mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरठळक बातम्याराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि. १ ऑगस्ट २०२५         

सरोळी येथे चोरी
संसारोपयोगी साहित्य लांबवले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील सरोळी येथील डॉ. आनंद गोपाळ पाटील/ सध्या रा. अत्याळ ता. गडहिंग्लज यांच्या राहत्या घराचा दरवाजा मधोमध तोडून घरामध्ये प्रवेश करून चांदीच्या दागिन्यासह संसारोपयोगी साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवले.

याबाबतची फिर्याद डॉ. आनंद पाटील यांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आजरा शहर व उपनगरातील खड्डे मुजवण्यासह  औषध फवारणी करा

अन्याय निवारण समीतीचे निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहर व उपनगरामधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस त्रास होत आहे. तसेच आरोग्याच्या समस्याही निर्माण झालेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर अन्याय निवारण समितीकडून शहर व उपनगरातील खड्डे मुजवणे, औषध फवारणी करणे यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायतीला देण्यात आले आहे.‌

आजरा शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असून तेथे चिखल साचलेला आहे. पावसाळी काळात ही स्थिती अधिकच बिकट होत आहे,गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर मुरुम टाकण्याची आवश्यकता आहे.

शहर व उपनगरातील गटारी साफ न झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंग्यु, मलेरिया, टायफाईड यासारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. म्हणून संपूर्ण परिसरात औषध फवारणी तातडीने करावी यासह विविध मागण्या केल्या आहेत.

वरील सर्व कामे ७ ऑगस्ट  पूर्वी पूर्ण न झाल्यास कुंभार गल्ली येथे चिखलाच्या डबक्यात स्थानिक रहिवाशी यांचे बरोबर बसुन निदर्शने करण्यात येतील. त्यानंतर दररोज इतर भागातील पाणी साचलेल्या ठिकाणी व चिखल झालेल्या ठिकाणी टप्याटप्याने आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी परशुराम बामणे अध्यक्ष, गौरव देशपांडे उपाध्यक्ष तसेच सदस्य दयानंद भोपळे, बंडोपंत चव्हाण, जागेद पठाण, गौरव देशपांडे उपाध्यक्ष, जोतिबा आजगेकर, संतोष बांदवडेकर, अभिजित संकपाळ, संजय जोशी, सुधिर सुपल सह पदाधिकारी उपस्थित होते.

तालुक्यात दहा हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा आजरा सरपंच परिषदेचा संकल्प

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यामध्ये दहा हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा संकल्प आजरा सरपंच परिषद (मुंबई) यांच्या वतीने करण्यात आला आहे. देशी प्रजातीची ‘पन्नास रोपे’ प्रत्येक ग्रामपंचायतीस विनामुल्य देण्याचे निश्चित करण्यात आले असून त्याच्या जोडीला ग्रामपंचायतीने आणखी पन्नास झाडे द्यावीत. अशी एकुण शंभर देशी प्रजातीची झाडे प्रत्येक गावामध्ये लावली जावीत अशी संकल्पना आहे. त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

वाढदिवस साजरा करताना इतर गोष्टीबरोबरच त्यामध्ये ‘वृक्ष लागवड’ याचा देखील अंतर्भाव असावा, तसेच आई-वडील यांचे स्मरणार्थ झाडे लावली जावीत हा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले असून अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून या हंगामामध्ये आजरा तालुक्यामध्ये दहा हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा संकल्प सरपंच परिषद (मुंबई) ने हाती घेतला आहे.

सर्व सरपंचांनी आपल्या गावच्या परिसरामध्ये यंदाच्या या हंगामामध्ये जास्तीत जास्त देशी प्रजातीची वृक्ष लागवड करुन पर्यावरण संवर्धनासाठीच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवाव असे आवाहन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, राजु पोतनीस राज्य सरचिटणीस , जी.एम. पाटील जिल्हाध्यक्ष कोल्हापूर, पांडूरंग तोरगल्ले तालुका अध्यक्ष, सौ. प्रियांका जाधव तालुका अध्यक्षा, सौ.रत्नप्रभा भुतुर्ले, उपाध्यक्ष, विलास जोशीलकर , उपाध्यक्ष, सौ. समिक्षा देसाई, कार्याध्यक्ष, युवराज पाटील . कार्याध्यक्ष, पांडूरंग खवरे सरपंच सुलगाव, लहु वाकर सरपंच किटवडे, अनिल पाटील सरपंच मुरुडे, धनाजी दळवी  सरपंच चाफवडे, सौ. वैशाली गुरव सरपंच बुरुडे, आजरा सुत गिरणी अधिकारी आदी उपस्थित होते.

