

भाजपा सरकारचे करायचं काय…?
आज-यात घोषणाबाजीसह महाविकास आघाडीची निदर्शने

आजरा : प्रतिनिधी
आजरा तालुका महाविकास आघाडी व शिवसेनेच्या वतीने १४२ खासदार निलंबनाच्या निषेधार्थ भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. भाजपा सरकारचं करायचं तरी काय ? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते येथील संभाजी चौकात घोषणाबाजी करत एकत्र आले. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवसेना तालुका अध्यक्ष युवराज पोवार म्हणाले, सबका साथ… सबका विकास… असे म्हणत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने सर्वसामान्य कामगार व शेतकरी वर्गाला देशोधडीला लावले. महागाईत प्रचंड वाढ झाली. खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची थट्टा करण्याचे काम भाजपा सरकारने केल्यामुळे आता या सरकारला पायउतार करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला. यावेळी उपजिल्हा संघटक संभाजी पाटील ,तालुका प्रमुख युवराज पोवार, राजू सावंत, संजय येसादे, भिकाजी विभुते, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस नौशाद बुड्डेखान, समीर चांद, राजू बंडगर, वसंत भुईंबर, जयसिंग पाटील नारायण कांबळे, मारुती डोंगरे, जयसिंग पाटील ,शिवाजी आडाव, दिनेश कांबळे, ओंकार माद्याळकर, महेश पाटील,दिनकर मगदूम, सुयश पाटील, महादेव कांबळे,तुकाराम पाटील, सागर नाईक यासह शिवसैनिक व युवा सैनिक हजर होते.


वाहतूक कोंडीने लावली आठवडा बाजाराची वाट

आजरा : प्रतिनिधी
रस्त्याच्या शेजारी उभारलेली वाहने, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स व ट्रक, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी गाड्या, रस्ता कामाकरीता कच्च्या मालाची वाहतूक करणारे डंपर्स व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या यांनी काल शुक्रवारी आठवडा बाजाराची पुरती वाट लावून टाकली. दिवसभर वारंवार आजरा महागाव मार्गासह संभाजी चौकामध्ये वाहतुकीची कोंडी होताना दिसत होती. यामुळे चाकरमान्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडून गेले.
आठवडा बाजारासाठी आलेल्या वयोवृद्ध मंडळींसह महिला वर्गाचे प्रचंड हाल झाले. वाहतुकीला शिस्त लागणार तरी कधी ? असा संतप्त सवाल आता स्थानिक शहरवासीय करू लागले आहेत.


दुःख मागे टाकून जगणे हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली:डॉ. वसंत भोसले

आजरा : प्रतिनिधी
चिंतेने सगळेजण त्रस्त झाल्यामुळे जीवन जगण्याचा हक्क गमावत आहोत. दुःख मागे टाकून जगण्याची सवय आपल्याला नसल्यामुळेच आपण आनंदी जीवन जगू शकत नाही. दुःख मागे टाकून जगणे हीच जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी नातं, संस्कृती, भाषा, ज्ञान, संगीत यांचा स्वीकार करा व दुःख घेऊन मनात बसण्यापेक्षा आनंदी जीवन जगा असे आवाहन दै. लोकमतचे संपादक डॉ. वसंत भोसले यांनी केले.
आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात ‘आनंदी जीवन जगण्याची कला’ या विषयावर डॉ.भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर होते.
आपण दुःखी झालात तर त्याचे कारण शोधा. जीवनाचा अर्थ शोधून समजून घ्या. आनंदी राहण्याची कला शिका. कमीत कमी विचार करा. वास्तव आहे त्याचा स्वीकार करा.भ्रामक कल्पना सोडून द्या. निश्चित आनंदी व्हाल. आनंदापेक्षा वादातून दुःख जास्त होते. त्यामुळे सर्वांनी एकमेकांशी सांभाळून राहणे यामध्येच जीवन जगण्याचा आनंद आहे. थोर पुरुषांनी आपल्याला कसे जगावे हे शिकवल्यामुळेच व योग्य न्याय दिल्यामुळेच ३५० वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आपले प्रेरणास्थान बनले. जे झालंय ते स्वीकारून पुढे जाणे व त्यातून आनंद निर्माण करणे यातच आनंदी जीवन जगण्याची कला आहे असेही डॉ. वसंत भोसले यांनी सांगितले.
यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी व शहरवासीय उपस्थित होते.



अन्यायी पाणीपट्टी वाढ विरोधात सोमवारी मोटरपंपधारक शेतकऱ्यांचा मेळावा…

आजरा : प्रतिनिधी
पाटबंधारे खात्याने सर्व मोटरपंप धारकांना जलमापकयंत्र (वॉटर मीटर) बसविण्याच्या केलेल्या सक्तीविरोधात निर्णय करण्यासाठी आणि जलमापक यंत्र न बसवल्यास दहा पट दंडाची पाणी पट्टी शेतकऱ्यांवर लादणाऱ्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी ४ डिसेंबर रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजरा तहसील कार्यलयावर मोर्चा काढला होता.
यावेळी तालुक्यातील सर्व मोटरपंप धारकांचा व्यापक मेळावा घेऊन लढ्याची पुढील दिशा व इरिगेशन फेडरेशन बनविण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे तहसीलदार यांचे कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या बाजूने सकारत्मक अहवाल पाठविण्याचा निर्णय झाला होता.
याबाबत या मेळाव्यात निर्णय करून फेडरेशन स्थापन करण्यासाठी सोमवार दि २५ डिसेंबर रोजी दुपारी ठीक १२.०० वाजता रवळनाथ मंदिर, आजरा येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला तालुक्यातील सर्व मोटरपम्प धारक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कॉ संपत देसाई, अल्बर्ट डिसोझा, तानाजी देसाई, जोतिबा चाळके, संजय तर्डेकर, संभाजीराव सावंत, बजरंग पाटील, आनंदराव कुंभार, उदय कोडक, प्रकाश मोरुस्कर, शंकर पाटील, दशरथ घुरे, नारायण भडांगे, यांनी केले आहे



निधन वार्ता…
आण्णासो पाटील

सोहाळे (ता. आजरा) येथील प्रतिष्ठीत नागरिक, भावेश्वरी दूध संस्थेचे संस्थापक व आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आण्णा गोविंद पाटील (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
रमेश बैलुरकर

आजरा येथील सराफी व्यावसायिक रमेश श्रीधर बैलूरकर(वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी, मुलगा, जावई असा परिवार आहे.





