
🛑राहुल नार्वेकर यांना वेळकाढूपणा भोवला, विधानसभा अध्यक्षांना ‘सुप्रीम’ डेडलाईन; सर्वोच्च न्यायालयाची मोठी चपराक
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल ११ मे ला लागला. यावेळी सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा प्रकरणावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवली होती.पण सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केल्यानंतर चार महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही राहुल नार्वेकर यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सुप्रीम कोर्टाने ठराविक वेळेत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. पण अद्याप या प्रकरणावर हवी तशी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आलेली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर जाहीर नाराजी व्यक्त केली.
सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी अभ्यास करुन, दोन्ही बाजूच्या भूमिका ऐकून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. पण त्यानंतर बरेच दिवस या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात याआधीच्या सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना काय कारवाई केली? याबाबत विचारणा केली. कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना काय कारवाई केली याची माहिती पाठवण्याची नोटीसही बजावली.
विधानसभेत प्रत्यक्ष सुनावणी
सुप्रीम कोर्टाच्या नोटीसनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावली. दोन्ही गटाकडून लेखी स्वरुपात म्हणणं मांडण्यात आलं. त्यानंतर गेल्या आठवड्यात विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात अपात्रतेच्या प्रकरणावर प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी काही कागदपत्रे मिळाले नसल्याचा दावा करत आणखी काही वेळ वाढवून देण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांची मागणी मान्य केली.
सुप्रीम कर्टाकडून विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर जाहीर नाराजी
या सगळ्या घडामोडींदरम्यान ठाकरे गटाकडून दाखल करण्यात याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. ११ मे च्या निकालानंतर काहीही झालेलं नाही. ठराविक वेळेत निर्णय घ्या, असं आदेशात म्हटलं होतं. पण ११ मे नंतर काहीही झालं नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर राखला गेला नाही”, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाला उत्तरदायी आहेत. तुम्हाला हे प्रकरण ताबडतोब हाती घ्यावं लागेल. एक आठवड्यात सुनावणी घ्या. दोन आठवड्यात काय कारवाई केली ते आम्हाला सांगा. ठराविक वेळेत निर्णय घ्या, असे निर्देश याआधी दिले होते. त्यामुळे आता एक आठवड्यात कारवाई करा. कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा आहे”, असं कोर्टाने म्हटलं आहे.
एका आठवड्यात अंतिम निकाल लागणार..?
सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलीच चपराक दिलीय. कोर्टाने राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केलीय. तसेच विधानसभा अध्यक्ष हे सुनावणी का घेतली नाही, कारवाई का केली नाही, याबाबत सुप्रीम कोर्टाला उत्तरदायी आहेत, असं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच येत्या एक आठवड्यात सुनावणी घ्या, असा स्पष्ट आदेश कोर्टाने दिलाय. त्यामुळे या एका आठवड्यात राज्याच्या सत्ता संघर्षावर पु्न्हा सुनावणी होऊन अंतिम निकाल लागेल का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
News source :-
https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq
सौ.सुशीला कोटकर यांचे निधन

आजरा/हाजगोळी येथील सौ.सुशीला तुकाराम कोटकर ( वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आजरा येथील जनता बँकेचे माजी अध्यक्ष व स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संस्थापक संचालक श्री. तुकाराम रामचंद्र उर्फ बापू कोटकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.

रितू ठरली सुवर्णपदकाची मानकरी…

आजरा येथील कुमारी रितू जितेंद्र शेलार हिने बॅचलर ऑफ आर्किटेक्चर शाखेत शिवाजी विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकासह या विभागातील सुवर्णपदक पटकावले.
रितूचे माध्यमिक शिक्षण आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल मधून झाले असून मराठा बोर्डिंग हाऊस संचलित कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर येथून तिने आपले पुढील शिक्षण पूर्ण केले आहे.
या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून ती इंजिनियर जितेंद्र शेलार यांची कन्या आहे.

आजरा तालुका भाजपाच्या वतीने ‘ मेरी मिट्टी मेरा देश ‘ उपक्रम
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मेरी मिट्टी मेरा देश ‘ हा उपक्रम आजरा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पार पडला.
आजऱ्याचे नूतन भाजपा तालुकाध्यक्ष श्री.अनिरुद्ध केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.अशोकअण्णा चराटी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर उपक्रम पार पडला.
यावेळी माजी सरपंच दिलावर चांद, समीर चांद, मयूर बांदेकर रोहित बुरुड, प्रसाद केसरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोळिंद्रे येथील हनुमान विकास संस्थेची वार्षिक सभा उत्साहात…

कोळिंद्रे ता. आजरा येथील श्री हनुमान विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेश सावंत होते. यावर्षी सभासदांना सात टक्के इतका लाभांश देण्यात येणार असल्याचे यावेळी अध्यक्ष सावंत यांनी स्पष्ट केले. संस्थेला चालू सालाकरिता ४ लाख १९ हजार ७१७ रुपये इतका नफा झाला असून संस्थेने सलग आठ वर्षे सभासदांना डिव्हिडंट वाटप केले आहे.
सभेला सौ. जया पाटील, उपाध्यक्ष सौ. वंदना सावंत, आनंदी देसाई, रमेश बुगडे, आनंदा पाटील, ज्योतिबा पाटील, लक्ष्मण जाधव, शशिकांत संकपाळ, एकनाथ लोहार,अशोक परीट, सुभाष सावंत, प्रकाश पाटील, अर्जुन पाटील, विष्णू वाके, यांच्यासह सर्व संचालक,सभासद उपस्थित होते.
सचिव अमर मोरे यांनी अहवाल वाचन केले.आभार रमेश बुगडे यांनी मानले.

मलिग्रे हायस्कूल तालुकास्तरीय व्हाॅलीबॉल स्पर्धेत प्रथम

आजरा तालुकास्तरावरील झालेल्या शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सतरा वर्षीय वयोगटात ( मुले)मलिग्रे हायस्कूल मलिग्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर त्यांची जिल्हास्तरीय निवड झाली आहे. सदरची स्पर्धा आजरा हायस्कूल येथे पार पडली. तसेच सतरा वर्षांखालील व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलीनी द्वितीय क्रमांक पटकावला .
जिल्हास्तरीय निवड झालेले सतरा वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेतील विद्यार्थी पुढिलप्रमाणे अर्णव पाटील, रोहित केंगारे ,वेदात घोरपडे, ॠग्वेद घोरपडे, विवेक तिबीले, ॠषीकेश येसणे,यश नार्वेकर,संदेश येमेटकर, ओमकार जाधव, ॠग्वेद कांबळे,आहेत .
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष शंकरराव पाटील, संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील, प्राचार्य इंद्रजित पाटील यांची प्रेरणा तर मुख्याध्यापक सुभाष पाटील, क्रीडा शिक्षक नारायण होडगे, संजय पन्हाळकर,दयानंद सुतार, मिंलीद सावंत,गणेश बुरुड, छाया वाघराळकर, छाया पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

-: संक्षिप्त बातम्या :-
जोरदार पावसाने आजरा शहरासह परिसराला झोडपले
रविवारी सकाळपासून आजरा शहर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाच्या सरी कोसळतच होत्या. पावसाच्या या हजेरीने बळीराजा सुखावला आहे. गणेश उत्सव तयारीत मात्र पावसामुळे व्यत्यय येत आहे.





