mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.४ फेब्रुवारी २०२६

आजरा तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेचा भगवा फडकवा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोळिंद्रेत शिवसेनेची प्रचार सभा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना सदैव पुढे असते . पेरणोली जिल्हा परिषद गट व पेरणोली आणि वाटंगी गणात शिवसेनेने दिलेले उमेदवार मतदार संघाला न्याय देणारे आहेत . तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले . शिवसेना उमेदवांरांच्या प्रचारार्थ कोळिंद्रे येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते . माजी सरपंच शंकरराव उगाडे अध्यक्षस्थानी होते .

प्रास्ताविक प्रा . सुरेश बुगडे यांनी केले. यावेळी मंत्री आबिटकर यांनी शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती दिली . तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गट व चारही पंचायत समिती गणात शिवसेनेने दिलेले उमेदवार सामान्य जनतेशी नाळ असणारे आहेत . केसरकर यांचा गेली ४० वर्षे तालुक्याच्या राजकारणात व समाजकारणात सहभाग राहीला आहे . तालुक्याच्या विकासासाठी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कोठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली .

आजरा कारखान्याचे योग्य आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले . धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी आपली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . तालुक्यात मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहता निकाल स्पष्ट असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले .

तत्पूर्वी बोलताना आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी म्हणाले , तालुक्याचे राजकारण सर्वसामान्य माणसांच्या हातात राहीले पाहिजे यासाठीच आपण व आमचे नेते जयवंतराव शिंपी यांनी मंत्री आबिटकर यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले .

जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णूपंत केसरकर म्हणाले , पालकमंत्र्यांसारखे नेतृत्व लाभले असून येत्या पाच वर्षात मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणार आहे . विरोधी उमेदवार सुधीर देसाई यांच्यावर टीकेची झोड यावेळी केसरकर यांनी उठविली . जिल्हा बँक निवडणुकीत त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर जिल्हा परिषदेचा शब्द दिला होता . मात्र निवडणूक जाहीर होताच ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले . साखर कारखान्याला एन. सी. डी. सी कडून अर्थसहाय्य मिळाले , यातून के. डी. सी. बँक सुटली पण कारखाना अडचणीत आल्याचे ते म्हणाले . कारखान्यात सर्वच बाबीत त्यांचा हस्तक्षेप असून कारखान्याची सुधीर देसाई यांनी वाट लावल्याचा आरोपही त्यांनी केला . पालक मंत्र्यांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले .

यावेळी वाटंगी पंचायत समितीचे उमेदवार सतीश फडके , पेरणोली पंचायत समितीच्या उमेदवार सौ.श्वेता सरदेसाई , माजी जि . प . सदस्या सौ. सुनीता रेडेकर , आदित्य रेडेकर, आजरा उपनगराध्यक्षा सौ. पूजा डोंगरे , सौ.आसावरी खेडेकर, संजय पाटील , राजेंद्र सावंत , इंद्रजीत देसाई , विलास पाटील , अशोक पोवार , अनिरुद्ध केसरकर , रमेश रेडेकर, रणजित सरदेसाई,गोविंद गुरव राजू पोतनीस, विश्वास जाधव, लहू पाटील, दयानंद नेऊंगरे, शंकर उगाडे, तानाजी राजाराम , धनाजी बुगडे, विजय थोरवत, संतोष भाटले, सुनील दिवेकर, संकेत सावंत, काका देसाई, संतोष पाटील, धनंजय पाटील,यांच्यासह पेरणोली जिल्हा परिषद गटातील मतदार उपस्थित होते .

तालुक्याच्या राजकारणाची घडी बसवणार…

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी, विष्णुपंत केसरकर व आपण एकत्र आलो आहोत. यापुढे आपण एकत्रितरित्या सर्वांना सोबत घेऊन तालुक्याची राजकीय घडी बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

निधन वार्ता
मालती गुरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

नाईक गल्ली, आजरा येथील श्रीमती मालती दामोदर गुरव (वय ८५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, पाच विवाहित मुली, जावई,नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी मिलिंद गुरव यांच्या त्या आई होत.

रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक ६ रोजी सकाळी आहे.

