
आव्हान तरुणाईला वाचवण्याचे… प्रबोधनाचे…

✍️✍️ज्योतिप्रसाद सावंत
गेल्या काही महिन्यांमध्ये आजरा तालुक्यात १६ ते २५ वयोगटातील तरुणांच्या आत्महत्येच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. तरुणाईला आत्महत्यापासून रोखण्याचे नवे आव्हान पालक वर्ग व समाजासमोर येऊन उभे ठाकले आहे. आत्महत्यांची कारणे पाहता या कारणांना अनुसरून तरुणांचे समुपदेशन केल्यास निश्चितच हे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
आत्महत्येची सर्वसाधारण कारणे पुढील प्रमाणे पुढे येत आहेत…
◾ऑनलाइन जुगार
◾ऑनलाइन कर्ज
◾सातत्याने मोबाईलवर गेम खेळणे
◾प्रेमभंग/विवाह न जुळणे
◾बेरोजगारी
◾पालकांनी रागावणे
◾व्यसनाधीनता
◾परीक्षेचे पेपर अवघड जाणे
◾एकाकीपणा
◾पालकांशी वैचारिक मतभेद
मुळातच गेल्या दोन दशकापासून ग्रामीण भागातही विभक्त व त्रिकोणी कुटुंब पद्धती अस्तित्वात येऊ लागली आहे. यामुळे तरुणाईला स्वतःच्या व्यथा मांडण्याकरिता कुटुंबात भाऊ-बहीण अथवा समवयस्क कोणीच नाही अशी अवस्था निर्माण होऊ लागली आहे. एखादेच अपत्य असल्यामुळे पालकांच्या अपेक्षाही मुलांकडून वाढत चालल्या आहेत. अभ्यासापासून ते नोकरीपर्यंतच्या या अपेक्षा पूर्ण करताना पाल्यांची तर पाल्यांचे हट्ट पुरवताना आई-वडिलांची चांगलीच दमछाक होत आहे. याचा परिणाम म्हणून मानसिक खच्चीकरण होऊन आत्महत्यांसारख्या मार्गाकडे तरुणाई झुकू लागली आहे.
अशावेळी शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन तरुणाईचे समुपदेशन करण्याची गरज पुढे येऊन लागली आहे.
अपघाती मृत्यूंचेही प्रमाण वाढले
दुचाकी अपघातात होणाऱ्या मृतांची संख्याही तालुक्यात वाढत आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेभानपणे दुचाकी चालवताना गेल्या महिन्याभरात तालुक्यातील तब्बल पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये कानोली, साळगाव, देवर्डेसह इतर गावातील तरुणांचा समावेश आहे.

पिल्लाला वाचवताना माकडीणीचा मृत्यू
ग्रामस्थांनी केले अंत्यसंस्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हात्तीवडे ता. आजरा येथे नर वानराने पिल्लावर हल्ला केल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्न करणारी पिल्लांची आई नकळतपणे विद्युत तारेला जाऊन चिकटली व विजेचा धक्का बसून तिथेच तिचा मृत्यू झाला. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे शनिवार हा दिवस बजरंग बलीचा वार असल्याने स्थानिक युवा कार्यकर्त्यांनी मृत माकडीणीवर विधिवत अंत्यसंस्कार केले.
यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सुयश पाटील, गौरेश कांबळे, बळवंत कुंभार,बापू पाटील, बाळू कांबळे, पांडुरंग पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मौजे धनगरवाडी ल.पा तलावामधून पाणी सोडू देणार नाही…धनगरमोळा ग्रामस्थांचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मौजे सुळेरान पैकी धनगरमोळा येथील शेतकरी मालकी वहिवाटीच्या जमिनी कसत असून सदर जमिनीत ऊस हे मुख्य पिक असून ल.पा तलावातील पाण्यावरती ही शेती अवलंबून आहे.सदर शेतकरी पाणी परवानाधारक असून ल.पा तलावातील व तलावाचे सांडव्यावरील मुख्य ओढ्यावरील मोटर पंप असणारे शेतकरी असून या वर्षी कमी पावसामुळे तलावामध्ये आज रोजी पाण्याचा जो साठा आहे तो फारच कमी असून हे पाणी सोडलेस धरणामध्ये पाणी शिल्लक (मृत साठा) राहील अशी परिस्थिती आहे. या भागातील ऊस फेब्रुवारी व मार्च महिन्यात तुटल्यामुळे उसांना पाणी फार आवश्यक असून ओढ्याला येणारे पाणी हे अपुरे असल्याने व तलावातील पंपाना लागणारे पाणी याचा विचार करता पाणी सोडण्यास आम्हा शेतकऱ्यांचा विरोध जाहीर केला आहे.
कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडणार नाही अशी भूमिकाही स्पष्ट केली आहे. याबाबतचे निवेदन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ग्रामस्थांनी दिले आहे.
सदर ल.पा तलावाच्या सांडव्याच्या विसर्गामुळे सांडव्यावरील शेतकरी यांची शेतजमीन तुटून गेलेली आहे. यावर वारंवार तक्रार होऊन देखील. अर्ज देऊन सुद्धा उपाय योजना झाली नाही. ज्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. जोपर्यंत या शेतकऱ्यांच्या शेताला संरक्षण भिंत वैगेरे उपाय योजना होत नाहीत तोपर्यंत पाणी सोडता येणार नाही किंवा शेतकरी सोडू देणार नाहीत.
या ल.पा तलावामुळे (सांडव्यामुळे) धरणाचे पलीकडील भागातील शेतजमिनींना रस्ता नाही. लाभ क्षेत्रात असून देखील गेली अनेक वर्ष शेती पडीक राहिलेली आहे. त्याला आपण स्वरूपी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून द्यावा अशी शेतकऱ्याची मागणी आहे. त्यासाठी दि २०/१२/२०२३ रोजी कार्यकारी अभियंतासो कोल्हापूर, पाटबंधारे विभाग कोल्हापूर (दक्षिण) यांना तक्रार अर्ज दिलेला असून त्याची अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही असेही या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर आनंद गोविंद खरुडे, दिलीप वासुदेव खरुडे , अशोक लक्ष्मण जाधव,योगेश जाधव,धोंडीबा शंकर जाधव, कृष्णा तुकाराम खरुडे, विकास हरिश्चंद्र खरुडे,संजय शेटगे,आनंदा शेटगे आदींच्या सह्या आहेत.

