने अनेक प्रश्नांची निर्मिती करणारी ठरतात.
निकालाची टक्केवारी म्हणजे करिअरची अंतिम दिशा ठरवणारी नसून विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक लक्षात घेऊन त्यांना पुढील दिशा दाखवणे गरजेचे आहे. कोरोना नंतर नोक-यांची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. शासकीय नोकर भरती जवळपास बंद आहे. खाजगी कंपन्या ‘ यूज अँड थ्रो ‘ चे धोरण वापरू लागल्या आहेत. आयटी कंपन्यांचे आजही ‘वर्क फ्रॉम होम’ चे ग्रहण संपलेले नाही.अशावेळी व्यवसायाभिमुख करिअरचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत याचे भान पालकांनीही ठेवणे गरजेचे आहे.अन्यथा गुणांची ही सूज भविष्यात संपूर्ण कुटुंबाच्या दृष्टीने अडचणीची ठरू शकेल यात शंका नाही.