 

पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघ दत्तक घेऊन विशेष लक्ष देवून सर्वांगीण विकास साधणार : आमदार शिवाजीराव पाटील

आजरा येथे भाजप व ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माझ्याबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळेच एक वर्षात ३० हजार कोटीहून अधिक रकमेची विकास कामे करू शकलो. विकास कामांचा हा डोंगर पुढील चार वर्षातही कायम राहणार आहे. त्यामुळे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघ दत्तक घेऊन विशेष लक्ष देऊन या भागाचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले. ते आजरा येथे भारतीय जनता पार्टी व ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. भाजपा नेते आजऱ्याचे नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.

स्वागत व प्रास्ताविक करताना संभाजीराव सरदेसाई म्हणाले, भाजपा नेते अशोकअण्णा चराटी यांना घेरण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे, मात्र हा डाव स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून पाडतील. आमदार पाटील पुढे म्हणाले, ज्यांनी मला आमदार करण्यासाठी प्रयत्न केले त्यांना नेहमीच बळ देणार. मुख्यमंत्री देवाभाऊंच्या प्रेरणेने काम करण्याची नेहमीच ऊर्जा मिळते. आजरा-गडहिंग्लज-चंदगड भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार आहे. देवेंद्र फडणवीस हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून विशेषता आरोग्य व पाण्याच्या क्षेत्रात मोठे काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मला काम करण्यासाठी बळकटी मिळावी याकरिता साऱ्यांनी कमळाला मतदान देऊन भाजपाला विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले. पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार म्हणाले, विरोधी उमेदवार अनेक पदावर कार्यरत आहेत पण त्या पदांना ते न्याय देऊ शकले नाहीत. आमदार शिवाजीराव पाटील, अशोक अण्णा चराटी यांच्या मार्गदर्शनाखाली विकास करण्याचा ध्यास आहे. उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार उमेश आपटे म्हणाले, सर्वसामान्यांसाठी २४ तास उपलब्ध असणारा प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे.

यावेळी पांडुरंग लोंढे, संदीप चौगुले, सुरेश गिलबिले, तानाजी देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश पाटील, बाजीराव देवरकर (संरबळवाडी) यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी पंचायत समिती उमेदवार समीर पारदे, महेश करंबळी, स्मिता देसाई, साधना केसरकर, दशरथ अमृते, अमोल बांबरे, संजय चव्हाण, शशिकांत सावंत, लहू वाकर, जी. एम. पाटील, दीपक गवळी, उदयसिंह सरदेसाई, आनंदा कातकर, संदीप देसाई, ज्योत्स्ना चराटी, संतोष चौगुले, डॉ. विनायक परुळेकर, रामचंद्र पाटील, सुहास जोंधळे, संजय सांबरेकर, शामराव हरेर, महादेव गुरव, अजित हरेर, पंकज वास्कर, अनिल केरकर, प्रकाश कविटकर, पांडुरंग राणे, तुकाराम दळवी, तानाजी पाटील, बाजीराव सरदेसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बळवंत शिंत्रे यांनी सूत्रसंचालन केले. भाजपा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी यांनी आभार मानले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आजरा तालुका यांचा भारतीय जनता पार्टी आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा….

स्वाभिमानी शेतकरी संघटना आजरा तालुका यांचा भारतीय जनता पार्टी आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई, तालुकाध्यक्ष सखाराम केसरकर, कृष्णा पाटील, नरेंद्र कुलकर्णी, मारुती पाटील, डॉ. बारदेसकर, राणोजी कुंभार तसेच तालुक्याचे नेते अशोकअण्णा चराटी, उमेदवार जयवंत सुतार, उमेश आपटे, समीर पारदे, स्मिता देसाई, महेश करंबळी, साधना केसरकर, दशरथ अमृते, संभाजीराव सरदेसाई आदी उपस्थित होते.

आजऱ्यात ११ व १२ फेब्रुवारी रोजी  उरूस 

आजरा येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत दावल मलिक यांच्या उरूसाचा कार्यक्रम ११ व १२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उरुस कमिटीने दिली आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चित्री प्रकल्प १००% भरला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अशोकअण्णा वाढदिवस विशेष…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बनावट सोने ठेवून २१ लाखांचा चुना

mrityunjay mahanews
error: Content is protected !!