सौ. भारती  डेळेकर आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सोहाळेच्या लोक नियुक्त सरपंच सौ. भारती कृष्णा डेळेकर यांना अखिल भारतीय सरपंच परिषद व पंचायत राज विकास मंचच्या वतीने राज्यस्तरीय ग्राम रत्न सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करणेत आले.

सौ. भारती  डेळेकर या  सरपंच पदाचे संपूर्ण मानधन शैक्षणिक कामासाठी देण्याऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या महिला सरपंच असुन् त्यानी सन २०२३ मध्ये मिळालेल्या सरपंच मानधनामधून अनंत विद्या मंदिर सोहाळे शाळेच्या आवारातील हॅन्ड वॉश स्टेशन नूतनीकरण करणे व सन २०२४ मध्ये मिळालेल्या सरपंच मानधन मधून विद्या मंदिर बाची शाळेच्या आवारातील हॅन्ड वॉश स्टेशन नूतनीकरण करून शाळेच्या सौंदर्यात भर पाडली. तसेच स्वच्छता हा ग्रामजीवनाचा आत्मा बनला पाहिजे… हा गाडगेबाबांचा संदेश ध्यानी ठेवून सौ. डेळेकर  यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्याचा धडाका लावला आहे . तसेच बहुजन, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या ग्रामस्थांसाठी वेळोवेळी मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करून गावातील लोकांना वैद्यकीय उपचारांचा लाभ दिला आहे . गावातील महिला स्वयंसिद्ध होण्यासाठी त्यांनी आपल्या गावात विविध उपक्रमांचे प्रशिक्षण कार्यक्रम चालू केले आहेत. वृद्ध आणि दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे – हे तुकोबांचे वचन प्रत्यक्ष कृतीत उतरले असून गायरान, माळरानावर हजारो वृक्षांचे रोपण आणि संवर्धन करत आहेत. अशा उपक्रमाचे मुल्यमापन् करुन् त्यांची पुरस्कारासाठी निवड करणेत आली.

सदर कार्यक्रमला माजी आयुक्त रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन चंद्रकांत दळवी,इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, जलतज्ञ अनिल पाटील, जल अभ्यासक सतीश खाडे ,अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील ,
राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे राहुल गावित, दादासाहेब तांदळे रुपेश गांधी पद्माकर मोराडे राज्य संपर्क प्रमुख सचिन जगताप पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रदीप माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मलिग्रेतील मलिक्कार्जुन सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मलिग्रे ता. आजरा येथील मल्लिकार्जुन विकास सेवा संस्थेची सन २०२५-३० साठी निवडणूक जाहीर झाली असून यासाठी दुरंगी लढत होत आहे. रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून गेल्या आठ दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

संस्थेची स्थापना सन १९४८ झाली असून गेल्या ७७ वर्षामध्ये संस्थेच्या इतिहासात १९७०-७५ या साली एकदाच निवडणूक झाली होती. त्यानंतर आजअखेर संस्था बिनविरोध होत आली आहे. सन २०२२-२३ मध्ये संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली परंतू संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विष्णू जाधव यांचे अपघाती निधन झाल्याने व संचालक बाबूराव निंऊगरेंचे निधन झाल्याने पुन्हा अध्यक्ष निवडीसाठी कोरम पूर्ण न झाल्याने व इतर संचालकांनी राजीनामे दिल्याने गेल्या सहा महिन्यापासून संस्थेवर प्रशासक आले आहेत.

