mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

सोमवार   दि. २५ ऑगस्ट २०२५         

बाळासाॊ धुरी यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हाळोली ता. आजरा येथील बाळासो कृष्णा धुरी गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. पश्चिम विभागात एक उत्कृष्ट शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नात, नातू असा परिवार आहे .

रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी नऊ वाजता आहे.

वझरे ग्रामस्थांची गावात दारूबंदीची मागणी : अखेर पोलिसांची कारवाई

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा /मंदार हळवणकर

आजरा तालुक्यातील सुमारे दोन हजार लोकसंख्येच्या वझरे गावात गावठी दारूची अवैध विक्री सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. गावातील दोन ठिकाणी सुरू असलेल्या या विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून कौटुंबिक कलह, वादविवाद आणि गावात अशांतता वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
दारूविक्रीबाबत ग्रामस्थांच्या आक्रोशाला वाचा फोडताना गावातील महिलांनी थेट विक्रेत्याला जाब विचारला असता मारहाणीची घटना घडली. यानंतर झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीची  मागणी करण्यात आली. यावेळी शिवराज लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांनी दारूबंदीचे निवेदन सरपंच शांताबाई गुरव यांच्याकडे सादर केले.

दरम्यान मारहाणीच्या घटनेनंतर उत्तूर पोलिसांनी तत्काळ धाव घेत गावठी दारू विक्रेता महादेव पाटील यांच्या घरावर छापा टाकला. कारवाईत अंदाजे १,५०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी गावात कायमस्वरूपी दारूबंदी लागू करून अवैध विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

‘रवळनाथ’ चे विविधांगी सेवा कार्य कौतुकास्पद :सहाय्यक दुय्यम निबंधक शैलजा चव्हाण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

रवळनाथ को-ऑप.सहकारी हौसिंग सोसायटीने बँकिंग क्षेत्रात आदर्शवत प्रगती केली आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना करिअर घडवता यावे यासाठी संस्थेने झेपच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. रवळनाथचे सहकार बँकिग, सामाजिक आणि शैक्षणिक असे विविधांगी सेवाकार्य उल्लेखनीय आहे. असे गौरवोदगार सहाय्यक दुय्यम निबंधक शैलजा चव्हाण यांनी काढले.

श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा शाखेत अमृतमहोत्सवी व सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थांचा सत्कार झाला. ज्येष्ठ संस्थापक संचालक प्रा. डॉ. शिवशंकर उपासे अध्यक्षस्थानी होते. संचालक प्रा. व्ही. के. मायदेव, महेश मजती प्रमुख उपस्थित होते.

प्रा. डॉ. उपासे म्हणाले, सहकाराचा खरा अर्थ समजून घेवून श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी वाटचाल करत आहे. त्यामुळेच व्यवसायाबरोबर समाजातील आपद्‌ग्रस्तांना, संकटात सापडलेल्या कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत देवून आणि सुखदुःखात सहभागी होवून कर्तव्य भावनेने संस्थेने सभासदांसह समाजातील सर्व घटकांशी कौटुंबिक ऋणानुबंध जपले आहेत. दत्तात्रय आर्दाळकर, एंजेलिन डिसोझा यांचा अमृतमहोत्सवी तर मुख्तार अब्बास वाडीकर, संभाजी होलम, दौलती पाटील, सुधाकर मर्दानी, गोविंद मस्कर, सचिन पाटील यांचा सेवानिवृत्तनिमित्त कु. चिन्मयी यादव,कु. श्रेयस निळकंठ, कु. अर्पिता चिगरे, कु. हर्षवर्धन देसाई यांचा सत्कार झाला. यावेळी श्री. होलम,श्री. वाडीकर, श्री. पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. गुरु गोवेकर यांनी अभंग गायनातून संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

आर्थिक संकटात सापडलेल्या कालेकर कुटुंबाला मदत केल्याबद्दल पेरणोली
ग्रामपंचायतीमार्फत संस्थेचे विशेष आभार मानण्यात आले. प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, श्री. गणपती नाईक,प्रा. राजीव टोपले, गौतम सुतार, सौ. सुरेखा भालेराव, श्री. जनार्दन दळवी यांच्यासह सभासद, ठेवीदार,
विद्यार्थी उपस्थित होते.

शाखा अध्यक्ष प्रा. डॉ. विनायक आजगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

शाखा सल्लागार सौ. नुरजहाँ सोलापुरे यांनी सुत्रसंचालन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. मायदेव यांनी आभार मानले.

निधन वार्ता
महेश नाईक

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आरदाळ येथील महेश गणपती नाईक (वय ३२ वर्षं ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. गेले तीन महिने ते आजाराशी झुंज देत होते.

