
गणेशमूर्ती सांभाळण्याच्या नादात एकाचा मृत्यू
आजरा तालुक्यातील बोलकेवाडी येथे सचिन शिवाजी सुतार हे सकाळी गणपती मूर्ती घेऊन घरी आले. घरात गणपती घेताना चौकटीला लागेल म्हणून ते खाली वाकले याच वेळी त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
३८ वर्षीय सचिन हे गणेश उत्सवासाठी मुंबई येथून गावी दोन दिवसापूर्वी आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले असा परिवार आहे.
गणेश चतुर्थी दिवशी घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
…………
पावसाची विश्रांती… बाप्पांचे दणक्यात आगमन
गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने आज विश्रांती दिल्याने बाप्पांचे तालुकावासीयांनी दणक्यात स्वागत केले.
सकाळपासूनच येथील कुंभार गल्ली व परिसरात गणेश मुर्त्या नेण्याकरिता भक्तांनी मोठी गर्दी केली होती. जोरदार आतषबाजी व वाद्यांच्या दणदणाटात बाप्पा मोरयाच्या गजरात उत्साहात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मुर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पावसाने उघडीप दिल्याने बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. सजावटीचे साहित्य, फुले, आतषबाजीचे साहित्य यासह विविध वस्तूंच्या खरेदीकरीता तालुकावासीयांनी मोठी गर्दी केली होती.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व गृहरक्षक दलाचे जादा जवान तैनात करण्यात आले आहेत.
१०७ सार्वजनिक तर ५४ गावात एक गाव ..एक गणपती
तालुक्यात यावर्षी एकूण १०७ सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, तर ५४ गावांमध्ये ‘ एक गाव एक गणपती ‘ असा उपक्रम राबविण्यात आला आहे.
‘ मृत्युंजय ‘कारांना अभिवादन…

आजरा नगरीचे सुपुत्र ख्यातनाम साहित्यिक ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.आजरा येथे श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे ग्रंथदिंडी व प्रतिमापूजन करण्यात आले.

ग्रंथदिंडीत नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता जाधव,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी,आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, संभाजीराव सावंत,संभाजी इंजल, डॉ. अंजनी देशपांडे, राजेंद्र सावंत, सी.डी. सरदेसाई, सुभाष विभुते,रवी हुक्केरी यांच्यासह वाचनालयाचे पदाधिकारी, शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक व मान्यवर सहभागी झाले होते.
‘मृत्युंजय ‘कार शिवाजीराव सावंत यांना कोल्हापूर येथे अभिवादन

महाभारतातील दुर्लक्षित अशा कर्णाची प्रभावी मांडणी करणाऱ्या मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना येथील अक्षर दालन येथे सोमवारी उजाळा देण्यात आला.
त्यांची ती डोक्यावरची लष्करासारखी टोपी, कोट, मफलर आणि एकूणच भारदस्त बोलण्याच्या या आठवणी त्यांच्या समवयस्कांनी यावेळी जागवल्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आणि उद्योजक तेज घाटगे यांच्या हस्ते सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अक्षर दालन आणि निर्धार फाऊंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रविंद्रनाथ जोशी, अमेय जोशी, इंडियन बॅंकेचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी प्रकाश जोशी, श्रीकांत खंडकर उपस्थित होते.

प. पू. श्री. लक्ष्मणबुवा महाराज मोरजकर यांचा २४ सप्टेंबर पासून सप्ताह सोहळा
श्री. विठोबा देव, नबापूर ट्रस्ट,आजरा आयोजितप. पू. श्री. लक्ष्मणबुवा महाराज मोरजकर यांच्या सप्ताह सोहळ्यास २४ सप्टेबर पासून सुरुवात होत आहे. २ ऑक्टोंबर अखेर सदर सोहळा चालणार आहे.
रविवार दि.२४ रोजी सकाळी ११ वा. प.पू. महाराजांच्या पोथीचे श्री. विठ्ठल मंदिर येथे प्रयाण होणार आहे.
सप्ताह कालावधीत रोज रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत आजरा शहर भजनी मंडळाच्या वतीने दैनंदिन भजन सेवा होणार आहे, तर रात्री ११ च्या पुढे जागर भजन सेवा होणार असून ही सेवा चांदेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ, सुलगाव ग्रामस्थ भजनी मंडळ, बोलकेवाडी भजनी मंडळ, गांधीनगर भजनी मंडळ, नागनाथ भजनी मंडळ, चित्रा नगर, साळगाव भजनी मंडळ, साळगाव, पारेवाडी भजनी मंडळ, पारेवाडी, भजनी मंडळ सोहाळे, मसोली भजनी मंडळ, मसोली व सन्मित्र भजनी मंडळ आजरा यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री. अजित तोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने ‘भक्तीरंग ‘ हा भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. याच दिवशी रात्री दहा वाजता ह.भ. आनंदराव घोरपडे महाराजांचे कीर्तन होणार असून रात्री साडे अकराच्या पुढे जागर, भजन कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ४ या कालावधीत महाप्रसाद व रात्री दहा वाजता तांदळाचा महाप्रसाद दिला जाणार आहे.रात्री बारा वाजता महाराजांचे स्वगृही आगमन व सप्ताह समारंभाची सांगता होणार आहे.
वरील कार्यक्रमास व महाप्रसादासाठी वस्तू / रोख स्वरुपात देणगी द्यावयाची असेल त्यांनी योगेश पाटील, यशवंत इंजल, प्रकाश हरमळकर व समीर मोरजकर यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आजरा महाविद्यालयात आण्णा-भाऊ स्मृती पंधरवड्याचे उद्घाटन

आजरा महाविद्यालय, आजरा येथे जनता एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. काशिनाथअण्णा चराटी व कै. माधवरावभाऊ देशपांडे यांच्या स्मृतींना व कार्याला उजाळा देणा-या स्मृती पंधरवड्याचे आयोजन केले आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन १८ सप्टेंबर रोजी कै. माधवराव (भाऊ) देशपांडे यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी मराठी विभागाच्या वतीने प्रा एम. एच. देसाई यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रा. देसाई यांनी अण्णा- भाऊ यांच्या आजरा तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, व सहकार क्षेत्रातील कार्याच्या योगदानाचा आढावा घेत त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी या स्मृती पंधरवड्यानिमित्त घेण्यात येणा-या रक्तदान शिबीर, मिनी मॅरेथॉन स्पर्धा, विविध विषयांवरील व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा इत्यादींविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डी. पी. संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. आप्पासाहेब बुडके यांनी केले तर आभार प्रा. बाळासाहेब कांबळे यांनी मानले.
जनता गृहतारणला ३० लाख ६८ हजारांचा निव्वळ नफा : अध्यक्ष मारुती मोरे

येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या शिवराज्याभिषेक बाँडचे वार्षिक सभेत अनावरण करण्यात आले. सभासदांना ११ % इतका लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली. २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक संचालक प्रा. अशोक बाचुळकर यांनी केले. आर्थिक पत्रकांचे वाचन मॅनेजर मधुकर खवरे यांनी केले.
यावेळी उपाध्यक्ष गणपतराव आरळगुंडकर यांच्यासह सर्व संचालक, सल्लागार अधिकारी कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार यांनी आभार मानले.








