
पूर्व वैमनस्यातून मारहाण… आल्याचीवाडी येथील एक जखमी.
आल्याचीवाडी(ता.आजरा) येथील महादेव जोतीबा परीट (वय ४४) यांना मागील भांडणाचा राग मनात धरून देवराज जानबा माडभगत (रा. आल्याचीवाडी) याने शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली. यामध्ये परीट हे जखमी झाले आहेत अशी फिर्याद महादेव परीट यांनी पोलिसात दिली असून या फिर्यादीवरुन देवराज माडभगत यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
देवर्डे येथे हत्तींचा धुडगूस.. उसासह केळी पिकाचे नुकसान

देवर्डे (ता. आजरा) येथे हत्तीने धुमाकूळ घालत चांभार गोंड नावाच्या शेतातील ऊस व केळी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. हत्तीने यशवंत बाळू पाटील यांच्या शेतातील वीस गुंठे उसाचे व केळी पीकाचे नुकसान केले. तसेच अजित गुरव यांच्या शेतातील नारळाची झाडे पाडली आहेत.

रामतीर्थ यात्रा साधेपणाने.. एसटी सुविधा नाही…

आजरा येथील रामतीर्थ यात्रा आज मंगळवार व उद्या बुधवारी होणार आहे. यात्रा साधेपणाने साजरी केली जाणार असून कोरोनाचे सर्व निर्बंध पाळूनच यात्रा साजरी केली जाणार आहे. नेहमीप्रमाणे यात्रेचे पारंपारिक धार्मिक विधी हे होणार आहेत. एसटी सुविधा पुरवण्यामध्ये तांत्रिक अडचणी असल्याने अद्याप याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे शक्यतो एसटी सुविधा नाहीच अशी परिस्थिती आहे.तर खाजगी वाहनधारकांना वाहने थांबवण्यासाठी यात्रा स्थळापासून सुमारे सव्वा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रामतीर्थ फाट्याजवळच पार्किंग सोय करण्यात आली आहे.

स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमास उद्यापासून सुरुवात
आजरा येथील श्री. स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण होत असून यानिमित्त उद्यापासून वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून उद्या(बुधवार दि.२) सकाळी अकरा वाजता श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे ‘सुवर्ण महोत्सव बोधचिन्ह अनावरण’ कार्यक्रम होणार आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना चराटी व छ. शिवाजी महाराज पुतळा कमिटीचे अध्यक्ष महादेव ऊर्फ बापू टोपले हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व आजरा साखर कारखान्याचे संचालक जनार्दन टोपले आणी संचालक मंडळाने केले आहे.
. ……छाया वृत्त ……

झुलपेवाडी(ता.आजरा) येथे रस्ता कामाचा शुभारंभ करताना ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ

देवर्डे (ता. आजरा) येथे श्री रवळनाथ हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

आजरा येथील राजेश विभुते यांनी पन्नास वेळा रक्तदान करण्याचा उपक्रम नुकताच पूर्ण केला.

आजरा- महागाव मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने शहरवासीय व बाजारपेठेसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

रामतिर्थ येथे मूळ धबधब्यानजीक बांधण्यात आलेल्या पुलाच्या((RAMP) खांबांचा भराव निघाल्याने हा भराव तातडीने टाकून घेण्याची मागणी होत आहे


.