त्यांच्या निधनाने कुटुंबासह मित्रपरिवार व समाजात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

शिरसंगी- आजरा मार्गावरील धोकादायक झाडे हटवा

शिरसंगी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिरसंगी – आजरा मार्गावरील धोकादायक झाडे गेल्या दोन महिन्यापासून वादळी पावसामुळे विद्युत वाहिनीवर झुकलेली असून यामुळे वादळी पावसात झाडांच्या फांद्या तुटून विद्युत वाहिनी तुटून विज गायब होणे असे प्रकार घडत आहेत. गेल्या आठवड्यात सिरसंगी येथील देसाई ॲक्वा च्या समोरील वादळी पावसामुळे झाडांची फांदी घासल्यामुळे विद्युत वाहिनी तुटून रस्त्यावर पडली होती. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. जीवीत हानी झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येणार का ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

तरी त्वरित या मार्गावरील धोकादायक झाडे हटवावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रवळनाथ विकास सेवा संस्थेला तीन लाख ४० हजारांचा नफा

शिरसंगी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला तीन लाख ४० हजाराचा नफा झाल्याचे चेअरमन मधुकर यलगार यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.

यावेळी स्वागत व प्रस्ताविक चेअरमन मधुकर येलगार यांनी केले. अहवाल वाचन सचिव सुभाष चौगुले यांनी केले. यावेळी चेअरमन मधुकर येलगार यांनी सध्या संस्थेचे भाग भांडवल ४० लाख ८० हजाराचे असून संस्थेमार्फत एक कोटी दहा लाखाचे कर्ज वाटप झाल्याचे सांगितले.

यामध्ये चालू आर्थिक वर्षाचा नफा तीन लाख ४० हजार झाल्याचे सभेमध्ये सांगितले. त्याचबरोबर संस्थेची नवीन इमारत ही कर्जमुक्त झाली असल्याचे सांगून संस्था सभासदांना शेतीसाठी मध्यम मुदतीचे कर्जपुरवठा अगदी कमी व्याजदरामध्ये करून देण्याचे आश्वासनही येलगार यांनी दिले.

यावेळी आजरा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाषराव देसाई यांनी रवळनाथ विकास सेवा संस्थेची निवडणूक गावातील सर्व सभासदांनी बिनविरोधरित्या पार पाडल्यामुळे सर्व नूतन संचालकांचे व सभासदांचे आभार मानले.

यावेळी तालुका संघाचे सेवानिवृत्त कर्मचारी दौलतराव देसाई व आजरा , चंदगड तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेले हरिपाठ प्रशिक्षक भिमराव सडेकर यांचा सत्कार करण्यात आला.व्हा. चेअरमन धोंडीबा कुंभार, केरबा कुंभार, प्रकाश कानडे, दत्तात्रय यलगार, निलेश सुतार, रमेश देसाई, सुरेश येलगार, बाळू कुंभार, संजय कुंभार, नामदेव होडगे , एम‌. व्हि. देसाई, पांडुरंग टकेकर, दत्तात्रय गुरव व सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
आभार सुभाषराव देसाई यांनी मांनले.

गोठणदेव विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात


शिरसंगी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिरसंगी या.आजरा येथील गोठणदेव विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. चालू आर्थिक वर्षात संस्थेला दोन लाख ४४ हजार रुपये नफा झाला असल्याचे चेअरमन श्री. दिगंबर देसाई यांनी बाविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले.संस्थेकडून यावेळी सभासदांना गणेश चतुर्थी निमित्त पाच टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही देसाई यांनी सांगितले.
स्वागत जी. वाय. देसाई यांनी केले. तर अहवाल वाचन सचिव संजय घाटगे यांनी केले. यावेळी श्री. रवळनाथ विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल श्री. मधुकर गोपाळ येलगार व व्हा. चेअरमन धोंडीराम कुंभार व संचालक बाबुराव सडेकर त्याचबरोबर गोठणदेव सेवा संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी अशोक येलगार यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी रवळनाथ विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आजरा कारखाना संचालक दिगंबर देसाई व त्यांच्या गटाने सहकार्य केल्याबद्दल मधुकर येलगार यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी व्हा. चेअरमन विष्णू दळवी, नारायण साटपे, धनाजी पताडे, भिमराव मयेकर ,जयसिंग थोरवत, चाळू सावंत, संतोष बुडके, सदाशिव परीट, धोंडिबा माटले, मारूती होडगे, दिलीप पाटील, पांडुरंग कांबळे, बाळू तिबिले, तुकाराम गांईंगडे, प्रभाकर देसाई, महादेव सावंत,राजेंद्र बुडके उपस्थित होते. आभार वसंत सुतार यांनी मानले.

 

संबंधित पोस्ट

पेरणोली येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह हिरण्यकेशी नदी पात्रात आढळला

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!