या पार्श्वभूमीवर या संस्थेची निवडणूक होत असून बिनविरोधची परंपरा या निवडणूकीने खंडीत झाली आहे.या निवडणूकीसाठी भावेश्वरी शेतकरी विकास आघाडी व रवळनाथ ग्रामविकास आघाडी या दोन आघाड्यामध्ये लढत होत आहे. भावेश्वरी आघाडीमध्ये सर्वसाधारण गटासाठी संतोष चौगले, शंकर जाधव, शिवाजी निऊंगरे, आप्पा नेसरीकर, चंद्रकांत बुगडे, विश्वास बुगडे, अशोक शिंदे, बाबू सावंत हे आपले नशीब आजमावर आहेत. तसेच महिला राखीवसाठी हिराबाई इक्के, शोभा घोरपडे तर इतर मागाससाठी सखाराम लोहार व मागासवर्गीयसाठी रामचंद्र कांबळे हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत.या गटाचे नेतृत्व आजरा साखर कारखान्याचे संचालक अशोक तर्डेकर, किशोर जाधव, सदाशिव माणगांवकर, दत्ता परीट,आनंदा बुगडे, शिवानंद हासबे, दिलीप बुगडे, सचिन सावंत, नेताजी निऊंगरे, प्रकाश सावंत हे करीत आहेत.

रवळनाथ आघाडीकडून सर्वसाधारण गटासाठी संजय कागिनकर, शिवाजी चिमणे, बसवंत जाधव, नाना नेसरीकर, दशरथ पारदे, सुनील पोवार, सुभाना बुगडे, सदानंद सावंत उमेदवारी करीत आहेत.महिला राखीवसाठी मीना कागिनकर, कमल बुगडे तसेच इतर मागासवर्गीय गटासाठी शिवाजी गुरव व मागासवर्गीय गटासाठी चाळू केंगारे हे आपले नशीब आजमावत आहेत.भटक्या विमुक्त जाती मधून मारूती गाडीवड्डर हे बिन विरोध निवडून आले आहेत. या गटाचे नेतृत्व सरपंच शारदा गुरव, माजी सरपंच समीर पारदे, केशव बुगडे, अनिल कागिनकर, पांडूरंग सावंत, शंकर बुगडे, पांडूरंग नेसरीकर करीत आहेत.

आजरा साखर कारखाना अध्यक्षांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास आर्थिक सक्षम करण्यासाठी साखरे बरोबर उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु कारखाना कार्यस्थळ असलेली गवसे व दर्डेवाडी ही गावे शासनाच्या इको – झोन मध्ये येत असल्याने उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणीत अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आजरा कारखाना अध्यक्ष मुकुंदराव देसाई व सहकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेऊन चर्चा केली.

सदर बाब कारखाना व्यवस्थापनाने यापूर्वी खा. शरदचंद्र पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांचे सूचनेवरून व मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद उर्फ उदयसिंह देसाई, व्हा.चेअरमन सुभाष देसाई, संचालक उदयसिंह पोवार, कार्यकारी संचालक संभाजी सावंत व कन्सलटंट श्री.मेंगाणे यांनी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान कारखान्याची स्थापना १९९० साली झाली असून त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी इको सेन्सेटीव्ह झोनचा आदेश झाला असलेचे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी ना.भूपेंद्र यादव यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कारखान्यासमोरील उपपदार्थ प्रकल्प निर्मिती मधील इको- झोनची अडचण निश्चित दूर केली जाईल असे आश्वासन दिले.त्यानंतर राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली येथे मुख्य संचालक साखर व्ही. के. दुबशी, असिस्टंट डायरेक्टर मोहम्मद फैजल यांची भेट घेऊन कारखान्यास अजून कमीत कमी व्याजदराची कोणती कर्जे उपलब्ध होतील याबाबतची माहिती घेऊन त्याच्या अटीशर्ती बाबत चर्चा केली.

निधन वार्ता
हणमंत दोरुगडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सोहाळे बाची ता. आजरा येथील हणमंत गुंडू दोरुगडे /सध्या रा. विद्यानगर, आजरा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

ठाणे महानगरपालिकेत ते सुपरवायझर म्हणून कामाला होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

रक्षाविसर्जन रविवारी मुंबई येथे आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews

कुपवाड येथील तरुणाचा आजऱ्यात मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!