जलसमृद्धी साठी लोक सहभाग महत्वाचा : प्रा. दिलीप संकपाळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालय, आजरा येथे पर्यावरणशास्त्र, ग्रीन क्लब, भूगोल व एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल जागृती सप्ताह अंतर्गत जागतिक जलदिनानिमित्य लोकसहभागातून जलसमृद्धीकडे या विषयावर व्याख्यान आणि जल संरक्षण व जल संवर्धन विषयावर भित्तिपत्रिकेचे उद्घाटन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी
जल हे जीव सृष्टीचे जीवन आधार आहे.
जल बचत हीच जल निर्मिती आहे. मानव हाच जल संकटाला जबाबदार आहे. विद्यार्थ्यांनी जलदूत म्हणून कार्य केल्यास जल संकटावर मात करू शकतो असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ यांनी ‘लोकसहभागातून जलसमृद्धीकडे’ या विषयावर बोलताना पृथ्वीवर असणारे पाण्याचे प्रमाण उपलब्ध पाण्याचा वापर, पाण्याचा होणारा वापर, पाण्याचे प्रदूषण याबद्दल भीषण वास्तव मांडून युवा शक्तीचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील तरुण मंडळांनी जल संवर्धनासाठी जल संवर्धनासाठी प्रयत्न केल्यास गाव पातळीवरील जल संवर्धन होऊ शकते . या उपक्रमात समाजाचा सहभाग ही वाढू शकतो स्वतःपासून स्थानिक पातळीवर जलसंवर्धनासाठी कार्य केल्यास घरगुती सांडपाण्याचा वापर शोषखड्डे करून केल्यास सांडपाण्याची नियंत्रण व पुनर्वापर होऊ शकते.शेतीत कृषी रसायनाचा मर्यादित वापर , औद्योगिक सांडपाणी शुध्दीकरण करून स्थानिक जल स्त्रोतांचे प्रदूषण टाळता येते. स्थानिक परिसरातील पाणी जमिनीत मुरवून नैसर्गिक जल शुद्धीकरणाद्वारे भूजल पातळी वाढवता येते . यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील आणि महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले आणि सूत्रसंचालन डॉ. रणजीत पवार यांनी केले तर आभार डॉ. संजय चव्हाण यांनी मानले.

आज-यात अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठा,माथाडी कामगारांचे नेते व माजी आमदार कै.अण्णासाहेब पाटील यांना आजरा तालूका मराठा महासंघाच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष मारूती मोरे म्हणाले,पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपले बलिदान दिले आहे.त्यांचे स्मरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.यावेळी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मराठा समाजासाठी उपयुक्त असे पुस्तक”पुढचे पाऊल” पुस्तकाचे प्रकाशन प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.
तालूकाध्यक्ष बंडोपत चव्हाण, उपाध्यक्ष शंकरराव शिंदे, संभाजीराव इंजल, कार्याध्यक्ष प्रकाश देसाई, सदस्य चंद्रकांत पारपोलकर,महादेव पोवार,सी. आर. देसाई,शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.



